धाराशिव – १४२ पेक्षा अधिक खासदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध सामाजिक संघटनांनी आंदोलन करत राष्ट्रिय निषेध दिन पाळला. या आंदोलनात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल सुराणा यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी हिरीरीने सहभाग घेतला हे विशेष.
१३ डिसेंबर रोजी दोन युवकांनी प्रेक्षक गॅलरी तून उड्या मारत गदारोळ केला होता. त्यानंतर विरोधीपक्षाचे खासदार प्रचंड आक्रकम झाले होते. संसद भवनाच्या सुरक्षेचा मुद्दा देखील अनेकांनी यावेळी उचलून धरला होता. या घटनेच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. याविरोधात देशभर आज आंदोलने सुरू आहेत.
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालासमोर अनेक सामाजिक संघटनांनी एकत्र येत आज आंदोलन केले. यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा, गुंडू पवार, ॲड. रेवण भोसले, ॲड. अजय वाघाळे, सिद्धेश्वर बेलुरे, गणेश वाघमारे, अब्दुल लतिफ, विजय गायकवाड, आदि उपस्थित होते. तसेच या आंदोलनात सोशलिस्ट पार्टी इंडिया, राष्ट्र सेवा दल, अंधश्रद्धा निर्मुलन समिती आदी सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता.