उस्मानाबाद,दि.23(जिमाका):- कोविन ॲपवर नोंद केलेल्या वैद्यकीय सेवांशी संबधित शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर यांना पहिल्या टप्यात कोविड-19 ची लस दिली जाणार आहे. या दृष्टीने उस्मानाबाद जिल्हयाची तयारी पुर्णत्वास येत आहे. जिल्हयाचा आरोग्य विभाग यासाठी जोमाने तयारी करत आहे. परंतु या लसीबाबत काही घटक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतील त्यावर जनतेने विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे केले.
कोरोना लसीकरण मोहिम राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा कृती दल (Task Force) च्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. डी.के. पाटील, पोलिस उपअधिक्षक मोतीचंद राठोड, डॉ. स्मिता शहापूरकर, डॉ. मिना जिंतूरकर ,सुविधा हॉस्पीटलचे डॉ. स्वप्नील यादव, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी तथा जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. के.के. मिटकरी, कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डॉ. रफिक अन्सारी आदी उपस्थित होते.
कोविड-19 च्या अनुषंगाने लसीकरणाबाबत राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्हयात तयारी करण्यात येत आहे. पहिल्या टप्याची तयारी पूर्ण झाली आहे. कोविड लसीची साठवणूक करण्यासाठी जिल्हयात सद्यस्थितीत 57 शितसाखळी केंद्र आहेत. या 57 शितसाखळी केंद्रामध्ये 77 आयएलआर आहेत. या शितसाखळी केंद्रामध्ये 78 डिपफ्रिजर आहेत. 96 कोल्ड बॅाक्स उपलब्ध आहेत. ही सर्व साधनसामग्री सुस्थितीत आहे. याशिवाय जिल्हयातील सर्व शितसाखळी केंद्रात 1748 व्हॅक्सिन कॅरिअर उपलब्ध् आहे, अशी माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे डॉ. मिटकरी यांनी यावेळी दिली.
लसीकरणाची प्रक्रिया निवडणूक प्रक्रियेप्रमाणे करण्यात येणार आहे.पहिल्या दालनात लसीकरणासाठी आलेल्यासाठी प्रतिक्षा कक्ष असेल तेथे त्यांची ठरल्याप्रमाणे ओळख पटविली जाईल. नंतर त्यांना लसीकरण कक्षात पाठवले जाईल. लसीकरण झाल्यानंतर संबधितास तिसऱ्या कक्षात 30 मिनीटे डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जाईल. 30 मिनीटांनी त्या कक्षातून त्यांना बाहेर पडता येईल,अशीही माहिती दिवेगावकर यांनी यावेळी दिली.
लसीकरण केंद्रात प्रवेश करण्याचा मार्ग आणि लसीकरण झाल्यानंतर बाहेर पडण्याचा मार्ग वेगळा असेल सोशल डिस्टन्स आणि इतर सर्व खबरदारी घेऊन लसीकरण केले जाईल. पोलीस, होमगार्ड, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक आदींची नेमणूक यासाठी केली जाणार आहे. को-विन ॲपवर नोंद केलेल्यानाच ठराविक दिवशी, ठरावीक वेळी लसीकरण केंद्रावर बोलविण्यात येणार असल्याने लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. तेव्हा ज्यांनी को-विन ॲप वर नोंद केली नाही किंवा ज्यांना लसीकरणासाठी बोलवलेले नाही अशा नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये, असे आवाहन श्री.दिवेगावकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात नियमित अधिकारी कर्मचारी संख्या 1288 असून अंतर्गत कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या 658 आहे. आशा सेविकांची संख्या 1207 असून आशा गटप्रवर्तकांची संख्या 66 आहे. अंगणवाडी सेविका 1866 असून,अंगणवाडी मदतनीस 1648 आहेत. आरोग्य सेवा देणारे इतर बाह्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांची संख्या 198 आहे. जिल्ह्यात शहरी भागात 768 तर ग्रामीण भागात 297 खासगी दवाखाने आहेत. को-विन ॲपवर आतापर्यंत 8268 जणांनी जिल्ह्यातून नोंद केली आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय, आयुर्वेदिक रूग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालय येथे लसीकरण केंद्र असतील, अशीही माहिती जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी यावेळी दिली .
