Home Blog Page 23

ज्योती हनुमान पाटील यांची धाराशिवच्या अपर जिल्हाधिकारी पदावर तात्पुरती पदोन्नती

धाराशिव, दि. २२ एप्रिल २०२५ – महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने निवडसूची वर्ष २०२४-२५ अंतर्गत उप जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना दिली आहे. या अंतर्गत श्रीमती ज्योती हनुमान पाटील यांची धाराशिव येथे अपर जिल्हाधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ही पदोन्नती आस्थापना मंडळ क्रमांक २ च्या १५ एप्रिल २०२५ रोजीच्या शिफारसीनुसार व महसूल संवर्ग वाटप नियमावलीतील तरतुदींनुसार करण्यात आली असून ती पूर्णपणे तात्पुरती असून न्यायालयीन प्रकरणांच्या अंतिम निकालाच्या अधीन राहणार आहे. या पदोन्नतीमुळे संबंधित अधिकाऱ्यांना नियमित पदोन्नतीचे हक्क प्राप्त होणार नाहीत.

या आदेशानुसार, श्रीमती पाटील यांना त्यांच्या सध्याच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात आले असून नवीन पदावर तातडीने रुजू होण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. शासनाने स्पष्ट केले आहे की, ही पदोन्नती शासनाच्या मंजुरीनंतर सार्वजनिक सेवेच्या आणि लोकहिताच्या दृष्टीने करण्यात आलेली आहे.

धाराशिव अपर जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार यापूर्वी उपजिल्हाधिकारी शिरीष यादव यांच्याकडे होता.

राज्य मागासवर्ग आयोगात शेकडो कोटींची आर्थिक अनियमितता?; आवाज उठवणाऱ्या दलित अधिकाऱ्याची एकतर्फी कार्यमुक्ती — प्रा. सुषमा अंधारे यांचा आरोप

मुंबई, दि. २२ एप्रिल:
राज्य मागासवर्गीय आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि आर्थिक व्यवहारांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, आयोगातील शेकडो कोटी रुपयांच्या अनियमित खर्चाचा पर्दाफाश करताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे यांनी म्हटले की, या गैरव्यवहारांवर लक्ष वेधणारे अधिकारी श्री. अरविंद माने यांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे कार्यमुक्त करण्यात आले आहे.

सदर कार्यमुक्ती आदेश आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती आशाराणी पाटील यांच्या स्वाक्षरीने जारी झाला असून, प्रशासकीय प्रक्रिया डावलून हा निर्णय घेतल्याचा ठपका अंधारे यांनी ठेवला आहे. माने हे राजपत्रित अधिकारी असून, त्यांच्याशी संबंधित कार्यमुक्तीची अधिकारक्षमता आयुक्तांकडे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आयोगातील खर्चाचे तपशील संशयास्पद – अंधारे यांचा आरोप

प्रा. अंधारे यांनी चार दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, आयोगाच्या अभ्यासासाठी शासनाने दिनांक ९ जानेवारी २०२४ रोजी ३६७ कोटी १२ लाख ५९ हजार रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीअंतर्गत विविध पदभरती, मानधन, स्टेशनरी, कार्यालयीन जागा यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च दाखवण्यात आला आहे.

  • पुण्यातील ५,००० स्क्वेअर फूट कार्यालयासाठी तीन कोटी पंचाहत्तर लाख रुपयांचे भाडे खर्चाचे आकडे दाखवले गेले आहेत.
  • राज्यभरात तब्बल १ लाख ४३ हजार प्रगणकांची भरती झाल्याचे दाखवले असले तरी, प्रत्यक्षात अशा स्वरूपाचे काम कुठेच झालेले आढळून आलेले नाही.
  • या अभ्यासासाठी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक्स, पुणे यांच्यासोबत ११ कोटी ९० लाख रुपयांचा करार करण्यात आलेला आहे. त्यामुळे इतर यंत्रणा आणि प्रचंड मनुष्यबळाची गरजच काय, असा प्रश्न उपस्थित होतो.

