काक्रंब्यात घरफोडी, ५ लाख ४५ हजार रु. ऐवज लंपास

0
66

 



सलगरा,दि.१९(प्रतिनिधी) 

काक्रंबा येथील प्रसाद चौगुले आणि त्यांचे भाऊ संदीप चौगुले हे दोघे मिळून राहतात संदीप यांचे तुळजापुरात चौगुले बंधू नावाचे वडापाव सेंटर आहे. त्या सोबतच फायनान्शिअल सर्विसेस चा व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवतात. घरी कोणी नसल्याची संधी साधून चौगुले यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ५ लाख ४५ हजार रु. ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी फिर्यादी प्रसाद चौगुले यांनी दि.१९ मे रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.सं. कलम ३८० आणि ४५४ अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 

या बाबत अधिक माहिती अशी की, संदीप हे आपल्या पत्नी मुला – बाळांसह तीन दिवसांपूर्वी कर्नाटकला फिरण्यासाठी गेले होते. दि.१८ मे रोजी घरी प्रसाद चौगुले आणि त्यांच्या पत्नी असे दोघे होते. अचानक त्यांच्या पत्नीची तब्येत बिघडल्याने घराला कुलूप लावुन ते तिला तुळजापूरला दवाखान्यात घेऊन गेले. त्या नंतर दुपारी ०३ वा.सु. प्रसाद चौगुले हे घरी गेले तेव्हा त्यांनी बघितले की, अज्ञाताने घराचे कुलूप तोडून घरात जाऊन संदीप चौगुले यांच्या बेडरूम मधील कपाटातील आणि तक्रारदार प्रसाद चौगुले यांच्या कपाटातील रोख रक्कम अन् काही दागिने चोरून पोबारा केला. या मध्ये चोरट्यांनी संदीप आणि प्रसाद या दोघांच्या पण कपाटातील तिजोरीवर डल्ला मारून रोख रक्कम १ लाख २० हजार, सहा तोळ्याचे सोन्याचे नेकलेस, पाच तोळ्याचे नेकलेस, एक तीन तोळ्याची सोनसाखळी, दोन तोळ्याची सोन्याची अंगठी, एक तोळ्याची सोन्याची मोतीचुर अंगठी, (सर्व प्रति तोळा २५ हजार रु. प्रमाणे) ४ लाख २५ हजारांचे दागिने आणि रोख रक्कम १ लाख २० हजार असा एकूण ५ लाख ४५ हजार रु. ऐवज लंपास केला अशी तक्रार प्रसाद चौगुले यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिली. त्या नुसार दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.सं. कलम ३८० आणि ४५४ अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

आणखी वाचा

उन्हाळी खोल नांगरणीचे महत्त्व

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here