Home Blog Page 21

नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा धाराशिव दौरा – २३ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

धाराशिव : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे मा. अध्यक्ष तथा मंत्री दर्जाचे श्री. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा जिल्हा दौरा २३ मे २०२५ रोजी होत आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे महामंडळाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील, विशेषतः मराठा समाजातील युवकांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि त्याचा जिल्हानिहाय लाभ घेण्याची स्थिती यावर या बैठकीत सखोल चर्चा होणार आहे.

महामंडळाच्या या योजनांच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यभरात रु. १,१२१ कोटींपेक्षा अधिक रक्कम लाभार्थ्यांना व्याज परताव्याच्या स्वरूपात वितरित करण्यात आली आहे.

सदर बैठकीसाठी जिल्ह्याचे उपनिबंधक (D.D.R.), मुख्य जिल्हा प्रबंधक (L.D.M.) व सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून जिल्ह्यातील जास्तीत-जास्त तरुणांना योजनेचा लाभ मिळवून देता येईल.

या दौऱ्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील युवकांना स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले जाणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

धाराशिव जिल्ह्यात 3 जून 2025 पर्यंत ड्रोनसह सर्व प्रकारच्या उड्डाणांवर बंदी; ‘नो फ्लायिंग झोन’ घोषित

धाराशिव (प्रतिनिधी) : देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत, धाराशिव जिल्ह्यात 3 जून 2025 पर्यंत ड्रोनसह सर्व प्रकारच्या उडत्या यंत्रांवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, धाराशिव जिल्हा संपूर्णपणे ‘नो फ्लायिंग झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.

हा निर्णय भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदुर’ मोहिमेनंतर घेतला आहे. या मोहिमेद्वारे जैश-ए-मोहम्मद (JEM), लष्कर-ए-तय्यबा (LET) आणि हिज्बुल मुजाहिद्दीन (HM) या दहशतवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या कारवाईचा सूड घेण्यासाठी संबंधित संघटना त्यांच्या स्लीपर सेलच्या माध्यमातून भारतातील विविध ठिकाणी, विशेषतः महाराष्ट्र राज्यात ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ले करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक, धाराशिव यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या तसेच सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने, कोणत्याही प्रकारचा ड्रोन, रिमोट-कंट्रोल मायक्रो एअरक्राफ्ट, पॅरा ग्लायडर, हँग ग्लायडर, हॉट एअर बलून आणि तत्सम उड्डाण करणाऱ्या यंत्रांचा वापर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

जिल्ह्याच्या अपर जिल्हादंडाधिकारी शोभा जाधव यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत या आदेशाची तातडीने अंमलबजावणी केली आहे. आदेशानुसार, या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा संघटनेविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223 अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

प्रशासनाने नागरिकांना या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले असून, सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही शंका किंवा माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

या काळात कोणत्याही वैयक्तिक, व्यावसायिक, सामाजिक किंवा सरकारी कारणांसाठीही ड्रोन वा तत्सम यंत्रांच्या उड्डाणास परवानगी दिली जाणार नाही.

संपूर्ण जिल्ह्यात नो फ्लायिंग झोन लागू – काय बंदी आहे?

  • ड्रोन
  • रिमोट नियंत्रित मायक्रो एअरक्राफ्ट
  • पॅरा ग्लायडर्स
  • हँग ग्लायडर्स
  • हॉट एअर बलून
  • तत्सम कोणतीही उडणारी वस्तू

बंदी कालावधी : आदेश दिनांकापासून 3 जून 2025 पर्यंत
कायदेशीर कारवाई : भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 अन्वये शिक्षेस पात्र

सूचना : जिल्ह्यातील नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने सजग राहून, कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास स्थानिक पोलिसांना कळवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

वाशी तालुक्यात बोगस रासायनिक खत रॅकेटचा पर्दाफाश; कृषी विभागाची मोठी कारवाई, दोघांवर गुन्हा दाखल

वाशी (प्रतिनिधी – राहुल शेळके): खरिपाच्या तोंडावर वाशी तालुक्यात बोगस रासायनिक खतांचा मोठा साठा उघडकीस आला असून, कृषी विभागाच्या संयुक्त कारवाईत बनावट खत विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान या रॅकेटचे धागेदोरे थेट गुजरातपर्यंत पोहोचल्याचे निष्पन्न झाले आहे.