दलित अधिकारी अरविंद माने यांना कारण नसताना कार्यमुक्ती?

या संपूर्ण व्यवहाराविरोधात लेखी तक्रारी देणारे श्री. अरविंद माने हे आयोगाचे स्वीय सहाय्यक (राजपत्रित) अधिकारी असून, त्यांनी आतापर्यंत आर्थिक अनियमिततेविरोधात प्रधान सचिवांना पत्राद्वारे माहिती दिली होती. अंधारे यांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही कारणे दाखवा नोटीस न देता, माने यांना अचानकपणे कार्यमुक्त करण्यात आले.

त्यांनी यामागील प्रक्रिया स्पष्ट करत सांगितले:

  1. कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला कार्यमुक्त करताना सर्वप्रथम कारणे दाखवा नोटीस द्यावी लागते,
  2. संबंधिताने खुलासा सादर केल्यानंतर तो ग्राह्य धरण्याचा किंवा नाकारण्याचा निर्णय घ्यावा लागतो,
  3. हा निर्णय आयुक्तांना कळवून त्यांच्या मान्यतेनंतरच कार्यमुक्ती करता येते.

ही सर्व प्रक्रिया पूर्णपणे टाळून, आदेश थेट सदस्य सचिवांनीच काढल्याने तो नियमबाह्य आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप त्यांनी केला.

दलित अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक?

प्रा. अंधारे यांनी नमूद केले की, अरविंद माने हे दलित असून, त्यांना यापूर्वीही आयोगाच्या वरिष्ठांकडून वारंवार अपमानास्पद वागणूक मिळाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या एकतर्फी कार्यमुक्तीला जातीय पाश्वभूमी आहे का, हा प्रश्नही उपस्थित होतो, असं त्यांनी सुचवलं.

सदस्य सचिवांच्या प्रतिनियुक्तीवरही प्रश्नचिन्ह

आयोगाच्या सदस्य सचिव आशाराणी पाटील या मागासवर्गीय कल्याण विभागाच्या उपसचिव असून, त्यांच्या सध्याच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी नागरी सेवा नियमांनुसार १० वर्षांपेक्षा जास्त असू शकत नाही. मात्र, त्यांच्या सेवा कालावधीस साडेअकरा वर्षे उलटूनही तेच पद त्यांनी कायम राखले आहे, ही बाबही अंधारे यांनी अधोरेखित केली.

ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, मला आनंदच होईल – छगन भुजबळ

नाशिक | प्रतिनिधी
राजकारणाच्या रंगमंचावर ठाकरे बंधू – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे – पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चेला चालना मिळाल्याने, वरिष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली आहे. “ठाकरे बंधू एकत्र आले, तर मला सर्वाधिक आनंद होईल,” असे भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले.

एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले, “मी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जवळून काम केले आहे. जेव्हा राज ठाकरे वेगळे होण्याच्या निर्णयावर होते, तेव्हा मी स्वतः पुढाकार घेऊन राज आणि उद्धव या दोघांनाही फोन केला होता. त्यांना काही दिवस शांत राहण्याचा सल्ला दिला होता, कारण कधी कधी भावना शांत झाल्यावर निर्णय बदलू शकतो. दुर्दैवाने तसे झाले नाही.”

“आजही जर ते दोघे एकत्र आले, तर त्यांच्या शक्तीला गती मिळेल. दोघेही स्वतंत्र पक्षाचे प्रमुख असले, तरी त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात आहे. शिवसेनेची ताकद निश्चितच वाढेल,” असेही ते म्हणाले.

मराठी सक्तीबाबत विचारले असता, भुजबळ यांनी विचारपूर्वक भूमिका मांडली. “मराठी भाषा शिकवलीच पाहिजे, हे बिनविवाद आहे. पण भाषा सक्तीने शिकवण्याऐवजी प्रेरणेने शिकवली गेली पाहिजे. आजच्या काळात विज्ञान, गणित, माहिती तंत्रज्ञान यासारख्या विषयांमध्ये प्रावीण्य मिळवणे आवश्यक आहे. मुलांनी एकाच वेळी अनेक भाषा शिकणे हे त्यांच्या शैक्षणिक भारात भर घालू शकते. म्हणून, सक्तीऐवजी समतोल विचार आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अजित पवार यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने लावलेल्या फलकावरही भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. “भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे,” अशी मागणी त्या फलकावर होती. यावर ते म्हणाले, “कार्यकर्त्यांचं प्रेम आहे, त्यामुळे त्यांनी अशी मागणी फलकाद्वारे व्यक्त केली असावी. त्यावर फारसा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही.”

