तासगाव, नागेवाडी च्या शेतकऱ्यांचा एक रुपयाही बुडवणार नाही-खासदार संजय काका पाटील यांची ग्वाही

0
80


ऊस बिले देण्यास सुरुवात : तासगाव, नागेवाडी कारखान्याचे उपप्रकल्प सुरू होणार

तासगाव प्रतिनिधी

    सध्या कारखानदारी अत्यंत अडचणीत आहे. मात्र तरीही ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळावी, या भावनेतून तासगाव आणि नागेवाडी हे दुष्काळी भागातील कारखाने अत्यंत अडचणीतून मार्ग काढून सुरू केले आहेत. हे कारखाने चालवताना अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मात्र, ज्या शेतकऱ्याच्या जीवावर हे कारखाने सुरू आहेत त्यांचा एक रुपयाही बुडवणार नाही. आजपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यावर बिले वर्ग करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवाय या दोन्ही कारखान्यांचे उपप्रकल्पही लवकरच कार्यान्वित होणार आहेत, असेही ते म्हणाले.    खासदार पाटील म्हणाले, तासगाव आणि नागेवाडी हे दोन्ही कारखाने दुष्काळी भागात आहेत. मात्र तरीही या भागातील विकासाला गती मिळावी, शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळावा, कामगारांच्या हाताला काम मिळावे, या भावनेतून हे कारखाने चालवत आहोत. सद्यस्थितीला कारखानदारी अत्यंत धोक्यात आली आहे. कारखाने चालवणे तोंडचे काम नाही. कारखाने सुरळीत चालवून शेतकऱ्याच्या उसाला चांगला दर द्यायचे असेल तर कारखान्यात उपप्रकल्प सुरू करणे गरजेचे आहे.तासगाव आणि नागेवाडी कारखान्यांना इथेनॉल, वीज व डिस्टलरी प्रकल्पांना केंद्र शासनाची परवानगी मिळाली आहे. हे प्रकल्प सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद करावी लागते. त्यासाठी एका मोठ्या बँकेकडे पाठपुरावा केला होता. मात्र त्या बँकेने ऐनवेळी कर्ज नाकारले. त्यामुळे शेतकऱ्यांची बिले देण्यास थोडा उशीर झाला. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मात्र आजपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यावर बिले वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या काही दिवसात सर्व शेतकऱ्यांची देणी देऊ. कोणाचाही एक रुपयाही बुडवणार नाही.  ते म्हणाले, एका कारखान्यात सुमारे ९०० कामगार काम करतात. सुमारे दोन हजार कुटुंबांची उपजीविका या दोन्ही कारखान्यांवर सुरू आहे. त्यामुळे तोट्यात चालणारी कारखानदारी फायद्यात आणण्यासाठीच उपप्रकल्प सुरू करीत आहोत. येत्या काळात हे प्रकल्प सुरू झाल्यास कारखानदारी फायद्यात येऊन शेतकरी, कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here