धाराशिव जिल्ह्यात कृषि विभागाची कारवाई दहा कृषि सेवा केंद्राचे परवाने निलंबित

0
54

 

धाराशिव दि,01(प्रतिनिधी):-खरीप हंगामाच्या पार्श्वभुमीवर कृषी विभागाकडून नियमित कृषी सेवा केंद्र तपासणी करण्यात येत असून तपासाणी अंती अनियमितता आढळून आलेल्या 10 कृषि सेवा केंद्राचे परवाने निलंबित व 03 कृषी सेवा केंद्राना ताकीद देण्यात आलेली आहे. तपासणीमध्ये जादा दराने खताची विक्री करणे , ई-पॉस मशीन प्रमाणे साठा न जुळणे , परवान्यात समाविष्ट स्त्रोताव्यतिरिक्त इतर निविष्ठाची खरेदी विक्री करणे , साठा रजिस्टरला नोंद नसणे ,शेतक-यांना विहीत नमुन्यात पावती न देणे इ.अनियमितता आढळून आलेली आहे. यामध्ये तुळजापूर तालुक्यातील 06 , लोहारा तालुक्यातील 01 व भूम तालुक्यातील 03 कृषी सेवा केंद्राचा समावेश आहे तसेच उमरगा तालुक्यातील 01 व भूम तालुक्यातील 02 कृषी सेवा केंद्राना ताकीद देण्यात आलेली आहे. 

            यानंतर देखील तपासणी सुरुच राहणार असून दोषी विक्रेत्यांवर बियाणे/खते/किटकनाशके कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.  जिल्हयातील खत विक्री केंद्राने शेतक-यांना जादा दराने विक्री करणे, लिंकिंग करणे, साठा रजिस्टर अद्ययावत न ठेवणे, विक्री केंद्र/गोदामात उपलब्ध असलेल्या खताचा साठा याची माहिती भावफलक/दरफलकावर नोंद न करणे इ. प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल.

              तसेच शेतक-यांनी बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करत असताना अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच कृषी निविष्ठांची खरेदी करावी, खरेदी करताना पक्की पावती घ्यावी पावतीवर खरेदी केलेल्या निविष्ठाचा संपूर्ण तपशील, विक्रेत्याची स्वाक्षरी असल्याची खात्री करावी.अनुदानित रायासनिक खताची खरेदी केल्यावर विक्रेत्याकडून ई-


पॉस मशीनवरील बिल घ्यावे व खरेदी केल्यानंतर खताच्या बॅगवरील किंमत व विक्रेत्याने दिलेले बिल तपासून घ्यावे तसेच बियाणे खरेदी केल्यानंतर त्याचे टॅग, वेस्टन, पिशवी व त्यातील  थोडे बियाणे हंगाम संपेपर्यंत जतन करुन ठेवावेत. बियाण्यांची पिशवी सिलबंद असल्याची खात्री करावी व त्यावरील अंतिम मुदत पाहून घ्यावी. नामांकित कंपनीचे बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करावीत.

                  निविष्ठा उपलब्धतेच्या व दराच्या अनुषंगाने  तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून जिल्हास्तरावरील तक्रार निवारण कक्षाचा संपर्क क्रमांक 02472223794  असा असून यावर whatsapp द्वारे देखील तक्रार स्विकारली जाणार आहे. तक्रार नोंदवताना नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व तक्रारीचा थोडक्यात तपशील द्यावा तसेच साध्या को-या कागदावर ही माहिती लिहून त्याचे छायाचित्र काढून ते व्हॉटससॲप ने पाठवता येऊ शकेल . याशिवाय शेतक-यांना आपले तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी तसेच क्षेत्रीय कर्मचारी यांचेकडे देखील तक्रार नोंदवता येईल असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी , रविंद्र माने यांनी केले आहे.            

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here