ठाकरे-राज युतीची शक्यता? संजय राऊतांचे मोठे वक्तव्य; भाजपवर जोरदार हल्लाबोल

मुंबई | प्रतिनिधी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत राज्यातील राजकारणात नवा रंग भरला. त्यांनी पहिल्यांदाच खुलेपणाने मान्य केले की, “राज्याच्या हितासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येऊ शकतात.” त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

“ठाकरे बंधूंच्या एकतेत कोणतीही अट नाही”

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “राज ठाकरे आमचे बंधू आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संबंध व्यक्तिगत आणि रक्ताचे आहेत. हे दोन नेते जर राज्याच्या भवितव्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतात, तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अट नसावी, हे आम्हाला वाटते.”

राऊतांनी स्पष्ट केले की, ही भावना केवळ पक्षाची नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांची आहे. “महाराष्ट्राच्या अस्मितेवर वार करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी जर ठाकरे बंधू एकत्र आले, तर ते महाराष्ट्रासाठी लाभदायक ठरेल,” असेही त्यांनी नमूद केले.

भाजपवर तीव्र शब्दांत हल्ला

भाजपवर निशाणा साधताना राऊत म्हणाले, “जे महाराष्ट्राच्या हिताच्या आड येतात, ते या राज्याचे शत्रू आहेत. त्यांनी कितीही सत्ता वापरली, तरी आम्ही त्यांच्या पंक्तीत बसणार नाही.” त्यांनी भाजपवर “महाराष्ट्रद्रोह” केल्याचा आरोप करत म्हटले की, “या लोकांनी महाराष्ट्राचा आत्मसन्मान पायदळी तुडवला आहे. आम्ही त्यांचा फोटोही सरकारी कार्यालयात लावणार नाही.”

यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही टीका केली. “जे राज्यातील न्यायसंस्था, प्रशासन, आणि लोकशाही संस्थांवर वार करत आहेत, त्यांना महाराष्ट्रात स्थान नसावे,” असेही ते म्हणाले.

अजित पवारांच्या भूमिकेचे समर्थन, पण हिंदीला विरोध

हिंदी विषय सक्तीने शिकवण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये गोंधळ सुरू असताना, संजय राऊतांनी अजित पवारांच्या भूमिकेचे समर्थन केले. “हिंदी शिकण्यास आम्हाला विरोध नाही. पण शालेय अभ्यासक्रमात सक्ती केली जाऊ नये. महाराष्ट्रात मराठीचे स्थान सर्वोच्च असले पाहिजे,” असे राऊतांनी ठामपणे सांगितले.

राजकारणातील ‘मस्का’ टोळीवर टीका

“आजकाल काहीजण सतत दिल्लीला मस्का लावत आहेत. त्यांना ना महाराष्ट्राची चिंता आहे, ना लोकशाही मूल्यांची,” असा घणाघात करत त्यांनी भाजप-शिंदे गटाचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. “पवार, ठाकरे, राजे यांच्या मुळाशी लागणाऱ्या कोणत्याही शक्तींना महाराष्ट्रात स्थान नाही,” असाही इशारा त्यांनी दिला.

न्यायालयाचा अवमान करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांवर शंका घेणाऱ्यांवर टीका करताना राऊत म्हणाले, “देशात अनेक संवैधानिक संस्था आज संकटात आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश न पाळणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे. लोकशाही वाचवण्यासाठी न्यायपालिका सक्षम असली पाहिजे.”


राजकीय भूकंपाचे संकेत?

