सलगरा,दि.८(प्रतिक भोसले)
तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथील बालाजी बब्रुवान गुंजकर,(वय २६वर्षे) यांच्या घरात घुसून अज्ञात चोरट्याने सोन्या – चांदीचे दागिने आणि रोख रक्कम ११ हजार रु. असा एकूण जवळपास १ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी दि.७ जुलै रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन दुसऱ्या दिवशी पोलीस उपअधीक्षक रमेश बरकते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि.७ जुलै रोजी फिर्यादी बालाजी गुंजकर यांचे आई – वडील हे सकाळी ११:०० वा.सु. घराला कुलूप लावून शेताकडे पेरणी करण्यासाठी गेले होते. आणि फिर्यादी हे उस्मानाबाद (धाराशिव) मध्ये होते. साडेतीन वा.सु. फिर्यादीची आई मंदाबाई गुंजकर या जेव्हा घरी आल्या तेव्हा त्यांना कोणी तरी घराचे कुलुप तोडून बाजूला फेकलेले दिसले. नंतर मंदाबाई यांनी घरात जाऊन बघितले तेव्हा बेडरूम मधील कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. अशा प्रकारे घरी कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने दुपारी एक ते तीन वाजण्याच्या दरम्यान घराचे कुलूप तोडून घरात घुसून बेडरूम मधील कपाटातील तिजोरीवर डल्ला मारून सोन्याच्या ६ अंगठ्या, सोन्याचे नेकलेस, चांदीचे वाळे, चांदीची चैन, आणि रोख रक्कम ११ हजार रु. असा एकूण जवळपास १ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेची माहिती मिळताच दुसऱ्या दिवशी दि.८ जुलै रोजी पोलीस उपअधीक्षक रमेश बरकते यांच्या सह पोउपनि आर.के.पटेल, पो.हे.कॉ. विलास जाधव गंधोरा गावचे पोलीस पाटील गजेंद्र कोनाळे, आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून पाहणी केली. भरदुपारी झालेल्या या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या मुळे या वर योग्य ती खबरदारी म्हणुन गावातील मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही बसवून पोलीस गस्त वाढविण्याची मागणी नागरिक करत आहेत.
त्या दृष्टीने तपास सुरू झालेला आहे, विशेष म्हणजे दुपारी चोरी झाली आहे त्या मुळे आरोपी हा बाहेरचा नसावा कोणी तरी गावातीलच आहे पाळत ठेवून त्याने हे सर्व केलं आहे. असा आमचा अंदाज आहे. घरफोडी, चोऱ्या अशा गोष्टींना आळा बसावा कुठे तरी अंकुश लागावा म्हणुन आम्ही जनजागृती करून बैठका घेऊन बसवंतवाडी व गंधोरा येथे सुचना दिल्या होत्या, तेथील ग्रामपंचायतींनी सीसीटीव्ही बसविले आहेत. सलगरा (दि.) आणि किलज येथे बैठका घेऊन मुख्य चौक आणि आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याबाबत ग्रामपंचायतींना सूचना दिलेल्या आहेत. अशी माहिती नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी दिली.
सहायक पोलीस निरीक्षक – सिद्धेश्वर गोरे
१५ व्या वित्त आयोगातून आम्ही सीसीटीव्हीचे काम करणार आहोत त्याचं पत्र आताच आम्हाला मिळालं आहे त्या साठी थोडा वेळ लागेल तीन महिन्यानंतर सिसीटीव्ही बसविण्याचे काम चालू होईल. तो पर्यंत नागरिकांनी खबरदारी घ्यावी विशेष म्हणजे हि घरफोडी दुपारी झाली आहे. तेव्हा गावात गस्त घालावी तरी कशी, जर चोरी रात्री झाली असती तर गस्त घातली असती. या पूर्वी जे दोन गोरखे होते त्यांना पण कोणी सहकार्य करत नव्हतं म्हणून ते निघून गेले. तेव्हा या मध्ये निष्काळजीपणा न करता जागरूकता बाळगा, सावध रहा, कोणी संशयित व्यक्ती दिसल्यास पोलिसांना तात्काळ कळवा. तेव्हा आता मी तर एवढच सांगेन की, थोडी काळजी घ्या, अन् घरफोड्या टाळा.
उपसरपंच – प्रशांत लोमटे