धाराशिव दि.२२ (प्रतिनिधी) – शहराचे विद्रूपीकरण वाढवण्यात अनाधिकृत बॅनरचा सर्वाधिक समावेश असल्याने शहरातील अनधिकृत बॅनरवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांचे आदेश असताना सुद्धा शहरात अनधिकृत बॅनर झळकत असल्याचे दिसून येत होते. अनधिकृत बॅनर थेट नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोरही लावल्याचे दिसून येत आहे मात्र याकडे कारवाई करण्यात अधिकारी सोयीस्कर दुर्लक्ष करत असतात. शहरात मिळेल त्या ठिकाणी राजकीय पक्ष,दुकानदार, विविध राजकीय संघटना, आणि खाजगी क्लासेसचे अनधिकृत बॅनर झळकत आहेत.असे लावण्यात आलेले बॅनर काढून नगरपालिका जप्त करून कारवाई करत आहे.
जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी २२ मे रोजी आदेश काढून नागरी क्षेत्रातील बॅनर, पोस्टर, होर्डिंगवर क्यू आर कोड बंधनकारक केलेले होते.तसेच बॅनर बसविण्यासाठी आय डब्ल्यूबीपी पोर्टलच्या माध्यमातून ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध केलेले आहे तरीसुद्धा शहरातील एकाही बॅनरवर अद्यापपर्यंत क्यू आर कोड लावण्याचे दिसून आले नाही. तसेच मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयसमोर राजकीय पक्षाच्या नेत्यांची बॅनर झळकल्याचे दिसतात.या बॅनर वर सुध्दा क्यु आर कोड लावलेले नसतात. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला बॅनरवाल्यांकडून केराची टोपली दाखवली जाते.
शहरातील मध्यवर्ती शासकीय इमारतीच्या परिसरात सिग्नल यंत्रणा बसविण्यात आलेले आहे ही सिग्नल यंत्रणा काही तांत्रिक अडचणीमुळे बंद आहे पण त्या सिग्नल यंत्रणेचा उपयोग बॅनर वांल्याकडून बॅनर बसवण्यासाठी सध्या केला जात आहे.
नगरपालिकेकडून काढण्यात आलेले बॅनर वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.