उस्मानाबाद – तालुक्यातील तेर येथे विविध कामात अनियमितता झाली असून त्या कामाची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
तेर ग्रामपंचायतीने 14 व्या वित्त आयोगातून 2015- 16 आणि 2020-2021 या वर्षांमध्ये राबवलेल्या विविध विकास कामांची गुणवत्ता आणि लोकेशन तपासणी व्हावी, तेर धरण पाईप लाईन करिता 12 कोटी 51 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता असताना 37 कोटी 96 लाख रुपये खर्च करून देखील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही,या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्या ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाचे कारवाई करावी याकडे लक्ष वेधले आहे.
या उपोषणासंदर्भात माहिती देताना राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते पृथ्वीराज आंधळे म्हणाले, विविध विकास कामे दाखवण्याचे चित्र उभे करून तेर येथील गाव कारभाऱ्यांनी आणि येथील राजकीय नेत्यांनी कोट्यावधी रुपये भ्रष्टाचाराच्या मार्गाने लुटले आहेत. तेर येथील संत गोरोबा काका च्या मंदिर परिसरात उभारलेले सांस्कृतिक सभागृह ग्रामपंचायतीने करार करून एका व्यापाऱ्यास भाड्याने दिलेली आहे त्या संदर्भातील चौकशी किंवा कारवाई राजकीय दबावापोटी केली जात नाही.जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उभारलेली ४ लाख रुपयांचे अभ्यासिका जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मोडीत काढली. कोणत्या कारणासाठी ही अभ्यासिका मोडीत काढले याची कोणीही माहिती देत नाही याची चौकशी व्हावी,शासनाचे चार लाख रुपये पाण्यात जाऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे. तेरणा नदी मध्ये शिरपूर पॅटर्न राबवून या कामाचे देयक रक्कम 17 लाख रुपये ग्रामपंचायतीचे नावे थकबाकी दाखवलेली आहे. या कामामध्ये लाखो रूपयाचा भ्रष्टाचार झालेला असतानाही ही थकबाकी ग्रामपंचायतीच्या नावे कोणत्या नियमावलीच्या आधारे ठेवली याचीही माहिती प्रशासनाने द्यावी अशी आमची मागणी आहे. असे पृथ्वीराज आंधळे यांनी सांगितले.
गावचा विकास खरा अर्थाने होण्यासाठी शासनाकडून दिलेल्या निधीचा योग्य कामासाठी वापर व्हायला हवा,मात्र सत्ताधारी मंडळींनी स्वतःच्या फायद्यासाठी गावच्या निधीचा दुरुपयोग केला आहे.अशी माहिती माजी सरपंच महादेव खटावकर यांनी दिली. उपोषणामध्ये प्रशांत फंड, मसुद काझी,सचिन डोंगरे, सचिन कोळपे,आकाश नाईकवाडी,अमोल कसबे अविनाश इंगळे,अमोल थोडसरे,नामदेव कांबळे, शशिकांत सोनवणे, कानिफनाथ देवकुळे, विशाल फंड,नजीब मासुलदार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध होऊन अपात्र झालेली व्यक्तीच दोषारोप करते, ही बाबच अत्यंत हास्यास्पद आहे. सरकार तुमचेच आहे कुठल्याही कामाची चौकशी करायला अडचण काय ?तेरणा बंद पाईप लाईन च्या विषयावर काही महिन्यापूर्वी मा. जलसंपदामंत्री यांच्याकडे चर्चा झाली होती, त्याचा इतिवृत्त अत्यंत बोलका आहे.जिल्ह्यात सर्वप्रथम शिरपूर पॅटर्नचे आदर्शवत काम तेरे येथे झाले आहे. मागील भीषण दुष्काळात गावाला पुरेसे पाणी व या अतिवृष्टीत गावाचा बचाव याच कामामुळे झाला, याची तरी जाणीव विरोधकांनी ठेवायला हवी होती.राजकीय वैफल्यातून होत असलेली ही उपोषणाची नौटंकी विरोधकांनी बंद करावी.
नवनाथ नाईकवाडी
सरपंच, ग्रा. प. तेर