- विभाग नियंत्रकांची तातडीने निलंबनाची कारवाई
तासगाव प्रतिनिधी दि.२९
तासगाव आगाराच्या महिला अधिकारी सौ मीना पाटील वाहतूक नियंत्रक यांना टिकटॉक व्हिडिओ बनवणे महागात पडले आहे. संबंधित व्हिडिओ कृष्णाकाट युट्युब चॅनेल वरून ‘व्हायरल’ झाल्यानंतर लगेच दुपारी साप्ताहिक ‘जनतांडव’ने हे वृत्त सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केले होते. वायरल व्हिडिओची व सदरच्या बातमीची विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी दखल घेत सौ मीना पाटील यांच्या वर निलंबनाची कारवाई केली आहे. शिवाय त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू आहे, अशी माहिती ताम्हणकर यांनी दिली.
यासंदर्भात सौ मीना पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही.
परंतु सदरचा व्हिडिओ हा त्यांनी घरी बसून तयार केला होता अशी माहिती प्राप्त झाली आहे. तसेच त्यांचे पती एसटी महामंडळाच्या तासगाव आगारांमध्ये कार्यरत असून ते एका मान्यताप्राप्त संघटनेचे पदाधिकारी आहेत. एस टी महामंडळ मध्ये सध्या दोन-तीन संघटना कार्यरत असताना त्यांच्यातील अंतर्गत मतभेद हे जग जाहीर असतात अशातच त्यातील मतभेदांमुळे हा प्रकार पुढे आल्याची चर्चा एसटी महामंडळाचे कर्मचारी दबक्या आवाजात करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यासंदर्भात दैनिक जनमत चे प्रतिनिधींनी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उघड बोलण्यास नकार दिला आहे लवकरच या संदर्भात संघटनेच्यावतीने खुलासा करण्यात येईल असे सांगितले आहे. परंतु अशा वरिष्ठांनी एका अधिकाऱ्यावर केलेल्या कारवाईमुळे तासगाव आगारा सह सांगली जिल्ह्यातील एसटी महामंडळातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यात एकच खळबळ माजली आहे. तर या कारवाईची उलटसुलट चर्चाही सुरू झाली आहे.
तासगाव आगाराच्या वाहतूक निरीक्षक सौ मिना पाटील यांच्यावर टिक टॉक व्हिडिओ बनवण्याच्या कारणास्तव विभाग नियंत्रकांनी तातडीने निलंबनाची कारवाई केलेली आहे. यासंदर्भात त्यांनी हा टिक टॉक व्हिडीओ ऑफिसमध्ये तयार केला आहे का? कारण लॉक डाऊन मुळे एसटी महामंडळाचे कामकाज गेले दोन महिने पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे डेपो बंद असताना व्हिडिओ कसा बनविला किंवा त्यापूर्वी त्यांनी बनवला होता काय.. हे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणे गरजेचे आहे. व सदरचे अधिकाऱ्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता ही वरिष्ठ अधिकारी यांनी घेणे गरजेचे आहे. अशी चर्चा सध्या तासगाव आगारातील ड्रायव्हर, कंडक्टर व कर्मचारी दबक्या आवाजात नाव न छापण्याच्या अटीवर करीत आहेत.