परंडा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी चुरशीचे मतदान;७३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद!

0
36

९ फेब्रुवारीच्या निकालाकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष…


परंडा | भजनदास गुडे (दि. ७ फेब्रुवारी)
परंडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ५ आणि पंचायत समितीच्या १० जागांसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ५२.८३ टक्के मतदान उत्साहात आणि चुरशीने पार पडले. तालुक्यात एकूण १३० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. निवडणूक रिंगणातील एकूण ७३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, आता सर्वांना ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीची प्रतीक्षा आहे.
सकाळपासूनच मतदानास उत्साहात सुरुवात झाली होती. दिवसभर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू होती. अनेक मोठ्या मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या.
दुपारी ३:३० वाजेपर्यंत तालुक्यात सरासरी ५२.८३ टक्के मतदान झाले होते.
शेळगाव गण व गट – ५४.७१%,
आनाळा गण व गट – ५४.००%,
जवळा गण व गट – ५४.१४%,
डोंजा गण व गट – ५०.१७%,
लोणी गण व गट – ५१.४२%.
यामध्ये महिला २६,९६० आणि पुरुष २९,७०५ असे एकूण ५६,६६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अनेक ठिकाणी तिरंगी, चौरंगी व पंचरंगी लढती होत असल्याने उमेदवारांच्या समर्थकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. यामुळे काही मतदान केंद्रांच्या परिसरात किरकोळ प्रकार घडले असले तरी तालुक्यात एकूणच शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.
यावेळी तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सायंकाळी साडेपाच वाजता मतदानाची वेळ संपल्यानंतर उपस्थित मतदारांचे मतदान पूर्ण झाल्यावर मतपेट्या सीलबंद करण्यात येणार होत्या. परंडा शहरातील करमाळा रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह येथे बसेस व इतर खासगी वाहनांद्वारे या मतपेट्या सुरक्षितपणे आणण्यात येणार आहेत. या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, आता सर्वांच्या नजरा ९ फेब्रुवारीच्या निकालाकडे लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here