लिंगायत समाजाचा 27 वा महामोर्चा 7 डिसेंबरला धाराशिवमध्ये; अल्पसंख्याक दर्जा आणि स्वतंत्र धर्म मान्यतेची मागणी

0
129

धाराशिव (प्रतिनिधी) –
लिंगायत समाजाच्या मागण्यांसाठी आतापर्यंत 26 मोर्चे काढल्यानंतर आता 27 वा ऐतिहासिक महामोर्चा येत्या 7 डिसेंबर रोजी धाराशिव येथे आयोजित करण्यात आला आहे. या महामोर्चात कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमधील सुमारे पाच लाख बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

धाराशिव येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत लिंगायत समन्वय समितीचे पदाधिकारी आणि अविनाश भोसीकर उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, हा महामोर्चा लिंगायत समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली होणार असून लिंगायत समाजातील 68 संघटना या समितीच्या माध्यमातून एकत्र आल्या आहेत.

समाजाच्या मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे आहेत –
1️⃣ संविधानिक नोंद घेऊन लिंगायत समाजाला अल्पसंख्याक म्हणून जाहीर करावे.
2️⃣ स्वतंत्र लिंगायत धर्माला अधिकृत मान्यता द्यावी.
3️⃣ संत श्री बसवेश्वर यांचे स्मारक मंगळवेढा येथे उभारावे.

यावेळी हेही सांगण्यात आले की, येणाऱ्या जनगणनेत लिंगायत धर्माबाबत चुकीची माहिती दिली जात आहे, त्याला समाजाकडून तीव्र विरोध केला जाणार आहे.

मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (बाळासाहेब आंबेडकर) उपस्थित राहणार असून, त्यांच्या उपस्थितीमुळे या महामोर्चाला विशेष राजकीय आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

लिंगायत समन्वय समितीने समाजातील सर्व घटकांना या ऐतिहासिक महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here