तासगाव येथे भ्रष्ट प्रशासनाविरोधात हंटरफोड आंदोलन उभारू सर्वपक्षीयांचा इशारा
मतदार संघातील लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालावे अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करू जयंतदादा पाटील यांची टीका
तासगाव प्रतिनिधी
तासगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयातील बेधुंद कारभार चव्हाट्यावर आणल्यानंतर शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे गटाचे तासगाव तालुका प्रमुख प्रदीप माने, विशाल भोसले व शेतकरी असलेल्या सुनील घेवारी यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याविरोधात आज सर्वपक्षीयांनी तासगाव तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढला. मोर्चासमोर बोलताना अनेक वक्त्यांनी भ्रष्ट प्रशासनाचा खरपूस समाचार घेतला. तर भूमी अभिलेखच्या चंद्रकांत शिरढोणे या अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर आसूड ओढले.
येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चास सुरुवात झाली. गणपती मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्कल तासगाव आगार मार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर येऊन धडकला. प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करीत हजारो आंदोलनकर्ते मोर्चात दाखल झाले होते. प्रदीप माने, विशाल भोसले यांच्याविरोधात दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत. भूमी अभिलेख कार्यालयातील मस्तवाल बनलेल्या चंद्रकांत शिरढोणे याच्या कारभाराची खातेनिहाय चौकशी करून त्याला निलंबित करावे, अशा मागण्या मोर्चात करण्यात आल्या.
हा मोर्चा तहसील कार्यालयाच्या दारात येऊन धडकल्यानंतर तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी सरपंच परिषदेचे राज्याध्यक्ष जयंतदादा पाटील, जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अभिजित पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, गुंठेवारी संघटनेचे चंदनदादा चव्हाण, काँग्रेसचे राजीव मोरे, शिवसेनेचे शंभोराजे काटकर, राज्य ऊस वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष राजीव पाटील, विशालसिंह रजपूत, भाजपचे नितीन पाटील, अर्जुन थोरात,रास्ते,यांच्यासह अनेकांची भाषणे झाली.
यावेळी राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंतदादा पाटील म्हणाले भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची व प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे महाराष्ट्रातील २८हजार सरपंचांचे प्रदीप माने यांना जाहीर पाठिंबा आहे तासगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी सदरच्या घटनेचे दखल घेतली नाही. सदरच्या घटनेबद्दल ब्र अक्षर काढले नाही त्याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केला लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून सामान्य कार्यकर्त्यांना मदत करण्याचे आवाहन केले तसे केले नाही तर घोडा मैदान जवळ आले आहे लोकप्रतिनिधींचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करू शकतो, असे करण्यास आम्हास भाग पाडू नये खरा शत्रू नोकरशाही असून भ्रष्टाचार केल्यास आपल्या सहकारीची स्वतः चौकशी करतात सहा महिने निलंबित ठेवतात पुन्हा कामावर घेतात अ कारभारात पारदर्शकता नाही त्याला वेळीच लगाम घालण्याची गरज असल्याचे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
भाषणादरम्यान सर्वच वक्त्यांनी भ्रष्ट प्रशासनाविरोधात आगपाखड केली. प्रदीप माने हे गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. लोकांच्या अडीडचणींना ते धावून जातात. सरपंच म्हणून त्यांनी पाच वर्षे उल्लेखनीय काम केले आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी जलक्रांती केली. सावर्डे या गावाची पाणी फाउंडेशनमधील कामाची दखल घेऊन अमीर खान या गावात येऊन गेले. याशिवाय गावात दारूबंदी करण्यासाठी माने यांनी आक्रमक पाऊले उचलली होती.
तालुक्यातील काळे धंदे मोडीत काढावेत, या मागणीसाठी त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चाही काढला होता. अखंड पश्चिम महाराष्ट्रात त्यांचे काम आहे. तालुक्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात ते शोषित, वंचित घटकांची कामे घेऊन जात असतात. मात्र, ज्यावेळी ‘भूमी अभिलेख’मधील चंद्रकांत शिरढोणे यांच्यासारखे अधिकारी लोकांची दाद घेत नाहीत त्यावेळी माने यांनी आक्रमक होत त्याचे थोबाड रंगवले होते. कायदेशीरदृष्ट्या हे जरी चुकीचे असले तरी ती सामान्य लोकांची प्रतिक्रिया होती. मात्र या घटनेनंतर जी फिर्याद रंगवण्यात आली त्यामध्ये जे घडलं नाही तेही दाखल करण्यात आले आहे. प्रदीप माने यांनी कोणालाही पैशांची मागणी केली नाही. कोणत्याही महिला कर्मचाऱ्याला ते काहीही बोलले नाहीत. याशिवाय विशाल भोसले यांनी खुर्ची मोडल्याचा दावाही खोटा आहे, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.
तर मा. सरपंच प्रदीप माने भूमी अभिलेखमध्ये गेल्यानंतर शिरढोणे यांनी बाळू लोखंडे या बोगस व्यक्तीच्या हातात मूळ नकाशे दिल्याचे व त्याने तयार केलेल्या नकाशावर आपण सही करत असल्याचे मान्य केले आहे. तसे पुरावेही आहेत. मग शासकीय कागदपत्रे खासगी व्यक्तीच्या हातात देणे गुन्हा नाही का, असा सवाल करीत आंदोलनकर्त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील शिरढोणे याच्या निलंबनाची मागणी केली.
त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार रवींद्र रांजणे यांना निवेदन दिले. तर भूमी उपअधीक्षक वाय. सी. कांबळे यांचीही भेट घेऊन झालेली घटना दुर्दैवी आहे. प्रशासनाने सामोपचाराने मार्ग काढावा. जर तुम्ही काम बंद आंदोलनावरती ठाम राहिलात तर आम्ही गावे बंद ठेवू. आंदोलनाची ठिणगी राज्यभर पसरेल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री व लोकयुक्तांची भेट घेऊ, अशी भूमिका मांडली.
यावेळी सरपंच परिषदेचे तासगाव तालुकाध्यक्ष विकास डावरे, शिवसेनेचे तासगाव शहर प्रमुख विशाल शिंदे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय चवदार, राष्ट्रवादीचे बाजार समिती सदस्य खंडू पवार, निशिकांत पाटील, सचिन पाटील, , शे.का.प.चे बाबुराव जाधव प्रा. लगारे सर,शिवाजी गुळवे, काँग्रेस पक्षाचे नेते डॉ. विवेक गुरव, भास्कर सदाकळे, अजिंक्य पाटील, शशिकांत डांगे भाग्येश भाट,अमोल कदम, बी आर एस पक्षाचे ज्योतीराम जाधव राजू वाटकर संजय काटे,इत्यादी यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध गावचे सरपंच, सामान्य नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते
मतदार संघामध्ये सत्तेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजप यांचे अध्यक्ष प्रमुख पदाधिकारी व नेतेमंडळी मोर्चामध्ये सामील होऊन माजी सरपंच प्रदीप माने यांना पाठिंबा न दिल्याने संताप व्यक्त करीत मोर्च्याच्या ठिकाणी उघडपणे चर्चा करीत होते.