धाराशिव – खवय्यांसाठी खाद्यपदार्थ, अध्यात्मिकांसाठी धार्मिक कार्यक्रम, बच्चे कंपनीसाठी मनोरंजन, महिलांसाठी संक्रात वान खरेदी, नववर्षात होणारा हिरकणी महोत्सव धाराशिवकरांसाठी मेजवानी ठरणार आहे.
५ ते १० जानेवारी दरम्यान लेडीज क्लब येथे या महोत्सव होणार असल्याची महिती लेडीज क्लब च्या अध्यक्षा अर्चना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने १० ते १५ वर्षांपूर्वी हा महोत्सव सुरू करण्यात आला होता. कोरोना काळात यात खंड पडला होता. राज्याचे ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ५ जानेवारी रोजी या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या महोत्सवात ५० खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असणार आहेत त्यात बासुंदी, पाणी पुरी, रगडा पॅटीस, भेळ, दही धपाटे, यासोबत चिकन समोसा, मटण, मच्छी यासारखे व्यंजन असणार आहेत. तसेच लहान मुलांच्या करमणुकीसाठी देखील काही स्टॉल असणार आहेत. तसेच संक्रांत सणाचे वान खरेदी करण्यासाठी देखील काही स्टॉल असणार असल्याचे अर्चना पाटील यांनी सांगितले.
असे असणार कार्यक्रम
५ जानेवारी रोजी नवदुर्गा कार्यक्रम असून देवीची नऊ रूपे नृत्याविष्कारामधून देवीच्या विविध गाण्यावर दाखवण्यात येणार आहेत. ६ जानेवारी रोजी ह भ प शिवलीलाताई पाटील यांची कीर्तन असणार आहे. ७ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील यशस्वी महिला उद्योजकांचा मार्गदर्शन कार्यक्रम आहे. ८ जानेवारी रोजी कीर्तनकार ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन असणार आहे. ९ जानेवारी रोजी सुप्रसिद्ध गायक सुधीर फडके यांच्या श्रवणीय आवाजातील ग. दि. माडगूळकर यांची सुमधुर गाणी असलेले गीत रामायण नृत्याविष्कार हा कार्यक्रम आहे. तर १० जानेवारी रोजी आज लग्न संस्था नष्ट होतेय का या प्रश्नावर लग्न पहावे करून हा कार्यक्रम असणार आहे.