उस्मानाबाद-हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने १७ सप्टेंबर रोजी “वारसा स्वातंत्र्याचा” ही कार्यशाळा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे संपन्न झाली. या कार्यशाळेत राज्य अभ्यासमंडळाचे सदस्य तथा परांजपे फाऊंडेशनचे सचिव भाऊसाहेब उमाटे यांनी सादरीकरण केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष,जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,डायटचे प्राचार्य बळीराम चौरे, शिक्षणाधिकारी माध्यमिक गजानन सुसर हे होते.
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा प्रेरक इतिहास शिक्षक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भाऊसाहेब उमाटे यांनी अनेक संदर्भग्रंथाचा, ऐतिहासिक दस्ताऐवजाचा अभ्यास करून पिपिटीच्या साह्याने हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास जिवंत केला. हैदराबाद मुक्तिसंग्रामातील अनेक दुर्मिळ छायाचित्रे पाहायला मिळाली. स्वातंत्र्यसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानीच्या प्रेरणादायी शौर्यगाथा सांगीतल्या. हैदराबाद संस्थानातील,शिक्षण, शेतीव्यवसाय,उद्योगधंदे,कला,सांस्कृतिक वैविध्य याबद्दल सखोल माहीती मिळाली.
याप्रसंगी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनीही संवाद साधला.हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा प्रेरक इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले.इतिहास विषयातून सहिष्णूता जपली जावी.पाठ्यपुस्तकाच्या पलिकडे जाऊन विद्यार्थ्यांनी अध्ययन करायला हवे.मुल्याधिष्ठीत व सुसंस्कारीत पिढी निर्माण व्हावी. यासाठी प्रत्येकाने समाज शिक्षकाची भूमीका निभवायला हवी.जिल्हाधिकारी यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डायटचे प्राचार्य श्री.बळीराम चौरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान शिकेतोड यांनी तर आभार प्रदर्शन डाॅ. दयानंद जटनुरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण डायटमधील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. तांत्रिक सहकार्य आय.टी. विभागाने केले.