दि. १५ मे रोजी सकाळी ११ वाजता वाशी तालुक्यातील पिंपळगाव लिंगी येथे, दसमेगाव रस्त्याच्या पश्चिमेला सुमारे ७०० मीटर अंतरावर गट नंबर ५६९ मधील एका कुकुटपालन शेडवर कृषी विभागाच्या पथकाने अचानक धाड टाकली. यावेळी सात वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावावर विनापरवाना साठवलेली ४५६ पोती रासायनिक खते (एकूण वजन सुमारे २०.२१५ टन, अंदाजित किंमत ४,६१,१२० रुपये) जप्त करण्यात आली.

या कारवाईचे नियोजन धाराशिव जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, कृषी संचालक (गुणवत्ता व नियंत्रण) सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक (लातूर) साहेबराव दिवेकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रवीण देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र माने आणि कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

संबंधित शेडमधील व्यक्तीकडे विचारणा केली असता, त्याने समाधानकारक उत्तर देण्यात अपयश आल्याने, जप्त खतांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. ज्यांच्या नावावर ही खते होती, त्या कंपन्यांशी संपर्क साधला असता, संबंधित लॉट नंबर त्यांच्या नोंदीत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे सदर साठा बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी वाशी तालुका कृषी अधिकारी राजाराम बर्वे यांच्या फिर्यादीवरून दत्तात्रय लिबराज तावरे (रा. पिंपळगाव लिंगी) आणि विकास रामभाऊ होळे (रा. खामकरवाडी) यांच्याविरोधात वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, तालुक्यात अजूनही बनावट खताचा साठा असण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली असून, पुढील कारवाईसाठी तपास अधिक गतीने सुरू आहे. अवैध खत विक्री रोखण्यासाठी कृषी विभागासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

तुळजाभवानी मंदिरात गेल्या ६ महिन्यांत १२ पुजाऱ्यांना प्रवेशबंदी; देऊळ कवायत कायद्याअंतर्गत कारवाई

तुळजापूर (ता. १४): तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे मागील सहा महिन्यांत एकूण १२ पुजाऱ्यांवर मंदिर प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील शिस्तभंग, अनुशासनबाह्य वर्तन, तसेच कायदा व सुव्यवस्थेस धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असून, सर्व प्रक्रिया देऊळ कवायत कायद्याच्या तरतुदींनुसार करण्यात आली आहे, अशी माहिती मंदिर संस्थान प्रशासनाने दिली.

मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले की, देऊळ कवायत कायदा लागू असलेल्या तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्यांचे वर्तन व कार्यपद्धती यांच्यावर नियमित नियंत्रण ठेवले जाते. संस्थानच्या वतीने वेळोवेळी पुजाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात येतात. त्या अनुषंगाने चौकशी करून दोषी आढळलेल्या पुजाऱ्यांवर विशिष्ट कालावधीसाठी मंदिर प्रवेशबंदीची कारवाई केली जाते.

प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आलेल्या पुजाऱ्यांची नावे व कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

