भूम (प्रतिनिधी)येथील पोलीस स्टेशनची तीन टन गोमांस व नऊ लाख रुपयाची बनावट दारु वाहतूक करणार्यावर कारवाई. येथील पोलिस स्टेशनला नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी व त्यांचे सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी अवैध कत्तल करून गोमांस वाहतूक करणाऱ्या व नऊ लाख रुपयाची बनावट दारूची वाहतूक करणाऱ्या अशा दोन वेगवेगळ्या धडाकेबाज कारवाई केल्याने अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांनी दि.०८ रोजी पत्रकार परिषद घेत वरील दोन्ही वेगवेगळ्या गुन्ह्यातील माहिती देताना सांगितले की, भूम ते नगर या रस्त्यावर पाथरूड गावाजवळ खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार करमाळा येथून एक आयशर टेम्पो गोमांस घेऊन वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांच्यासह त्यांच्या पथकाने सापळा रचून पाथरूड गावाजवळ नळीवडगाव फाट्यावर वाहनांची तपासणी करीत असताना एक आयशर टेम्पो एम.एच. ४२ बी. एफ. २१६८ या गाडीला तपासले असता या गाडीमध्ये जवळपास तीन टन गोमांस आढळून आले. याबाबतची चौकशी केली असता त्यांनी वाहन चालक व गाडीतील अनोळखी व्यक्तीने सांगितले की या गाडीमध्ये गोमांस आहे. यावरून पोलिस पथकाने गाडी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणून आरोपी अटक करून गुन्हा नोंद केला आहे.तसेच दुसऱ्या गुन्ह्यांतही खबर्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार गोवा येथून एक चार चाकी टेम्पो गोवा बनावट्याची दारू पंढरपूर, परांडा, बार्शी मार्गे भूमवरून कुंथलगिरी मार्गे बीड जिल्ह्यातील नांदूर, केज या गावी जाणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून शहरातील साहिल कॉम्प्लेक्स समोरील साबळे चहा स्टॉल समोर वाहन तपासले असता.यावेळी एक अशोक लिलँड कंपनीचे एम. एच. ४३ ए.डी. ९९४० या नंबर प्लेटचे वाहन आढळले असता हे वाहन अडवून तपासले. यावेळी प्रथम वाहन चालकाने व सोबत असलेल्या व्यक्तीने उत्तरे देण्याचे टाळले. मात्र पोलीसी खाक्या दाखवताच वाहनांमध्ये गोवा बनावट दारूचे जवळपास ५५ ते ६० बॉक्स आढळून आले. यामध्ये मॅकडॉल, नंबर वन, आयबी व रॉयल स्टॅग कंपनीचा माल दिसून आला. याची अंदाजे किंमत गोवा राज्याच्या किंमती प्रमाणे २ लाख २२ हजार रुपये तर महाराष्ट्र राज्याच्या किंमती प्रमाणे सुमारे ४ लाख रुपये व टेम्पो किंमत ३ लाख रुपये असा एकूण साधारन ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. सदरचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरू होते. यावेळी पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत तवार, पोलीस कर्मचारी राकेश पवार, अजित कवडे, राव, सावंत , मलंगेवार, घाडगे यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली आहे.