तुळजापूरमध्ये बनावट खत निर्मितीवर कृषि विभागाची धडक कारवाई

0
226

‘तेरणा व्हॅली फर्टिलायझर अँण्ड केमिकल’चा परवाना निलंबित

धाराशिव, दि. ८ ऑक्टोबर – शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कृषी विभाग सतत निविष्ठा उत्पादक व विक्रेत्यांवर लक्ष ठेवून आहे. या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे “तेरणा व्हॅली फर्टिलायझर अँण्ड केमिकल” नावाने सुरू असलेल्या बनावट खतनिर्मिती कारखान्यावर जिल्हास्तरीय भरारी पथकाने धडक तपासणी करून गंभीर अनियमितता उघडकीस आणली.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी महादेव आसलकर यांच्या आदेशानुसार भरारी पथक प्रमुख कृषी विकास अधिकारी एन.एम. पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रविण पाटील, व्ही.एम. भुतेकर, डी.व्ही.ुळे, आबासाहेब देशमुख, दीपक गरगडे आणि जी.पी. बनसोडे यांनी ही कारवाई केली. तपासणीनंतर सविस्तर अहवाल जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला.

या अहवालाच्या आधारे कृषि आयुक्तालयातील परवाना अधिकारी तथा कृषि संचालक (नि.व.गु.नि.) यांनी सुनावणी घेऊन “तेरणा व्हॅली फर्टिलायझर अँण्ड केमिकल” या कंपनीचा खत निर्मिती व विक्री परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित केला आहे.

अशा प्रकारच्या बनावट खतनिर्मिती आणि बेकायदेशीर विक्रीविरोधात विभागाची तपासणी पुढेही सुरू राहणार असून दोषी आढळल्यास बियाणे, खते आणि कीटकनाशके (नियंत्रण) कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.

शेतकऱ्यांना आवाहन करताना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी सांगितले की, खते, बियाणे व कीटकनाशके खरेदी करताना नेहमी परवानाधारक कृषि सेवा केंद्रातूनच खरेदी करावी. खरेदीवेळी पक्की पावती व ई-पॉस मशीनचे बिल घ्यावे, तसेच खताच्या बॅगवरील किंमतीशी ताळमेळ तपासावा.

बियाण्यांच्या पिशव्या सिलबंद असल्याची खात्री करावी आणि त्यावरील अंतिम मुदत पाहावी. खरेदी केलेल्या बियाण्याचे टॅग, पिशवी व नमुना हंगाम संपेपर्यंत जतन करून ठेवावा.

शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणाऱ्या कोणत्याही बनावट किंवा बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असे प्रभारी अधिक्षक कृषी अधिकारी एम.के. आसलकर यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here