  1. ओंकार हेमंत इंगळे – 27 नोव्हेंबर 2024 ते 26 डिसेंबर 2024 (1 महिना)
  2. अभिजीत माधवराव कुतवळ – 27 नोव्हेंबर 2024 ते 26 डिसेंबर 2024 (1 महिना)
  3. श्रीधर विनायक क्षीरसागर – 17 डिसेंबर 2024 ते 01 जानेवारी 2025 (15 दिवस)
  4. अक्षय किशोर कदम – 17 डिसेंबर 2024 ते 01 जानेवारी 2025 (15 दिवस)
  5. महेश भारत रोचकरी – 04 जानेवारी 2025 ते 18 जानेवारी 2025 (15 दिवस)
  6. अजय संजय शिंदे – 04 जानेवारी 2025 ते 18 जानेवारी 2025 (15 दिवस)
  7. सुदर्शन यशवंत वाघमारे – 01 जानेवारी 2025 ते 01 जुलै 2025 (6 महिने)
  8. रणजीत अविनाश साळूंके – 20 फेब्रुवारी 2025 ते 20 एप्रिल 2025 (2 महिने)
  9. अमित दत्तात्रय तेलंग-कदम – 12 एप्रिल 2025 ते 12 मे 2025 (1 महिना)
  10. नानासाहेब जगन्नाथ चोपदार – 13 एप्रिल 2025 ते 13 मे 2025 (1 महिना)
  11. तुषार विजयकुमार पेंदे – 23 एप्रिल 2025 ते 23 जुलै 2025 (3 महिने)
  12. प्रदीप विलास मोटे – 12 मे 2025 ते 12 ऑगस्ट 2025 (3 महिने)

या कारवाईमुळे पुजारी वर्गात मोठी खळबळ उडाली असून, काही पुजाऱ्यांनी संस्थान प्रशासनाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवत संबंधित कारवाईच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दुसरीकडे, मंदिर प्रशासनाने मंदिराच्या अनुशासनात्मक धोरणांप्रती कटिबद्धता व्यक्त करत ही कारवाई नियमबद्ध आणि आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.

तुळजाभवानी मंदिर हे राज्यातील प्रमुख शक्तीपीठ असून, येथे दररोज हजारो भाविक भेट देत असतात. त्यामुळे मंदिरातील शिस्त व धार्मिक कार्यपद्धतींचे पालन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अशा पार्श्वभूमीवर संस्थानचे हे पाऊल भविष्यात पुजारी वर्गासाठी एक इशारा मानला जात आहे.

शिक्षण विस्ताराधिकारी दादासाहेब घोगरे यांना राज्यस्तरीय गौरव पुरस्कार,

पुरस्कार वितरण १८ मे रोजी लातूरमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत

परंडा, दि. १४ मे (प्रतिनिधी) – डोंजा (ता. परंडा) येथील रहिवासी व तांदुळवाडी बीटचे शिक्षण विस्ताराधिकारी दादासाहेब घोगरे यांची मानव जीवनगौरव व मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. १९८८ पासून त्यांनी शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्यात केलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना “उत्कृष्ट अधिकारी” या सन्मानाने गौरविण्यात येणार आहे.

हा पुरस्कार दि. १८ मे रोजी लातूर येथील दयानंद कॉलेज सभागृहात भव्य समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थान समिती पंढरपूरचे सहकार्याध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, जागतिक कीर्तीचे भागवताचार्य पं. रमाकांत व्यास, प्रसिद्ध गायक डॉ. अंबरीष महाराज देगलूरकर व महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री मा. बाबासाहेब पाटील हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

या गौरवप्राप्त निवडीबद्दल परंडा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अशोक खुळे, भूम प.स.चे गटशिक्षणाधिकारी राहुल भट्टी, परंडा प.स.चे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण मुळे, तसेच शिक्षण विस्ताराधिकारी सूर्यभान हाके, शिवाजी काळे, गटशिक्षण कार्यालयातील सर्व कर्मचारी, तांदुळवाडी बीटमधील केंद्रप्रमुख भागवत घोगरे (डोंजा) व आनंद गायकवाड (तांदुळवाडी), बीटमधील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, तंत्रस्नेही शिक्षक आणि डोंजा व परिसरातील ग्रामस्थ यांनी घोगरे यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

दादासाहेब घोगरे यांच्या चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या कार्याला मिळालेला हा राज्यस्तरीय सन्मान शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

पिक विमा योजनेत गोंधळ, माहितीच उपलब्ध नाही; शेतकऱ्यांची फसवणूक उघड

धाराशिव, १४ मे (प्रतिनिधी)
प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अंमलबजावणीत सरकार गंभीर आहे का? की योजना केवळ विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी राबवली जाते? असा थेट सवाल आता शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. याला कारण ठरली आहे कृषी आयुक्त कार्यालयाने एका माहितीच्या मागणीवर दिलेली धक्कादायक प्रतिक्रिया – “ही माहिती आमच्याकडे नाही, पिक विमा कंपनीकडून घ्या!”