जिल्ह्यातील कोविड-19 लसीकरण शितसाखळी ही उत्तम दर्जाची ठेवून लसीचे वितरण,लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लसीचे नियोजन इतर माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी दिली तर शहरी भागातील लसीकरणाची सविस्तर माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डी. के. पाटील यांनी यावेळी दिली. या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत एन.एस.राताळ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी( महिला व बालकल्याण) बी.एस.निपाणीकर, जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे, जिल्हा समाज कल्याण निरीक्षक ए.ए.जगताप,माध्यमिक शिक्षणाधिकारी गजानन सुसर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बोडके, आय. एम. ए. संघटनेचे अध्यक्ष डॉ.सचिन देशमुख, फॉक्सी संघटनेचे अध्यक्ष डॉ.एस.एस.सरडे,आय.ए.पी. संघटनेचे अध्यक्ष डॉ. मुळे, शल्यचिकित्सक सर्वश्री डॉ. तानाजी लाकाळ, डॉ. प्रविण डुमणे, डॉ.गजानन परळीकर, श्री आप्पासाहेब सोनवणे इत्यादी उपस्थित होते.
*****
वृत्त क्रमांक-814 दिनांक-23 डिसेंबर -2020
गायरान जमिनीच्या विकास
योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
उस्मानाबाद,दि.23(जिमाका):-केंद्रशासनाच्या राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत गायरान जमीनीच्या विकासासाठी हेक्टरी 30 हजार ते एक लाखापर्यंत निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये कुंपन ,जमीन सपाटीकरण , कृषी अवजाराची खरेदी ,सिंचन सुविधा , बियाणे आणि खते खरेदी, लागवड खर्च, पर्यवेक्षिय खर्च, किरकोळ खर्च ईत्यादी बाबीचा समावेश आहे. गायरान जमीन विकासाची आवश्यकता लक्षात घेवून या योजनेचे प्रस्ताव महाराष्ट्र शासनामार्फत केंद्र शासनास सादर करावयाचे आहेत. शासकीय विभागामार्फत प्रस्ताव सादर करीत असताना संबधित जमीनीच्या सात बाराची प्रती व ग्रामसभेचा ठराव ईत्यादी आवश्यक सहपत्रे प्रस्तावासोबत सादर करावी. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंर्वधन उपायुक्तांनी केले आहे.
जिल्हयातील अशासकीय सेवाभावी संस्था , सहकारी संस्था यांच्यामार्फत प्रस्ताव सादर करण्यात येत असल्यास संकेत स्थळावरील मार्गदर्शक सुचनेप्रमाणे संस्थेची सर्व आवश्यक सहपत्रे प्रस्तावासोबत सादर करावी. या योजनेची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या संकेत स्थळा www.ahd.maharashtra.gov.in वर स्किम आणि पॉलीसी यामध्ये नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन व बुकलेट-स्किम पुस्तिका यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शासकीय विभाग , अशासकीय सेवाभावी संस्था , सहकारी संस्था , लाभार्थी संस्था , वैयक्तिक लाभार्थी हे या योजनेचा लाभ घेवू ईच्छित असल्यास सदरील योजनेचे सविस्तर प्रस्ताव नजीकच्या पशुवैधकीय दवाखान्यामार्फत संबधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी ( विस्तार ) पंचायत समिती यांच्याकडे सादर करावे असे अवाहन करण्यात आले आहे . अर्जाचा नमुना आणि सोबत जोडावयाची कागदपत्रे , अटी आणि शर्ती बाबतचा तपशील पशुसंवर्धन विभागाचे संकेत स्थळावर आणि लाभार्थीशी निगडीत असलेल्या नजीकच्या पशुवैधकीय दवाखान्यात आणि संबधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी ( विस्तार ) पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध आहे. अधिकच्या माहितीसाठी पशुसंवर्धन विभागाचे संकेत स्थळ व संबधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी विस्तार आणि नजीकच्या पशुवैधकीय संस्थेचे संस्थाप्रमुख यांच्याशी संपर्क साधावा.