back to top
Friday, November 22, 2024
Google search engine
Homeमहाराष्ट्रशिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचा परिचय

शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचा परिचय

   महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे श्री. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. गेल्या अनेक दशकांपासून मराठी माणूस, शेतकरी, कष्टकरी जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या श्री. ठाकरे यांना त्यांचे वडील शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे, आई स्व. मीनाताई आणि आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा समृद्ध वारसा लाभला आहे. 

शिवसेना प्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी पायाभरणी केलेल्या आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाची धुरा श्री. ठाकरे यांनी मुख्य संपादक म्हणून सांभाळली.

 २७ जुलै १९६० रोजी मुंबईमध्ये जन्म झालेले श्री. उद्धव ठाकरे जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् चे स्नातक असून त्यांच्या छायाचित्रांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. एक सिद्धहस्त लेखक आणि व्यावसायिक छायाचित्रकार असलेल्या श्री. ठाकरे यांच्या कलाकृतींची दखल अनेक नामवंत मासिकांनी वेळोवेळी घेतली आहे. तसेच त्यांच्यातील जागतिक दर्जाच्या  छायाचित्रकाराचे दर्शन विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून रसिकांना घडले आहे.

राजकीय कारकीर्द
श्री. उद्धव ठाकरे यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात विद्यार्थी दशेपासून झाली. शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रीय असलेल्या श्री. ठाकरे यांच्याकडे  2002 च्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आली आणि महापालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन करीत त्यांनी ती यशस्वीरीत्या पूर्ण केली. या निवडणुकीने त्यांच्यातील राजकीय नेतृत्वगुण संपूर्ण राज्याने अनुभवले. २००३ मध्ये पक्षाने त्यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आणि २००४ मध्ये त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून घोषीत केले.

व्यक्तीगत जीवन
  श्री. उद्धव ठाकरे यांचा विवाह सौ. रश्मी यांच्याशी झाला असून त्यांना आदित्य आणि तेजस अशी दोन मुले आहेत.  श्री. आदित्य ठाकरे आजोबा आणि वडिलांचा राजकारणाचा वसा पुढे चालवित आहेत.  ते सध्या  युवा सेनाप्रमुख असून वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

कलात्मक पैलू
 महाराष्ट्राच्या भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशा अलौकिक सौंदर्याचे मूर्तीमंत आणि विहंगम छायाचित्रण त्यांच्या ‘महाराष्ट्र देशा’ या 2010 ला प्रकाशित झालेल्या पुस्तकातून दिसून येते. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिकतेचा मानबिंदू असलेल्या ‘पंढरपूर वारी’चे आणि ग्रामीण महाराष्ट्राचे यथार्थ छायाचित्रण त्यांच्या ‘पहावा विठ्ठल’ या 2011 मधील पुस्तकाच्या माध्यमातून देशालाच नव्हे तर जगाला भूरळ घातली. आपल्या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून दुष्काळी भागातील शेतकरी आणि वन्यजीव संरक्षणासाठी निधी उभारून त्यांनी मदत केली.
योगदान

शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शिवसेनेला अधिक सर्वसमावेशक करतानाच आधुनिकतेशी त्यांनी शिवसेनेला जोडले. युवक, कामगार आणि शेतकरी यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी राज्यभर चालविलेल्या विविध आंदोलनांना यश आले.
80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या धोरणाने कार्य करणाऱ्या शिवसेनेच्या समाजकारणाची दखल गिनीज बुकने घेतली आहे.
श्री. ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मलेरिया आजारासाठी चाचणी आणि उपचार केंद्र सुरू करून गरजूंसाठी औषध पुरवठाही सुरू केला. 

मुंबईमधील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने अनेक रूग्णालयांचे निर्माण.
विविध रक्तदान महाशिबिरांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण समाजकार्याची पायाभरणी.
२००२ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे प्रचार प्रमुख  म्हणून जबाबदारी आणि विजयाचे शिल्पकार. महाराष्ट्रात पक्षविस्तार केल्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला यश. गेल्या पाच वर्षांपासून राज्यातील  आणि केंद्रातील सरकारांमध्ये शिवसेना एक प्रमुख घटकपक्ष म्हणून सहभागी. राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाला भरघोस यश.
राज्य आणि केंद्र शासनाकडून आवश्यक ती मदत न मिळाल्याने श्री. उद्धव ठाकरे यांनी २००७ मध्ये विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी यशस्वी मोहीम राबवली. 
श्री. उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कल्याणावर लक्ष केंद्रीत करीत आपल्या पक्षाचा विस्तार वाढविला आणि राज्यानेही त्यांचे नेतृत्व स्वीकारले.
संवेदनशील लेखक, कवी, अभ्यासू आणि छायाचित्रकार असलेल्या श्री. उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणले आणि पक्षाला आजचे सुसंघटित रुप दिले. महाराष्ट्राला विविध आघाड्यांवर पुढे घेऊन जाणारे नेतृत्व श्री. उद्धव ठाकरे यांच्या रूपाने लाभले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments