विविध पिकांतील एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनांतर्गत मशागतीय पद्धतीस अनन्य साधारण महत्त्व आहे. ज्यामध्ये पेरणीपूर्व मशागत व आंतर मशागत अशा दोन बाबी समाविष्ट होतात.
सध्या उन्हाळा ऐन मोसमात आहे त्यामुळे उन्हाळ्यात करावयाच्या पेरणीपूर्व किंवा खरीप पूर्व मशागती बाबतचे महत्त्व याबाबत माहिती खालिल प्रमाणे.
सर्व पिकांतील बहुतांशी कीड व रोग (उदा. अळीवर्गीय कीटक, खोडमाशी, रस शोषण करणाऱ्या किडी, हुमणी यासारखे बहुभक्षी किडी, चक्रीभुंगा) या सर्व किडींच्या सुप्त अवस्था जमिनीमध्ये किंवा जमिनीमध्ये असणाऱ्या झाडांच्या मृत अवशेषांवर जिवंत असतात. तसेच पिकांवरील विविध रोग बुरशीजन्य रोग, जिवाणूजन्य रोग ( उदा. बी कुज, मुळकुज, मर, खोडकूज, करपा, पानांवरील ठिपके, भुरी, इत्यादी) याही रोगांच्या सुप्त अवस्था मातीमध्ये किंवा पिकांच्या मृत अवशेषांवर मातीमध्ये तग धरून जिवंत असतात.
उन्हाळ्यामध्ये खोल नांगरणी केल्यास हानिकारक कीटक, बुरशी व जिवाणू च्या सुप्त अवस्था जमिनी बाहेर येतात व लख्ख सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे तसेच पक्षांच्या निदर्शनास आल्यामुळे पक्षी त्यांना खाऊन नष्ट करतात. यामुळे किडी व रोगांचे जीवन चक्र खंडित होते. जीवन चक्र खंडित झाल्याने एका कीटकापासून तसेच सूक्ष्म बुरशी, जिवाणूपासून हजारोंच्या संख्येमध्ये निर्माण होणारी पुढची पिढी तयार होत नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर खोल नांगरणी केल्यास मातीची उलथापालथ होते व अन्नद्रव्याची उपलब्धता वाढल्यामुळे उत्पादनात भरिव वाढ होते. त्यामुळे खरीप हंगामात पिकाखाली येणाऱ्या क्षेत्राची सध्या नांगरणी करून उन्हाळ्यात तापू दयावे.
डॉ. श्रीकृष्ण झगडे
शास्त्रज्ञ (पीक संरक्षण)
कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर