२२ वर्षीय तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत सासुरवाडी पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वनखात्याच्या हद्दीतील वृक्षावर आढळला
आजरा(प्रतिनिधी)-
आजरा तालुक्यातील प्रकार आजरा तालुक्यातील यमेकोंड येथील स्वप्निल मारुती दिवटे या २२ वर्षीय तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत सासुरवाडी पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वनखात्याच्या हद्दीतील वृक्षावर आढळला. चार-पाच दिवसापूर्वी त्याच्या घटस्फोटाबाबतची चर्चा होऊन तसा करारनामाही झाला होता. कौटुंबिक वैफल्यातून सदर प्रकार घडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की स्वप्निल हा चार दिवसापासून बेपत्ता होता. याबाबतची वर्दी आजरा पोलिसात वडील मारुती दिवटे यांनी दिली होती. नातेवाईकांकडून त्याचा शोध सुरू होता. दरम्यान आज त्याची दुचाकी पेरणोली वझरे मार्गावर उभा केलेल्या स्थितीत आढळली. त्याच्या शोधार्थ यमेकोंड येथील काही मंडळी आली असता त्याच्या सासुरवाडी पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वन विभागाच्या हद्दीत त्याचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळला. याबाबतचे वृत्त आजरा पोलिसांना समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. अधिक चौकशी केली असता स्वप्निल याचा पेरणोली येथील एका मुलीसोबत दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. वर्षभरापासून सदर मुलगी माहेरी रहात होती. अखेर चार दिवसापूर्वी या दोघांचाही घटस्फोट घेण्याचा निर्णय त्यांच्या पालकांसमक्ष घेण्यात आला होता. तसा करारनामाही वकिलांकडून करून घेण्यात आला होता. यानंतर स्वप्नील अस्वस्थ होता. पोलिसांकडून अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. स्वप्निल याच्या पश्चात आई,वडील व चार बहिणी असा परिवार आहे.