संजय राऊतांच्या या पत्रकार परिषदेमुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे-राज युती होईल का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी केवळ डॉक्टर दोषी? रुग्णालय प्रशासनावर कारवाईसाठी टाळाटाळ – सुप्रिया सुळे

पुणे | प्रतिनिधी
गर्भवती महिलेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी केवळ संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून रुग्णालय प्रशासनावर कोणतीही कारवाई न झाल्याने शासन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

“या प्रकरणात डॉक्टरांवर गुन्हा दाखल होणं उशिरा का होईना, हे स्वागतार्ह आहे. मात्र केवळ डॉक्टरांना दोषी ठरवून रुग्णालय प्रशासनाला मोकळं करणं हे न्याय प्रक्रियेशी प्रतारणा आहे,” असं त्या म्हणाल्या.

प्रशासनालाच क्लीन चीट, दोष टाळण्याचा डाव?
सुळे यांनी स्पष्ट केलं की, “या घटनेत संबंधित रुग्णालयाच्या व्यवस्थापनाचीही तितकीच जबाबदारी आहे. पण त्यांच्या भूमिकेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय. ही महाराष्ट्राच्या एका लेकीवर झालेली अमानुष घटना आहे, आणि ती संपूर्ण राज्यासाठी लाजिरवाणी आहे.”

सरकारकडून भूमिकेतील विरोधाभास
सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरुवातीच्या वक्तव्याची आठवण करून दिली. “मुख्यमंत्री म्हणाले होते की न्याय दिला जाईल, पण सध्याचं सरकारचं वर्तन पाहता सुरुवातीच्या त्या विश्वासाला तडा गेला आहे,” अशी तीव्र टीका त्यांनी केली.

‘सत्य समोर आलंच पाहिजे’
“पाच तास रुग्णालयात महिलेचं ब्लीडिंग होत असताना वेळेवर उपचार का दिले गेले नाहीत? कोण जबाबदार? हा माणुसकीचा प्रश्न आहे. या प्रकरणात कुणीही दोषी असतील, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. अहवालांमध्ये अडकण्यापेक्षा सत्य समोर आलं पाहिजे,” असंही त्या म्हणाल्या.

आयएमएच्या भूमिकेवरही संशय
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) यांनी सुरुवातीच्या अहवालावरून डॉक्टरांना क्लीन चीट दिली होती. त्यानंतर अहवाल बदलल्यावर गुन्हा कसा काय दाखल झाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सुळे यांनी आयएमएच्या या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, हे सत्य दडपण्याचा प्रयत्न असल्याचं सूचित केलं.

बनावट लेटरपॅड आणि शिक्क्यांचा वापर करून फेरफार प्रक्रियेत अडथळा; सुहास पाटलांसह चौघांवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

धाराशिव : तांबरी विभागातील एका सेवानिवृत्त लिपिकाच्या मालकी हक्काच्या भूखंडावर बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून, बनावट लेटरपॅड आणि खोट्या शिक्क्यांचा वापर करून फेरफार प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी धाराशिव शहर पोलिसांनी सुहास केशवराव पाटील यांच्यासह चौघांवर अॅट्रॉसिटी कायद्यासह भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी सोमनाथ दादाराव डाके (वय ७०, रा. तांबरी विभाग, धाराशिव) हे राज्य परिवहन विभागातून लिपिक पदावरून सेवानिवृत्त झालेले असून, त्यांनी २०१६ मध्ये उस्मानाबाद गृहनिर्माण सहकारी संस्थेकडून प्लॉट क्रमांक ९, १०, ११, १७, १८ आणि २१ अधिकृत कागदपत्रांद्वारे खरेदी केले होते. त्यांनी या प्लॉट्सच्या फेरफारासाठी आवश्यक कागदपत्रांसह सिटी सर्वे कार्यालय व तलाठी कार्यालय, धाराशिव येथे २०२३ मध्ये अर्ज सादर केला होता.