१. माहिती मागवली आणि टोलवाटोलवी

पिक विमा अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी ३० एप्रिल २०२४ रोजी केंद्र शासनाने काढलेल्या परिपत्रकावर आधारित माहिती कृषी आयुक्त कार्यालयाकडे मागवली होती. परिपत्रक लागू झाल्यानंतर महाराष्ट्रातील किती महसूल मंडळांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा जास्त पूर्वसूचना आल्या आणि नुकसान भरपाई किती देण्यात आली, याबाबत माहिती मागण्यात आली होती.

मात्र कृषी आयुक्त कार्यालयाने या पत्राला उत्तर देताना सांगितले की, “सदर माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही. ती संबंधित विमा कंपन्यांकडून घ्यावी.” सोबत विमा कंपन्यांची यादी देण्याचीही ‘कठोर दक्षता’ त्यांनी घेतली. हा सल्ला धक्कादायक असून शासनाची ही भूमिका जबाबदारी झटकणारी असल्याचा आरोप होत आहे.


२. केंद्र शासनाचे ३० एप्रिल २०२४ चे परिपत्रक – शेतकऱ्यांवर अन्याय

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कालावधीत हे परिपत्रक केंद्र सरकारने काढले. त्यानुसार, एखाद्या महसूल मंडळात २५% पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्यास, एकूण नुकसानभरपाईपैकी केवळ २५% रक्कमच शेतकऱ्यांना दिली जाते. उर्वरित ७५% रक्कम थांबवण्यात येते. या तरतुदीचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो आहे.


३. धाराशिव जिल्ह्यातील स्थिती भयावह

खरीप २०२३ मध्ये धाराशिव जिल्ह्यातील ५७ पैकी ३२ महसूल मंडळांमध्ये २५% पेक्षा जास्त पूर्वसूचना देण्यात आल्या. परिणामी, ७८० कोटी रुपयांचे नुकसान असतानाही केवळ २६० कोटींची भरपाई मिळाली.
खरीप २०२४ मध्ये तर सर्वच ५७ महसूल मंडळांत जास्त पूर्वसूचना आल्या असून केवळ २५० कोटींची भरपाई मिळाली आहे.
दोन वर्षांत शेतकऱ्यांचे एकूण १५८० कोटी रुपयांचे नुकसान भरपाईशिवाय राहिले आहे.


४. शासनाकडे माहितीच नाही, विमा कंपन्यांकडे सगळी सूत्रे

या गंभीर आकडेवारीवरून योजना कोण चालवतंय – शासन की विमा कंपन्या? हा मूलभूत प्रश्न उपस्थित होतो. शेतकऱ्यांच्या हक्काच्या माहितीबाबत शासनाने हात झटकणे ही निष्काळजीपणाची परिसीमा आहे. विमा कंपन्यांकडे सगळी माहिती असावी आणि शासन अनभिज्ञ असावे, हेच सूचित करते की विमा कंपन्यांचाच वरचष्मा आहे.


५. अनिल जगताप यांची प्रतिक्रिया

“पिक विमा योजना राबवताना राज्य शासन गंभीरच नाही. गेल्या आठ वर्षांत विमा कंपन्यांनी तब्बल ११ हजार कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी योजना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसते आहे. शासनाने त्वरित या योजनेत सुधारणा कराव्यात,” अशी मागणी पिक विमा याचिकाकर्ते अनिल जगताप यांनी केली.


शेतकऱ्यांचे नुकसान, शासनाची उदासीनता आणि विमा कंपन्यांचा एकाधिकार — या त्रिसूत्रीवर पिक विमा योजना सध्या उभी आहे. योजना खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी होण्यासाठी शासनाची स्पष्ट भूमिका, पारदर्शक कार्यपद्धती आणि माहितीचा खुलेपणा आवश्यक आहे.

