21वर्षांपासून सुरु असलेली बस बंद ; प्रवासी संतप्त
पारा (राहुल शेळके ):”वाट पाहीन पण एस टी नेच जाईन. “असे खेडेगावातील प्रवासी ब्रीदवाक्य घेऊन बस ची वाट पाहत तासन तास थांबतात. पण तीच बस जर दोन दोन दिवस जर आली नाही तर त्या प्रवाश्याना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो.वाशी तालुक्यातील पारा येथे भूम आगाराची एस टी बस भूम बार्शी मुक्कामी पारा ही बस भूम आगार प्रमुखांनी बंद केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून याबाबत प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
भूम आगारातील भूम बार्शी पारा मुक्कामी ही बस पारा या गावातून सकाळी साडे सहा वाजता निघते. या बसला प्रवाशी संख्या खुप असते कारण या गाडीने बार्शी ला दवाखान्यात जाणाऱ्या पेशंट ची गर्दी असते. ही बस सायंकाळी पाच वाजता बार्शी हून निघते त्यावेळी सुद्धा खेडोपाडी चे प्रवाशी गाडीची वाट पाहत असतात. गेल्या दोन दिवसापासून भूम आगार व्यवस्थापक पंढरपूरे यांनी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून ही एस टी बस दोन दिवसापासून बंद केली आहे.विशेष म्हणजे या बस ची अर्निंग भूम आगारात चांगली आहे. तरीही ही बस का बंद केली याबद्दल कर्मचाऱ्यांच्या मनात सुद्धा साशंकता आहे. ही बस बंद केल्यामुळे पारा व अन्य ठिकाणच्या खेडेगावातील रुग्णांची तसेच प्रवाशांची गैरसोय होऊन त्या प्रवाश्याना खाजगी वाहन करून बार्शीला जावे लागतं आहे. या गंभीर गोष्टीकडे एस टी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी लक्ष देऊन भूम पारा बार्शी ही मुक्कामी बस सुरळीत सुरु करून प्रवाशांच्या विश्वासाला पात्र असणाऱ्या एस टी बस ने योग्य सेवा दयावी अशी मागणी पारा व परिसरातील प्रवाशी करत आहेत.