मेडसिंगा ग्रामपंचायतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
धाराशिव : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर संघर्षयोध्दा मनोज दादा जरांगे पाटील उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाला आता धाराशिव जिल्ह्यातूनही मोठा पाठिंबा मिळू लागला आहे.
मेडसिंगा ग्रामपंचायत कार्यालयाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन जरांगे पाटील यांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. सततच्या उपोषणामुळे त्यांची तब्येत बिघडत असल्याने शासनाने तातडीने मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा उद्भवणाऱ्या परिणामास सरकार जबाबदार असेल, असा इशारा ग्रामपंचायतीने पत्राद्वारे दिला आहे.
ग्रामपंचायतीने स्पष्ट केले की, गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. मात्र शासनाने सकारात्मक भूमिका घेतली नसल्यामुळे संघर्ष तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर मेडसिंगा ग्रामपंचायत ठामपणे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पाठीशी उभी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील इतर गावांमधूनही मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा वाढत असून आगामी काळात हा जनसमर्थनाचा आवाज आणखी मोठा होण्याची चिन्हे आहेत.