आज लोकार्पण, आयुक्त नितीन कापडणीस यांची संकल्पना
सांगली- प्रतिनिधी
करोना महामारीचा प्रभावीपणे सामना करता यावा व बाधितांवर यशस्वी उपचार करता यावेत, यासाठी सांगली महापालिकेच्यावतीने तब्बल १२० खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून अवघ्या सात दिवसात उभारलेल्या या रुग्णालयाचे उद्या गुरुवारी लोकार्पण करण्यात येत आहे.
नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र ताटे, मुख्य अभियंता आप्पा हलकुडे व शाखा अभियंता वैभव वाघमारे यांच्या टीमने रात्रंदिवस अहोरात्र प्रयत्न करुन या रुग्णालयाच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले. या रुग्णालयात मनपा क्षेत्रातील रुग्णांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मनपा क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या करोना बाधित रुग्णांना उपचारासाठी शासकीय अथवा खासगी रुग्णालयात खाटाच मिळत नसल्याची ओरड होत असतानाच नितीन कापडणीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी मनपाचे कोविड रुग्णालय उभारण्याचे शिवधनुष्य उचलले होते. त्यासाठी सांगली- कोल्हापूर रस्त्यावरील आदिसागर सांस्कृतिक भवनाची जागा निश्चित करुन प्रत्यक्ष कार्यवाहीस सुरुवात केली होती. या कोविड रुग्णालयात १०० ऑक्सिजनयुक्त खाटांची व्यवस्था असून २० खाट हे कोविड संशयित रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या कोविड रुग्णालयात मनपा कर्मचारी २४ तास तैनात राहणार असून १४ फिजिशन, सात मानसोपचार तज्ञ, २४ निवासी वैद्यकीय अधिकारी व ठराविक तासाला २२ जीएमएम वार्ड बॉय, लॅब व एक्स- रे टेक्निशियन, सहा स्वच्छता कर्मचारी व एक स्वच्छता निरीक्षक यासह २४ तास ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका सज्ज असणार आहे. या रुग्णालयातील कोविड रुग्णांची केंद्र व राज्य शासनाच्या सर्व संकेतस्थळावर नोंद राहणार आहे. या रुग्णालयासाठी समाजातील दानशूर व्यक्ती व विविध सामाजिक संस्था- संघटना यांनी रोख स्वरुपात आठ लाख रुपयांची, तर १५ लाख रुपये किंमतीची वस्तूरुपी मदत केली आहे. मनपाचे सर्व सदस्यही आपले मानधन देण्याच्या विचारात असून अधिकारी- कर्मचारी व शिक्षकांनी आपला एक दिवसाचा असा १८ लाख रुपयांची मदत या रुग्णालयासाठी देऊ केली आहे. या रुग्णालयात दाखल रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार असून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत. याशिवाय या रुग्णांची भोजन व्यवस्थाही मोफतच असणार आहे. या पत्रकार बैठकीस आदिसागर सांस्कृतिक भवनचे अध्यक्ष शशिकांत पाटील व सचिव अजितकुमार पाटील आदी उपस्थित होते.