मंदिर संस्थान कार्यालयात पुजाऱ्याचा धुडगुस; मद्यधुंद अवस्थेत तोडफोड – गुन्हा दाखल

तुळजापूर, ता. 14 (प्रतिनिधी): श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थान प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर संतप्त झालेल्या पुजारी अनुप कदम यांनी मद्यधुंद अवस्थेत मंदिर संस्थान कार्यालयात येऊन तहसीलदार तथा संस्थान व्यवस्थापकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत गोंधळ घालून तोडफोड केली. या प्रकारामुळे संस्थान प्रशासनाने तुळजापूर पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 13 एप्रिल रोजी अनुप कदम यांनी मंदिराच्या व्हीआयपी गेटवर सुरक्षा रक्षकांशी धक्काबुक्की करत शिवीगाळ केली आणि जबरदस्तीने मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर 15 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी तथा संस्थान अध्यक्ष यांच्या कार्यालयीन दालनात अप्पर जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याशी हुज्जत घालून वाद निर्माण केला. याच दिवशी त्यांनी सुरक्षा नियम धाब्यावर बसवत, संस्थानच्या सीसीटीव्ही कंट्रोल रूमचा दरवाजा लाथ मारून उघडल्याची घटना घडली.

ही सर्व प्रकरणे सुरक्षा रक्षक पुरवठादार कंपनी SISPL Pvt. Ltd. कडून प्राप्त अहवालाद्वारे स्पष्ट झाली असून, त्याची पुष्टी संस्थान प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेजद्वारे केली आहे. यानंतर प्रशासनाने 12 मे रोजी अनुप कदम यांना देऊळ कवायत कायदा 1954 च्या कलम 24 व 25 अंतर्गत तीन महिन्यांच्या मंदिर प्रवेश बंदीबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

मात्र याचा राग मनात धरून, दिनांक 13 मे रोजी अनुप कदम यांनी पुन्हा एकदा मद्यधुंद अवस्थेत मंदिर संस्थान कार्यालयात येत तहसीलदारांना उद्देशून अश्लील भाषेचा वापर केला. यावेळी त्यांनी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराची काच हाताने फोडली.

या प्रकारानंतर मंदिर संस्थान प्रशासनाने तात्काळ कारवाई करत तुळजापूर पोलिस ठाण्यात अनुप कदम यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 221 (सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन), 352 (दमदाटी), आणि 324(4) (सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे संस्थान परिसरात खळबळ उडाली असून, भाविकांमध्ये संतापाची भावना आहे.

मुरुमायण चा चेंडू पालकमंत्र्यांच्या कोर्टात — ढिम्म प्रशासन आता तरी हालेल का?

भाग ४

धाराशिव – तुळजापूर–लातूर राष्ट्रीय महामार्गावरील काक्रंबा येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी लागणाऱ्या मुरुमाच्या अवैध उत्खननाचे प्रकरण ‘मुरुमायण’ या नावाने जिल्ह्यात चांगलेच गाजू लागले असतानाच, आता या चेंडूची उंच फेक थेट पालकमंत्र्यांच्या कोर्टात झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत झोपलेले प्रशासन जागे होईल का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

मुंबईत नुकतीच धाराशिव जिल्ह्यातील विविध विकासकामांसंदर्भात उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीस जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान काक्रंबा उड्डाणपुलासाठी सुरू असलेल्या अवैध मुरुम उत्खननाचा मुद्दा समोर आला आणि सूत्रांच्या माहितीनुसार, यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

हे प्रकरण बाहेर आल्यावरही अद्याप कंत्राटदारावर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे सामान्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. उलटपक्षी, महसूल प्रशासनाचा मूक पाठिंबा असल्याची शंका अधिकच बळावली आहे. या सगळ्या प्रकारातून शासनाचा लाखोंचा महसूल गमावला जात आहे आणि याला जबाबदार ठरणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे.