मात्र, संतोष व्यंकटेश हंबीरे आणि सुहास केशवराव पाटील यांनी मुद्दाम फेरफार प्रक्रिया थांबवण्यासाठी बनावट लेटरपॅड आणि खोट्या शिक्क्यांचा वापर करून खोटे दस्तऐवज तयार केले. हे दस्तऐवज त्यांनी ११ जुलै २०२३ रोजी सिटी सर्वे कार्यालय आणि १४ जुलै २०२३ रोजी तलाठी कार्यालयात सादर करून, फेरफार प्रक्रिया डाके यांच्या विरोधात थांबवण्याचा प्रयत्न केला.

या बनावट कागदपत्रांच्या आधारावर शासकीय कार्यालयांची दिशाभूल करण्यात आली. तसेच, हंबीरे आणि पाटील यांनी सोपान अंबादास जाधव आणि सिताबाई सोपान जाधव या दाम्पत्याला डाके यांच्या भूखंडावर अतिक्रमण करण्यास प्रवृत्त केले. संबंधित प्लॉटवर पत्र्याचे शेड, जुनी जीप, निकामी टायर आणि भंगार साहित्य ठेवून अतिक्रमण केले गेले. हे सर्व प्रकार जातीय द्वेषातून आणि दहशतीच्या उद्देशाने केल्याचे फिर्यादीत स्पष्ट करण्यात आले आहे.

या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात १६ एप्रिल २०२५ रोजी FIR क्रमांक 0197/2025 अन्वये खालील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे :

  1. सोपान अंबादास जाधव – रा. तांबरी विभाग, धाराशिव
  2. सिताबाई सोपान जाधव – रा. तांबरी विभाग, धाराशिव
  3. संतोष व्यंकटेश हंबीरे – रा. अक्षर सदन, संघर्ष कार्यालय, गवळी गल्ली, धाराशिव
  4. सुहास केशवराव पाटील – रा. तांबरी विभाग, धाराशिव

या आरोपींविरुद्ध BNS 2023 अंतर्गत कलम ३४०(१) (बनावट कागदपत्र तयार करणे), ३(५) (अतिक्रमण व नुकसान) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, १९८९ अंतर्गत कलम ३(१)(g), ३(१)(u), ३(१)(z) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

उमरगा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी: अज्ञात हल्लेखोरांना २४ तासांत केले जेरबंद

उमरगा, दि. १६/०४/२०२५: उमरगा पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांना अवघ्या २४ तासांच्या आत मुसक्या आवळून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दि. १५/०४/२०२५ रोजी सायंकाळी ३:४५ ते ४:०० वाजेच्या सुमारास उमरगा शहरातील बांधकाम गुत्तेदार गोविंद राम दंडगुले (वय ४०) यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे.

घटनेचा तपशील:
गोविंद दंडगुले हे बॅक कॉलनीतून राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीवरून घरी निघाले होते. छत्रपती शिवाजी कॉलेजजवळील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमसमोर एका नंबरप्लेट नसलेल्या सिल्व्हर रंगाच्या इर्टिगा कारमधून आलेल्या तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी त्यांची दुचाकी अडवली. त्यांनी धारदार शस्त्रांनी (कोयत्यांनी) गोविंद यांच्या डोक्यावर आणि हातावर वार करून गंभीर जखमी केले. यानंतर आरोपी कारमधून सुसाट पळाले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ गोविंद यांना खासगी रुग्णालयात दाखल केले, जिथून त्यांना सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, ते बेशुद्ध अवस्थेत आहेत.

पोलिसांची तत्पर कारवाई:
या गंभीर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवली. पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथके रवाना करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक पुजरवाड, सपोफौ ओव्हाळ, पोहेकॉ कोनगुलवार, पोना कावळे आणि चालक पोहेकॉ कांबळे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर खजुरी गावाजवळ हल्लेखोरांनी वापरलेली इर्टिगा कार पकडली. मात्र, आरोपींनी अंधाराचा फायदा घेत कार सोडून पलायन केले.

पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, सपोनि कन्हेरे, पोउपनि पुजरवाड, पोना यासिन सय्यद आणि पोहेकॉ नवनाथ भोरे यांच्या पथकाने रात्रभर अथक परिश्रम घेत गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला. अखेर, घटनेपासून २४ तासांच्या आत, दि. १६/०४/२०२५ रोजी कर्नाटकातील बसवकल्याण तालुक्यातील एका हॉटेलमधून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले. यामध्ये राहुल रमाकांत परशेट्टी (मुळज, उमरगा), शिवा कुक्कुरडे (कुन्हाळी) आणि प्रदिप कलशेट्टी (जुनी पेठ, उमरगा) यांचा समावेश आहे.

हल्ल्यामागील कारण:
चौकशीदरम्यान, राहुल परशेट्टी याने खुलासा केला की, सुमारे दोन वर्षांपूर्वी गोविंद दंडगुले यांनी त्याला ६ लाख रुपयांत प्लॉट देण्याचे आश्वासन दिले होते. राहुलने १.५ लाख रुपये आगाऊ दिले, परंतु गोविंद यांनी ना प्लॉट दिला ना पैसे परत केले. अलीकडेच राहुलने पुन्हा पैसे किंवा प्लॉट मागितले असता, गोविंद यांनी नकार देत शिवीगाळ आणि मारहाण केली. याचा राग मनात धरून राहुलने आपल्या मित्रांसह गोविंद यांच्यावर हल्ल्याचा कट रचला आणि १५ एप्रिल रोजी हा हल्ला घडवून आणला.

गुन्हा दाखल आणि तपास:
जखमी गोविंद यांचे नातेवाईकांनी तक्रार देण्यास नकार दिल्याने आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, बीट अंमलदार पोहेकॉ अतुल जाधव यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. यावरून उमरगा पोलीस ठाण्यात गु.र.नं. २३४/२०२५ अंतर्गत कलम १०९, १२६(२), ३(५) भारतीय न्याय संहिता आणि ४/२५ शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सपोनि श्रीकांत भराटे करत आहेत.

आरोपींची अटक आणि जप्ती:
तपासात राहुल परशेट्टी, शिवा कुक्कुरडे, प्रदिप कलशेट्टी आणि फरार आरोपी नवतेज तोरणे यांनी हल्ला केल्याचे निष्पन्न झाले. अटकेतील तीन आरोपींकडून हल्ल्यासाठी वापरलेले तीन लोखंडी कोयते आणि सिल्व्हर रंगाची इर्टिगा कार जप्त करण्यात आली आहे. फरार आरोपी नवतेज तोरणे याला शोधण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे.

पोलिसांचे कौतुक:
ही धाडसी कामगिरी उमरगा पोलिसांनी अवघ्या १६ तासांत परराज्यात जाऊन अथक परिश्रमाने पूर्ण केली. पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली. यात सपोनि पांडुरंग कन्हेरे, पोउपनि गंगाधर पुजरवाड, सपोफौ प्रदिप ओव्हाळ, पोहेकॉ चैतन्य कोनगुलवार, पोना यासिन सय्यद, पोना अनुरुद्ध कावळे आणि पोहेकॉ नवनाथ भोरे यांचा समावेश आहे.

नागरिकांना आवाहन:
पोलिसांनी नागरिकांना फरार आरोपी नवतेज तोरणे याच्या ठावठिकाण्याबाबत माहिती असल्यास तात्काळ कळवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, कोणतीही माहिती मिळाल्यास भय न बाळगता उमरगा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. उमरगा पोलीस नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तोतया चेअरमनने केली 1 कोटी 10 लाखांची फसवणूक

धाराशिव :
सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमध्ये आणखी एका मोठ्या आर्थिक फसवणुकीची नोंद धाराशिव येथे करण्यात आली आहे. बाबासाहेब कचरु वाडेकर (वय 51), रहिवासी – अधिकारी वसाहत, धाराशिव साखर कारखाना, चोराखळी, ता. कळंब, जि. धाराशिव यांनी सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्याशी मोबाईल क्रमांक 725958038 वरून संपर्क साधण्यात आला.

