अपघात झाल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभाग जागे होणार का?
परंडा, दि. २९ ऑक्टोबर – आवार पिपरी येथील उल्फा/दुधना नदीवरील पुलाचे लोखंडी संरक्षक कठडे महापुराच्या पाण्यात वाहून गेल्याने पुल अत्यंत धोकादायक बनला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र “अपघात होण्याची वाट पाहत आहे का?” असा प्रश्न प्रवासी नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
२२ सप्टेंबर रोजी उल्फा/दुधना नदीला आलेल्या महापुरात आवार पिपरी येथील पुलाचे दोन्ही बाजूंचे लोखंडी कठडे पाण्याच्या तडाख्यात वाहून गेले. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तब्बल एक महिना उलटूनही पुलाच्या संरक्षक कठड्यांच्या दुरुस्तीचे कोणतेही काम सुरू केलेले नाही. पुलावरून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहने आणि दुचाकी जात असताना कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता प्रवासी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, ज्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे त्या कामांकडेच सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. अधिकारी आणि कर्मचारी नेमक्या कोणत्या कामात व्यस्त असतात, हा प्रश्नही नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
परंडा–कुर्डूवाडी राज्य मार्ग हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गावरून दररोज शेकडो प्रवासी आणि वाहने मुंबई, पुणे, सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर, सांगली, सातारा आदी शहरांकडे प्रवास करतात. या रहदारीच्या मार्गावर आवार पिपरी येथील उल्फा/दुधना नदीवरील धोकादायक पुल अपघातास निमंत्रण देत आहे.
या धोकादायक पुलाच्या लोखंडी संरक्षक कठड्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