तहसीलदार ज्योती चव्हाण यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, “उत्खनन खरंच अवैध पद्धतीने झाले आहे का, यासाठी ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करून चौकशी केली जाणार आहे. कंत्राटदाराने दोन गटातून परवानग्या घेतल्याची माहिती आहे. या प्रकरणात तहसीलदार अरविंद बोळंगे व संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी यांना वस्तुस्थिती तपासून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगितले.

मात्र याआधी जे काही घडले, ते प्रशासनाच्या थंडपणामुळेच घडले असल्याचा आरोप आता जनतेकडून केला जात आहे. त्यामुळे आता पालकमंत्र्यांच्या निर्देशांनंतर जिल्हा प्रशासन खरेच हालते का, की पुन्हा एखाद्या नव्या मुरुमायणची वाट पाहते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

धाराशिव भाजप जिल्हाध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची पुनर्नियुक्ती

धाराशिव : भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर दुसऱ्यांदा विश्वास दाखवला असून, त्यांच्या पूर्वीच्या कार्यकाळातील यशस्वी नेतृत्वाची दखल घेत जिल्हाध्यक्षपदाची धुरा पुन्हा त्यांच्या हाती सोपवण्यात आली आहे.

दत्ता कुलकर्णी यांच्या नेतृत्वात मागील कार्यकाळात नगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा अशा महत्त्वाच्या निवडणुका पार पडल्या होत्या. या सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला धाराशिव जिल्ह्यात उल्लेखनीय यश मिळाले होते. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या विश्वासामुळे भाजपाची घडी जिल्ह्यात अधिक बळकट झाली होती.

नव्या कार्यकाळातही पक्ष संघटन मजबूत करण्यासोबत आगामी निवडणुकांची तयारी, स्थानिक प्रश्नांवर प्रभावी भूमिका आणि जनसंपर्क वाढवणे या दिशेने ते काम करतील, असा विश्वास भाजपाच्या कार्यकर्त्यांतून व्यक्त केला जात आहे.

भूमी अभिलेख कार्यालयातील निमतनदार लाच घेताना रंगेहाथ अडकला

धाराशिव, दि. 10 मे 2025 – शेतजमिनीची हद्द कायम मोजणी करून खुणा करण्यासाठी 5000 रुपयांची लाच मागणारा भूमी अभिलेख विभागातील निमतनदार राजू गंगाराम काळे (वय 54) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले.

तक्रारदाराने आपल्या शेतजमिनीची (गट क्र. 239) हद्द कायम मोजणीसाठी उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, कळंब येथे अर्ज केला होता. त्यानुसार 8 मे रोजी मोजणी करण्यात आली. त्यानंतर खुणा करण्याच्या मोबदल्यात काळे यांनी तक्रारदाराकडे 5000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल करण्यात आली होती.

त्यानुसार 9 मे रोजी शिवाजी चौक, कळंब येथे पंचासमक्ष पडताळणी केली असता काळे यांनी लाच मागणी पुन्हा स्पष्ट केली. त्यानंतर सापळा रचून पहिल्या हप्त्यापोटी 3000 रुपये घेत असताना त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली.

अंगझडतीमध्ये 3000 रुपयांची लाच रक्कम, त्याव्यतिरिक्त 7620 रुपये रोख, एक सोन्याची अंगठी, मोजणीसंबंधी कागदपत्रांची फाईल, Vivo मोबाईल आणि Asus लॅपटॉप आढळून आले. तसेच आरोपीचा मोबाईल ताब्यात घेऊन त्याच्या घरी झडती सुरू आहे.

या प्रकरणी भ्र.प्र. अधिनियम 1988 च्या कलम 7 अंतर्गत कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम यांच्या नेतृत्वाखाली सिध्दाराम म्हेत्रे (उपविभागीय पोलीस अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोलीस अंमलदार सिद्धेश्वर तावसकर, शशिकांत हजारे, आशिष पाटील व जाकेर काझी यांचा समावेश होता.

भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार देण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1064 किंवा 9923023361 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.