उस्मानाबाद – विलीनीकरणाच्या मागणीसाठी एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप दिवसेंदिवस चिघळत आहे. आज उस्मानाबाद जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तानंतरही दोन बसवर दगडफेक करण्यात आली. गेल्या जिल्ह्यातील महिनाभरापासून एसटी सेवा ठप्प आहे. ही बस सेवा सुरू करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. याच अनुषंगाने आज उस्मानाबाद आगारातून पोलीस बंदोबस्तात अकरा बस सुरू करण्यात आल्या आहेत. यापैकी उस्मानाबाद उमरगा ही बस उमरगा येथून परतत असताना उमरगा शहराबाहेरील चौरस्ता येथे दगडफेक करण्यात आली आहे. तसेच उस्मानाबाद- पुणे या बसवर कौडगाव जवळ दगफेक करण्यात आली आहे.
उद्या बस सेवा सुरूच राहणार
आज दोन बसवर दगडफेक झाली असली तरी पोलीस बंदोबस्तात उद्या बस सेवा सुरू राहणार आहे. दगडफेक करणाऱ्या अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी दिली.