बारामती | प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणाला जबर धक्का देणारी मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते अजित पवार यांचा बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात मृत्यू झाला आहे.या दुर्घटनेत एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे.
मुंबईहून आज सकाळी प्रचार दौऱ्यासाठी अजित पवार हे विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती एअरपोर्टवर लँडिंग करत असतानाच विमानाचा तोल गेला आणि ते विमानतळ परिसरातच कोसळले. अपघात इतका भीषण होता की विमानाला आगीने वेढले गेले आणि काही वेळ परिसरात धुराचे लोट पसरले होते.
प्राथमिक माहितीनुसार, या विमानात अजित पवार यांच्यासह त्यांचे चार सुरक्षारक्षक व अन्य कर्मचारी होते. अपघातानंतर अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन पथकांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. मात्र आगीमुळे आणि तीव्र धडकेमुळे सहा जणांचा मृत्यू झाला असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
चार प्रचारसभा नियोजित होत्या
आज बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एकूण चार प्रचारसभा होणार होत्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी या सभांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुपे जिल्हा परिषद गटासाठी स्वतंत्र सभा देखील नियोजित होती. या सभांमधून अजित पवार हे थेट कार्यकर्ते, उमेदवार आणि मतदारांशी संवाद साधणार होते. मात्र, या दुर्दैवी घटनेमुळे सर्व प्रचार कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
या भीषण अपघाताचे काही व्हिडिओही समोर आले असून त्यामध्ये विमान पूर्णतः जळालेल्या अवस्थेत दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे दिल्लीहून तातडीने महाराष्ट्राकडे रवाना झाल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यभर शोककळा पसरली असून राजकीय वर्तुळातून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.
- विभागीय आयुक्त खोटे? अनंत कुंभार यांचा ‘नोटीस चुकून’ आल्याचा अजब दावा
- घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करणाऱ्या हॉटेलवर तहसील प्रशासनाची कारवाई, गुन्हा दाखल
- भाजप नेते धनंजय सावंत यांच्या गाडीला अपघात
- आ.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळाचे वाटप
- प्रशासनाला बदनाम करणाऱ्या उपोषणकर्त्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचे निर्देश
