सलगरा,दि.४ (प्रतिक भोसले) – जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये संविधानिक मार्गाने उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज / लाठीमार करणाऱ्या प्रशासन व राज्यशासनाचा राज्यभर सकल मराठा समाजातर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे. म्हणुन त्याच अनुषंगाने सकल मराठा समाजाच्यावतीने तुळजापूर – नळदुर्ग महामार्गावर गंधोरा पाटी येथे उद्या मंगळवार (दि.५ सप्टेंबर) रोजी सकाळी ०९ वा.सु. रास्तारोको करण्यात येणार आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, यासाठी शांततेच्या मार्गाने आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी, लहान मुले, वृद्ध महिला यांना तेथील पोलीस प्रशासनाने अमानुषपणे लाठीचार्ज केला. या घटनेच्या निषेधार्थ गंधोरा पाटी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केलेल्या आवाहनाचे पालन करून रास्ता रोको करण्यात येणार आहे.
धाराशिव जिल्ह्यातील सकल मराठा बांधवांना पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येते की, धाराशिव जिल्हा हा शांतता प्रिय असून, याची शांतता भंग होता कामा नये. या करिता आपण सर्व मराठा बांधवांनी शांततेचा मार्ग अवलंबवावा पोलिस प्रशासन सदैव आपल्या सोबत आहे. रास्ता रोको करताना कुठल्याही प्रकारच्या शासकीय अथवा खाजगी मालमत्तेचे, जीवित अथवा वित्त हानी होता कामा नये. याची सकल मराठा बांधवांनी दखल घ्यावी व आपला जिल्हा शांतता प्रिय आहे. हे सर्वांना दाखवून द्यावे ही विनंती.
पोलिस अधीक्षक – अतुल कुलकर्णी