तस्करांनी धक्काबुक्की करून ट्रॅक्टर नेला पळवून गुन्हा दाखल
पारा( प्रतिनिधी ): वाशी तालुक्यातील महसूलच्या पथकावर अवैध वाळू तस्करांनी धक्काबुक्की करून रंगेहात पकडलेला वाळूचा ट्रॅक्टर जागेवर उलटून ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी हातोला ते शेंडी रोडवर घडली. याबाबत पथकाने वाशी पोलीस स्टेशन मध्ये दहा ते बारा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी अडीच वाजता वाशी तहसीलदार नरसिंग जाधव यांना गुप्त बातमीदार मार्फत खबर मिळाली की, हातोला ते शेंडी रोडवर वाळूची वाहतूक होत आहे. तहसिलदारांनी लगेचच एका पथकाला तेथे आदेशित केले. यावेळी पथकाने एक लाल रंगाचे हेड असलेला व विना नंबर प्लेटचा ट्रॅक्टर वाळू घेऊन वाशी कडे जात असलेला रंगेहात पकडला. त्याची चौकशी केली असता ड्रायव्हर चे नाव मोरे असे कळले. हा ट्रॅक्टर तहसील कडे घेऊन जात असताना शिवशक्ती साखर कारखाना जवळ वाशी येथील मंगेश जगताप व दहा ते बारा जणांनी या पथकासोबत हे ट्रॅक्टर सोडून द्या असे म्हणत हुज्जत घालून दमदाटी करून धक्काबुक्की करत हे टॅक्टर पळवून घेऊन गेले. या सर्व घटनेचा व्हिडीओ वाशी तालुक्यातील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या घटनेमुळे वाळू तस्कर कोणत्या पायरीपर्यंत जाऊ शकतात? यांना अभय कोणाचे? दिवसाढवळ्या मांजरा नदीतून वाळू उपसा करायची आणि राजरोसपणे तालुक्याला नेऊन अवाच्या सव्वा भावाने विकण्याचा गोरखधंदा सुरू आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने असे प्रकार घडत आहेत.
या पथकामध्ये मंडळाधिकारी दत्तात्रय गायकवाड, दिगंबर माळी, शिवाजी उंद्रे, तलाठी अशोक राठोड, समीर पुट्टेवाड, राजू माळी, अंकुश साबळे, विनोद सूर्यवंशी, महादेव मोरे, इस्माईल बिरादार, राजेश पडवळ, सरवर सय्यद, नितीन कांबळे, संदीप मोरे हे कार्यरत होते.
या घटनेबाबत वाशी येथील मंगेश जगताप व दहा ते बारा जणाविरोधत सरकारी कामात अडथळा आणणे, पथकाशी हुज्जत घालणे अशा आशयाची तक्रार मंडळाधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी वाशी पोलीस दिल्यामुळे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोउनि निंबाळकर करत आहेत.