उस्मानाबाद – देशभरात बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आज दिनांक 27 सप्टेंबर 2019 रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात आला. हा संप या बँकेतील 4 कर्मचारी संघटना यांच्या एकत्रित फोरम द्वारे आयोजित करण्यात आला. यामध्ये ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्पलॉइज फेडरेशन, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी महासंघ, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना व महाबँक नवनिर्माण सेना या कर्मचाऱ्याच्या सर्व संघटनांनी मिळून या बँकेत नोकर भरती साठी आज देशभरात आपल्या बँकेसमोर निदर्शने केली. या बँकेचा गेल्या 5 वर्षात व्यवसाय हा 3 पटीने वाढला असून गेली 2 वर्ष ही बँक नफा नोंदवत आहे. याच वेळी या बँकेतील लिपिक वर्गातील कर्मचारी संख्या जवळपास 2 हजारांनी कमी झाली, शिपाई पदाच्या 700 हून अधिक जागा रिक्त झाल्या आणि सर्वात तळात काम करणारा सफाई कर्मचारी याची या बँकेत जवळपास 1200 ते 1300 शाखेमध्ये कायमस्वरूपी नेमणूक नाही. बँक कर्मचारी संघटनेने याप्रश्नी मार्च महिन्यात एक दिवसाचा संप घोषित केला होता पण त्याच वेळी देशभरात बँकांच्या खाजगीकरणाचे वारे जोरात वाहत होते आणि याच्या विरोधात देशभरात सर्व राष्ट्रीयीकृत बँकात दोन दिवसाचा संप घोषित केला होता त्यावेळी व्यवस्थापनांनी याबाबत तडजोडीची भूमिका विभागीय कामगार आयुक्त यांच्यासमोर घेऊन संघटनेस हा संप पुढे ढकलण्यास सांगितले.मार्चनंतर या बँकेने दाखविलेल्या ताळेबंदतील आकडेवारीने या बँकेने विविध निकशावर प्रथम क्रमांक मिळविला. बँकेत ठेव वृद्धि , कर्ज वृद्धि , थकीत कर्जाची वसुली, थकीत कर्जाचे प्रमाण कमी करण्यात यश मिळवलेले आहे. या सर्व प्रमुख व्यवसाय वृद्धि च्या निकषांना या बँकेने घवघवीत यश संपादून आपला छोट्या आकारातील राष्ट्रीयीकृत बँकेत पहिला नंबर मिळविला. पण याच वेळी निवृत्ती, मृत्यू, राजीनामे, बढती या अनेक कारणांनी लिपिक वर्गातील संख्या ही जवळपास 2 हजारांनी कमी झाली. आणि गेल्या पाच वर्षात अतिशय नगण्य अशी नोकर भरती या बँकेने केली. अनेक शाखात शिपाई पदावरील काम करणारे कर्मचारी नाहीत, अनेक शाखा कायमस्वरूपी सफाई कर्मचारी नाही, उलटपक्षी बँकेने या पदावर काम करण्यासाठी कंत्राटी लोकांची नेमणूक केलेली आहे. यांना अत्यल्प असा मोबदला देऊन त्यांच्याकडून जादा काम करून घेतले जाते. या स्तरावर काम करणारा तळागाळातील शोषित समाज असून यांचे शोषण केले जात आहे. याविरोधात कर्मचारी संघटना म्हणून गेली दहा वर्ष सातत्याने पाठपुरावा करूनही या जागेवर बँकेने कायमस्वरूपी नियुक्ती केली नाही. देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढत असूनही या बँकांमध्ये नोकर भरती होत नाही, गेल्या दोन वर्षात कोरोना महामारी मुळे जगाची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे, अनेक जण बेरोजगार झाले असून, अनेक खाजगी उद्योगातून नोकर कपात केली जात आहे, या परिस्थितीत सरकारने विविध योजनेद्वारे सामान्यांना आर्थिक मदत करण्यासाठी अनेक विविध योजना या बँकेमार्फत राबविल्या आहेत. त्यामुळे अपुऱ्या कर्मचाऱ्यावर कामाचा ताण वाढून त्यांची मानसिक व शारीरिक स्थिती दयनीय होत आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांना सेवा देताना अनेक अडचणींना सामोरी जावे लागत आहे, त्यामुळे सन्माननीय ग्राहक व कर्मचारी यांच्यात दिवसेंदिवस विसंवाद वाढत आहे, संघटना म्हणून आमची मागणी नोकर भरतीची असून शाखा स्तरावर जर पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाले तर ग्राहकांना अनेक विविध योजनांचा फायदा देताना उत्कृष्ट ग्राहक सेवा दिली जाऊ शकते, त्यामुळे अर्थातच ग्राहक वर्ग समाधानी होईल व बँकेचा व्यवसाय वृद्धि हीसुद्धा निकोप पद्धतीने होऊ शकेल. आज अनेक शाखात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे काम करताना अनेक नियमांना डावलून सेवा दिल्या जात आहेत ज्यातून मोठे धोके निर्माण होण्याची शक्यता आहे, या सर्व गोष्टीचा विचार करून या बँकेच्या उच्च व्यवस्थापनाने त्वरित लक्ष घालून या मागण्या पूर्ण कराव्यात असा आक्रोश आज सर्व कर्मचाऱ्यांत दिसून आला, जर वेळीच बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनानी प्रश्न मार्गी लावला नाही तर पुढील महिन्यात या संघटनेने दोन दिवसाच्या संपाची हाक देऊन ठेवली आहे यावेळी या बँकेतील अधिकारी संघटनाही सोबत येतील अशी आशा संघटनेला आहे तरी वरिष्ठ व्यवस्थापनांनी याप्रश्नी त्वरित लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावा असे आवाहन सर्व संघटनेच्या वतीने कॉम्रेड, सुनील कुलकर्णी उपाध्यक्ष, बँक ऑफ महाराष्ट्र एम्पलॉइज असोसिएशन यांनी निदर्शनाच्या वेळी केले. यावेळी उस्मानाबाद शहरातील आणि आजूबाजूच्या शाखेतील कर्मचारी उपस्थित होते. शहरातील दोन्ही शाखा समोर निदर्शने करून आजचा संप यशस्वी केला.