उस्मानाबाद -तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं…हे गायिका कडूबाई खरात यांच्या अवाजातल हे गाणं महाराष्ट्रात सुपरिचित आहे. गाण्याचा मतितार्थ दिन दलितांना न्याय मिळवून त्यांचे हक्क मिळवून देऊन खाण्या पिण्याची भ्रांत मिटवून त्यांचे जीवन सुखकर करण्याबद्दल आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध माध्यमातून अभिवादन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून उस्मानाबादेतील शिराढोण येथील कलाकार कृष्णा पांचाळ याने भाकरीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची थेट पेंटिंग साकारली आहे.
गायिका कडूबाई खरात यांचे गाणे नेहमीच कुणी ना कुणी गुणगुणत असतं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती उत्साहात साजरी केली जाते आहे. त्याच अनुषंगाने कृष्णा याने भाकरीवर बाबासाहेबांची प्रतिमा साकारली आहे.
४८ चौरस फूट रांगोळीतून महामानवास अभिवादन
उस्मानाबाद येथील कलायोगी आर्ट्स च्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीचे औचित्य साधून बाबासाहेब आंबेडकर यांची ४८ चौरस फूट अशा भव्य आकाराची रांगोळी साकारली आहे. ही रांगोळी पाच तासाच्या कालावधीत पूर्ण केली असून त्यासाठी १५ किलो रंगीत रांगोळी चा वापर करण्यात आला आहे.या रांगोळीत बाबासाहेबांच्या प्रतिमे सोबत एक लहान मुलगी दिव्याच्या प्रकाशात शिक्षणाचे धडे गिरवत असल्याचे रांगोळीतून चित्रित केले आहे.स्त्री शिक्षणाचा आधारस्तंभ म्हणून उभे असलेले बाबासाहेब या रांगोळीतून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी झगडणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना रांगोळीच्या माध्यमातून जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले आहे ही रांगोळी कलायोगी आर्टचे राजकुमार कुंभार आणि त्यांचे विद्यार्थी जय प्रवीण पंडित ओम प्रवीण पंडित यांनी पाच तास परिश्रम घेऊन रांगोळी पूर्णत्वास नेली आहे.