सलगरा,दि.२२(प्रतिनिधी)
‘तुम्ही सोशल मीडियाचा की, सोशल मीडिया तुमचा’ वापर करून घेतय हे पण बघण तितकच महत्वाचं आहे. शिक्षण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात यशस्वी होऊन विद्यार्थ्यांनी आईवडिलांचे नावलौकिक करावे. शिक्षणावर पूर्ण लक्ष केंद्रित करुन जास्तीत जास्त गुणवत्ता प्राप्त करावी. होता होईल तितका सोशल मीडियाचा वापर कमी करावा. सोशल मीडियाचा वापर विद्यार्थ्यांनी आपल्यावरील ताण कमी करण्यासाठी करावा, तो वाढवण्यासाठी नाही, तेव्हा विद्यार्थ्यांनो! ‘तुम्ही सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नका’ असे प्रतिपादन बोलताना नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी केले.
तुळजापूर तालुक्यातील येडोळा येथील सतिश पवार आणि खानापूर येथील विश्वजित गायकवाड या दोघांची २०२० च्या राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सलगरा (दि.) येथील कै.अंबुमाता कनिष्ठ महाविद्यालयात (दि.२०जुलै) रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अंबुमाता आणि संतराम लोमटे या दोन्ही महाविद्यालयांच्या पुढाकाराने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि ‘सोशल मीडिया संदर्भात मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशासकीय सेवेत रूजू होण्यासाठी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना सामोरं जावं लागतं. मात्र विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी कठोर मेहनत घेण्याची तयारी ठेवावी. यूपीएससी – एमपीएससी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करायचा, या परीक्षांचं स्वरुप कसं असतं, वयोमर्यादा काय असते, अभ्यासाचं नियोजन कसं असाव, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतात. यांसारख्या विषयांवर कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती सतीश पवार आणि विश्वजित गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सर्व सकारात्मक गोष्टी जरी सोशल मीडियाद्वारे घडून येत असल्या तरी याची एक दुसरी बाजू पाहायला मिळते. ती म्हणजे या सर्व गोष्टींचा भडीमार एकाच वेळी एका अभ्यास विषयासाठी उपलब्ध असणार्या विविध वेबसाईट्स, ऑनलाईन लेक्चर सोबतचे हजारो लेख, व्हिडिओ यामध्ये अभ्यासकांची वेगवेगळी मते विद्यार्थ्यांचा गोंधळ निर्माण करतात. यामध्ये कोणते सत्य याचा संभ्रम निर्माण होतो. माहिती मिळते पण ज्ञान मिळते का..? पुस्तक डाऊनलोड करण्याची संख्या वाढत आहे, पण ते वाचलं जातं का..? या सर्व गोष्टी तपासणे गरजेचे आहे. फक्त संग्रहासाठी आणि शेअर करण्यासाठी विविध शैक्षणिक अॅप्स मोबाईलमध्ये दिसत आहेत. हे नाकारून चालणार नाही, यामध्ये अलीकडे आणखी एक मोठी समस्या उभी राहिली आहे. ती म्हणजे स्मार्टफोनचा वापर करून, परीक्षा सुरू असताना प्रश्नपत्रिका परीक्षा कक्षाबाहेर पाठवणे. त्याद्वारे कॉपी करणे. हे सर्व पर्यवेक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्या परीक्षार्थ्यावर गुन्हा नोंदवला जातो. त्यानंतर पुन्हा त्या विषयाचा पेपर घ्यावा लागतो. नवीन यंत्रणा राबवावी लागते. जे विद्यार्थी अभ्यास करून परीक्षेला सामोरे जातात त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. स्मार्ट वापराबरोबरच त्याचा स्मार्ट दुरुपयोग करणारा वापरकर्ता दिसत आहे. यालासुद्धा आळा बसला पाहिजे. शाळेपासून मुलांना मोबाईलद्वारे शिक्षण दिलं गेलं तर त्याच्या अतिवापरामुळे मानसिक ताणतणाव वाढून आरोग्य धोक्यात येऊ शकतं. याचा परिणाम घातक आहे. तेच विद्यार्थ्यांच्या बाबतीत होताना दिसत आहे. शेवटी कोणत्याही गोष्टींचा अतिवापर शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी वाईटच असतो, असे मत बोलताना काही जणांनी व्यक्त केले.
या वेळी सरपंच विष्णू वाघमारे, उपसरपंच प्रशांत लोमटे, उत्तमराव लोमटे, पोलीस नाईक एस.आर.सगर, ग्रा.पं. सदस्य जीवन लोमटे, प्राचार्य ज्ञानेश्वर लोमटे, प्रा.प्रताप मोरे, प्रा.किरण लोमटे, प्रा.अनिल लोमटे, प्रा.बालाजी फुलमाळी, प्रा.फयाज पटेल, प्रा.महादेव लोमटे, प्रा.सिताराम चव्हाण, प्रा.सुरेश सोमवंशी, प्रा.मारूती सुर्यवंशी, प्रा.विक्रम कांबळे, प्रा.महेश ढेकणे, जि.प.शाळेचे शिक्षक सुरेश वाघमोडे, अजित लोमटे, राहुल काटवटे, सुनील अंदगावकर, सागर मुळे, तात्या केदार, राहुल बोधणे आणि रमेश कांबळे आदी उपस्थित होते.