सलगरा,दि.१३(प्रतिनिधी)तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) सह परिसरात गणेशोत्सवा नंतर दोन दिवसांनी म्हणजेच १२ सप्टेंबर (रविवार) रोजी गौराईचे घरोघरी आगमन झाले आहे. गंधोरा, किलज, वडगाव, वाणेगाव व जवळगा आदी परिसरातील गावांमध्ये गौरी आणण्यासाठी सुवासिनींची लगबग दिसुन आली. या वर्षीही कोरोनाचे सावट असले तरी गणपती पाठोपाठ महिलांनी गौरीपूजन हा महत्वाचा सण घराघरातून मोठ्या भक्तिभावाने मंगलमय वातावरणात गौराईंचे स्वागत करत साजरा केला आहे.
पहिल्या दिवशी घरातील तुळशीपासून पावला-पावलांनी या गौरींना घरात आणले जाते. या वेळी
गौरी आली, सोन्याच्या पावली,
गौरी आली, चांदीच्या पावली,
गौरी आली, गाई वासराच्या पावली,
गौरी आली, पुत्र-पोत्रांच्या पावली
असे म्हणत गणपतीच्या आईचे म्हणजेच गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत केले जाते. अशा प्रकारे विधिवत गौरी घरात आणून घरात आल्यावर गौरीला संपुर्ण घर दाखवले जाते व गणेशाच्या शेजारी तीची विधिवत प्राण प्रतिष्ठापना केली जाते.आता घरोघरी गौराईचे आगमन झाले असुन तिची विधिवत पुजा करून तिला एक दिवस गोडा व एक दिवस तिखटाचा नैवेद्य दाखवला जाणार आहे. घरोघरी गौरीचे उत्साहात आगमन झाल्यानंतर सुंदर भरजरी साड्यांनी व दागीन्यांनी साजशृंगार केला, घरोघरी सुंदर आरास करण्यात आली, काही ठिकाणी गौरीला विविध प्रकारच्या पक्वानांचा नैवेद्य दाखविण्यात आला. फराळाचे विविध पदार्थ मांडण्यात आले, या दिवशी महिलांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला, या वेळी शक्तिचे प्रतिक म्हणून पूजल्या जाणार्या या गौरीकडे कोरोना बरोबरच शेतकऱ्यांवर येणाऱ्या विविध संकटाचे निवारण व्हावे या साठी प्रार्थना करण्यात आली.परंपरेनुसार प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा केली जाते. गणेशचतुर्थीला गणपतीची स्थापना केल्यानंतर महालक्ष्मीचे आगमन होत असते. अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया भाद्रपद महिन्यात गौरीची पूजा करतात. तीन दिवस चालणाऱ्या या पूजेची सुरुवात भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्ठीपासून होते. या दिवशी गौरीचे आवाहन केले जाते. दुसऱ्या दिवशी पूजन करून नैवेद्य दाखवला जातो आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच अष्टमीला विसर्जन होते.