या क्रमांकाचा वापर करणाऱ्या व्यक्तीने धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन/सी.एम.डी. अमर पाटील यांचा फोटो डी.पी. (डिस्प्ले पिक्चर) म्हणून वापरून स्वतःची ओळख लपवत अमर पाटील असल्याचा बनाव केला. त्यानंतर फिर्यादी वाडेकर यांना विश्वासात घेऊन एका बँक खात्यावर (खाते क्रमांक 20100043466464) तब्बल 1 कोटी 10 लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आले.

हि घटना दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी सकाळी 6.57 वा.पासून ते 17 एप्रिल 2025 रोजी दुपारी 1.22 वा.च्या दरम्यान घडली. सदर प्रकरणी वाडेकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून सायबर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 318(4) तसेच माहिती तंत्रज्ञान सुधारित अधिनियम 2008 चे कलम 66(सी) आणि 66(डी) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून, बनावट ओळख वापरून इतक्या मोठ्या रकमेची फसवणूक करण्यात आलेली असल्याने, हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे.

तपास सायबर पोलीस विभागामार्फत सुरू असून नागरिकांनी अशा बनावट संदेशांपासून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महावीर जयंतीच्या सुट्टी दिवशी मोबाईल नोटीसीद्वारे त्रास : लहु खंडागळे यांची जिल्हा पोलिस प्रशासनाविरोधात पोलिस महानिरीक्षांकडे तक्रार

धाराशिव
केशेगाव (ता. धाराशिव) येथील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते लहु रामा खंडागळे यांनी धाराशिव जिल्हा पोलिस प्रशासनाविरोधात लेखी तक्रार सादर करत गंभीर आरोप केले आहेत. त्यांचा आरोप आहे की, महावीर जयंतीच्या सुट्टीच्या दिवशी त्यांना मोबाईलवरून नियमबाह्य पद्धतीने चौकशीसाठी बोलावण्यात आले, तसे पत्र पोलिस प्रशासनाने त्यांच्या व्हॉट्स ॲप वरती पाठवले.ज्यामुळे त्यांचा मानसिक छळ झाला.

खंडागळे यांनी आपल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे की, दिनांक १७ मार्च २०२३ रोजी तत्कालीन जिल्हा सरकारी वकील शरद जाधवर यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. त्या अनुषंगाने त्यांच्या शस्त्र परवाना रद्द करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक रिपोर्ट पाठवणे गरजेचे होते, मात्र तो मुद्दाम टाळण्यात आला. त्या संदर्भात त्यांनी तक्रार केली आहे. त्याच तक्रारीच्या अनुषंगाने

लहू खंडागळे यांना अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या आदेशानुसार महावीर जयंतीच्या सुट्टीच्या दिवशी मोबाईल नोटीसीद्वारे पोलिस अधीक्षक कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले. ही प्रक्रिया बेकायदेशीर असून, यामागे त्यांच्यावर दबाव टाकण्याचा आणि चौकशीतील दोषींना वाचवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

“जर मोबाईलवरून नोटीस देणे कायदेशीर मानले जात असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनीही मोबाईलवरूनच तक्रारी देणे आणि पोलीसांकडून स्वीकारणे ही प्रक्रिया रूढ करावी,” अशी ठाम भूमिका खंडागळे यांनी मांडली आहे.

या प्रकरणातील दोषींवर तत्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलिस महानिरीक्षक परिक्षेत्र, संभाजीनगर आणि,जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, धाराशिव यांच्याकडे केली आहे.

उमरगा तालुक्यात 2025-2030 सरपंच पद आरक्षण जाहीर – अनुसूचित जाती, जमाती व महिला प्रवर्गाला प्राधान्य

उमरगा (जिल्हा धाराशिव), 16 एप्रिल 2025 – उमरगा तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी सन 2025 ते 2030 या पंचवार्षिक कालावधीसाठी सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम उमरगा तहसील कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.), तसेच महिलांसाठी आरक्षित झालेल्या ग्रामपंचायतींची यादी जाहीर करण्यात आली.

