सांगली- प्रतिनिधी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आमदार नाना पटोले रविवारी प्रथमच सांगली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. कधीकाळी काँग्रेसचा अभेद्य गड असलेला सांगली जिल्हा आता राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या पूर्णपणे कब्जात आहे. केवळ गटा- तटाच्या राजकारणात अडकलेल्या नेत्यांना एकसंघ करतानाच उध्दवस्त अशा या सांगली गडाच्या पुर्ननिर्माणासाठी नाना पटोले कोणता कानमंत्र देतात ? याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या कारकिर्दीत सांगली जिल्हा हा काँग्रेसचा एकमुखी अभेद्य गड होता. मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम व मदन पाटील अशा दोन गटात काँग्रेस विभागली गेली. आता तर काँग्रेसची कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, मदन पाटील व वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना अध्यक्ष विशाल पाटील अशा तीन गटात विभागणी झाली आहे. या गटबाजीचा मोठा फटका गत दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बसला, तर हातातोंडाशी आलेला सांगली विधानसभा मतदारसंघातील शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या विजयाचा घास हिरावला गेला.
या गटबाजीमुळेच सांगली महापालिकेत संख्याबळ जादा असतानाही महापौर पदावर पाणी सोडावे लागले होते व केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा दिखाऊपणा करावा लागला होता. वास्तविक, अंतर्गत गटबाजीमुळेच आपल्या गटाचा नाही, तर दुसऱ्या गटाचाही महापौर होऊ द्यायचा नाही, या खेळीमुळेच काँग्रेसची पीछेहाट झाली होती. आता महाविकास आघाडीची राज्यात सत्ता असतानाही सांगली जिल्ह्यातील काँग्रेस गटबाजीत विखुरल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे ही गटबाजी मोडीत काढण्याचे आव्हान नाना पटोले यांच्यासमोर असणार आहे.
या पार्श्वभूमीवर नाना पटोले रविवारी प्रथमच सांगली जिल्हा दौर्यावर येत आहेत. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साहाचे वातावरण असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले. रविवारी सकाळी साडे दहा वाजता नाना पटोले यांचे हेलिकॉप्टरने कवलापूर येथे आगमन होईल.
त्यानंतर पृथ्वीराज पाटील यांच्या निवासस्थानी नाना पटोले सदिच्छा भेट देणार आहेत. साडे अकरा वाजता इनाम धामणी येथे आयोजित नागरी सत्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. दुपारी दोन वाजता काँग्रेस नेत्या श्रीमती जयश्री मदन पाटील यांच्या निवासस्थानीही नाना पटोले सदिच्छा भेट देणार आहेत. दुपारी साडे तीन वाजता सांगली जिल्हा काँग्रेस समितीला भेट देऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. त्यावेळी केवळ गटा- तटाच्या राजकारणात अडकलेल्या नेत्यांना कोणता कानमंत्र देतात ? याकडे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.