‘गतिमान न्यायासाठी न्यायव्यवस्थेचे आधुनिकीकरण’ विषयावर मंथन
धाराशिव, दि. 3 – महाराष्ट्र आणि गोवा वकिल परिषद, जिल्हा विधीज्ञ मंडळ व सर्व तालुका विधीज्ञ मंडळाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात पहिल्यांदाच राज्यस्तरीय वकिल परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, 5 मे रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणार्या या परिषदेचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. राज्यस्तरीय वकिल परिषदेसाठी राज्यभरातील तीन हजार वकिल बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र व गोवा वकिल परिषदेचे अध्यक्ष अॅड. मिलींद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील जिल्हा न्यायालय परिसरात असलेल्या मधुकर मोरे विधीज्ञ ग्रंथालयात बुधवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. सुधाकर मुंडे, माजी अध्यक्ष अॅड. नितीन भोसले, ज्येष्ठ विधीज्ञ राम गरड, अॅड. ललीत चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना अॅड. मिलींद पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील दिवंगत विधीज्ञ व्यंकटराव नळदुर्ग, अॅड. नरसिंगराव काटीकर, कलिमोद्दीन सिद्दीकी, मल्लिकार्जून तोडकरी आदींनी विविध क्षेत्रात काम करून जिल्ह्याचा नावलौकिक केला आहे. अशा धाराशिव जिल्ह्यात सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या उपस्थितीत पहिल्यांदाच राज्यस्तरीय वकिल परिषद आयोजनाचा मान जिल्ह्याला मिळाला आहे. आधुनिक काळात न्यायव्यवस्थाही आधुनिक आणि गतिमान होत आहे. त्यामुळे लोकांना कमी कालावधीत न्याय मिळणे शक्य झाले आहे. त्यामुळे राज्यस्तरीय वकिल परिषदेतील चर्चासत्रासाठी ‘गतिमान न्यायासाठी न्यायव्यवस्थेचे आधुनिकीकरण’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
शुक्रवारी सकाळी 10 वाजता परिषदेचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला, न्यायमूर्ती नितीन सांबरे, पालक न्यायमूर्ती अरूण पेडनेकर, ई-कमिटीचे माजी उपाध्यक्ष तथा माजी न्यायमूर्ती आर. सी. चव्हाणा, भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर अनिल सिंग, राज्याचे अॅडव्होकेट जनरल डॉ. बिरेंद्र सराफ, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे चेअरमन मनन कुमार मिश्रा, माजी न्यायमूर्ती व्ही. के. जाधव, कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष सुरेंद्र तावडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
दुपारच्या सत्रात कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘गतिमान न्यायासाठी न्यायव्यवस्थेचे आधुनिकीकरण’ या विषयावर चर्चा सत्र होणार आहे. यात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती अरूण पेडनेकर, सर्वोच्च न्यायालयाच्या ई-कमिटीचे माजी उपाध्यक्ष तथा माजी न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण, सायबर सुरक्षा संस्थेचे अध्यक्ष डॉ. हारॉल्ड डी.कास्टा, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाचे उपाध्यक्ष अॅड. संग्राम देसाई हे चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर 3.15 ते 4.30 या वेळेत खुले चर्चासत्र व ज्येष्ठ विधीज्ञांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अनिल सिंग व अॅडव्होकेट ऑफ जनरल डॉ. बिरेंद्र सराफ व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचे सर्व पदाधिकारी, सदस्य व जिल्ह्यातील वकिल बांधव सहभागी असणार आहेत. या परिषदेस वकिल बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र व गोवा वकिल परिषदेचे अध्यक्ष अॅड. मिलींद पाटील, उपाध्यक्ष अॅड. संग्राम देसाई, सदस्य अॅड. जयंत जायभावे, जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष सुधाकर मुंडे यांच्यासह वकिल परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.