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 13 ग्रामपंचायती आरक्षित

या कालावधीत 13 ग्रामपंचायतींचे सरपंच पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामध्ये खालील ग्रामपंचायतींचा समावेश आहे:

  1. आष्टा (ज)
  2. बेळंब
  3. गुरुवाडी/चंडकाळ
  4. बाबळसूर
  5. त्रिकोळी
  6. दाबका
  7. कदमापूर/दुधनाळ
  8. चिंचोली (ज)
  9. कंटेकूर
  10. जकेकूर
  11. पेठसांगवी
  12. येळी
  13. चिंचोली (भु)

अनुसूचित जाती महिलांसाठी 7 सरपंच पदे राखीव

या पैकी 7 ग्रामपंचायतींचे सरपंच पद अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आले असून, त्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे आहेत:

  1. आष्टा (ज)
  2. गुरुवाडी/चंडकाळ
  3. जकेकूर
  4. बाबळसूर
  5. येळी
  6. कदमापूर/दुधनाळ
  7. चिंचोली (भु)

अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 2 ग्रामपंचायती आरक्षित

अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी खालील दोन ग्रामपंचायतींची निवड झाली आहे:

  1. जवळगाबेट
  2. कोळसूर गुं

यातील कोळसूर गुं ही ग्रामपंचायत अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आली आहे.

नागरिंकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.) साठी 21 ग्रामपंचायती आरक्षित

या आरक्षणात 21 ग्रामपंचायती ना.मा.प्र. साठी निश्चित करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे:

  1. आनंदनगर
  2. कोरेगांव
  3. एकोंडी (ज)
  4. मुरळी
  5. भुसणी / भूसणीवाडी
  6. सावळसूर
  7. कोथळी
  8. तलमोड
  9. मळगीवाडी
  10. कलदेव निंबाळा
  11. समुद्राळ
  12. सांगवी (भि)
  13. वागदरी
  14. कदेर
  15. कसगी
  16. धाकटीवाडी
  17. औराद
  18. तुगांव
  19. येणेगूर
  20. एकूरगा
  21. सुपतगाव

यापैकी 10 ग्रामपंचायती ना.मा.प्र. महिला प्रवर्गासाठी आरक्षित असून त्यामध्ये कलदेव निंबाळा, सांगवी (भि), कदेर, कसगी, समुद्राळ, धाकटीवाडी, औराद, तुगांव, एकरगा व मळगीवाडी यांचा समावेश आहे.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी 44 ग्रामपंचायती आरक्षित

या यादीत सर्वसाधारण प्रवर्गासाठी 44 ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे, ज्यामध्ये कोराळ, नागराळ गुं, भगतवाडी, डिग्गी, नाईचाकूर, कराळी, गुजोंटी, चिंचकोटा, जकेकूरवाडी, बेडगा, मातोळा, हंद्राळ, नारंगवाडी, केसरजवळगा, आलूर, माडज, मळगी, वरनाळवाडी, सुंदरवाडी, महालिंगरायवाडी, दावलमलीकवाडी, अंबरनगर, तुरोरी, हिप्परगाराव, थोरलीवाडी, रामपूर, गणेशनगर, कोळसूर (क), बलसूर, कोरेगांववाडी, जगदाळवाडी, कवठा, कुन्हाळी, बोरी, काळानिंबाळा, दाळींब, मुळज, नाईकनगर (मु), गुगळगांव, पळसगांव, व्हंताळ, नाईकनगर (सू), कडदोरा यांचा समावेश आहे.

सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी 22 ग्रामपंचायतींची निवड

या प्रवर्गासाठी खालील ग्रामपंचायती आरक्षित आहेत:

  1. कवठा
  2. काळानिंबाळा
  3. नारंगवाडी
  4. नाईचाकूर
  5. गुगळगाव
  6. जकेकूरवाडी
  7. कोरेगांववाडी
  8. हिप्परगाराव
  9. दाळींब
  10. कडदोरा
  11. कराळी
  12. हंद्राळ
  13. दावलमलीकवाडी
  14. अंबरनगर
  15. जगदाळवाडी
  16. थोरलीवाडी
  17. व्हंताळ
  18. मातोळा
  19. पळसगांव
  20. नाईकनगर (सू)
  21. नाईकनगर (मु)
  22. भगतवाडी

.