उस्मानाबाद – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या शासकीय गाडीला आज दे धक्का करत गाडी सुरू करावी लागली. झाले असे की आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात दिशा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांची पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी व्हावी यासाठी दिशा समितीच्या माध्यमातून दर तीन महिन्याला आढावा घेतला जातो. एकंदरीत या बैठकीत रखडलेल्या योजनांना दिशा देण्याचे काम यंत्रणेकडून होत असते ते आत मध्ये सुरूच होते मात्र खुद्द जिल्हा परिषद सी ई ओं च्या गाडीला धक्का देण्याची वेळ यावी यातून यंत्रणेची दशा काय असेल अशी चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात सुरू होती.
सी ई ओंची एम.एच.25 सी.6494 ही शासकीय गाडी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह समोर बंद पडली त्यानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे ड्रायव्हर आणि इतर सहकाऱ्यांनी मिळून ही गाडी धक्का देत स्टार्ट केली. ती गाडी बंद पाडण्याचे तांत्रिक कारण समजू शकले नाही. मात्र स्वयंचलित यंत्राच्या जमान्यात ढकल स्टार्ट असणे हे काळाच्या मागे आहे. प्रशासकीय यंत्रणा हाताखाली असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वाहनाबाबत अश्या घटना घडत असतील तर दुर्गम भागात काम करण्याऱ्या अधिकाऱ्यांच्या गाड्या, आरोग्य यंत्रणेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या रुग्णवाहिका या सुस्थितीत आहेत का हे पाहावे लागेल.