धाराशिव –
उमरगा येथील बेकायदेशीर हातभट्टी विक्री केंद्रावरती राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, सिमा तपासणी नाका, उमरगा यांनी केलेल्या कारवाईमध्ये न्यायालय, उमरगा यांचेकडुन एकुण रूपये 25,500/- चा दंड वसुल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की,उमरगा बसस्थानका शेजारील पत्र्याचे शेडमध्ये अवैध गावठी हातभट्टी दारू ग्राहकांना विक्री करण्यासाठी सार्वजनिक गुत्ता उघडलेला असल्याबाबतची खात्रीलायक बातमी मिळाल्याच्या अनुषंगाने दिनांक 29 डिसेंबर रोजी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, सिमा तपासणी नाका, उमरगा या कार्यालयाने गणेश बारगजे साहेब, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक, उमरगा यांचेसमवेत प्रोव्हीबीशन गुन्हे कामी छापा मारुन आरोपीत ईसम नामे किशन काशिराम मदने यास म.दा.अ. 1949 चे कलम 68(अ,ब) अंतर्गत अवैधरित्या सार्वजनिक दारूचा गुत्ता चालविल्याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच म.दा.अ. 1949 चे कलम 84 अंतर्गत मद्यपी अकबर मस्तान बागवान यावरती अवैधरित्या सार्वजनिक दारूचे गुत्यामध्ये दारू सेवन केल्याबाबत गुन्हा नोंदविण्या आला. सदरील दोन्ही आरोपीना
न्यायदंडाधिकारी साहेब, प्रथम वर्ग न्यायालय, उमरगा यांनी गुत्ता चालक यांस रू. 25,000/- व मद्यपी यास रू. 500/- प्रमाणे दंड आकारला आहे. अशा प्रकारच्या अवैध हातभट्टी दारू विक्रीच्या व सेवनाच्या विरोधामध्ये व त्यावरील नियंत्रण बसण्याच्या अनुषंगाने धाराशिव जिल्हयामध्ये विशेष प्रकारची कठोर कारवाई राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, सिमा तपासणी नाका, उमरगा यांचेमार्फत यशस्विरित्या करण्यात आली आहे.
सदरील कारवाई ही सर्व निरीक्षक र.वा. कडवे, दुय्यम निरीक्षक, शिवाजी कोरे, प्रदीप गोणारकर, सुमेध चव्हाण, स.दु.नि. अमर कोरे व जवान राजेंद ठाकुर यांनी यशस्वीरित्या पार पाडली
आहे.