Home Blog Page 19

बोंबला!! लोकसेवक बनले मालक

कारवाईचे आदेश नाही, स्वामित्वधन बुडाले तरी अवैध मुरुम उत्खननावर कारवाई करण्यासाठी प्रशासन धजेना

धाराशिव – तुळजापूर – लातूर महामार्गावर असणाऱ्या काक्रंबा येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी वापरात येणाऱ्या मुरुमाचे अवैध उत्खननाबत जियो टॅगिंग च्या फोटोसहीत बातम्या छापून देखील प्रशासन केवळ झोपलेले नसून प्रशासनातील लोकसेवक मालक बनले असल्याने करदात्यांकडे म्हणजेच सामान्य जनतेकडे बोंबलण्याशिवाय कुठलाच पर्याय उरला नाही.

तुळजापूर-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील काक्रंबा येथे सध्या उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र या विकासकामाच्या आड लाखो रुपयांचा मुरुम घोटाळा उघडकीस आला असून प्रशासनाची ढिसाळ भूमिका आणि दुर्लक्ष यामुळे जनतेच्या मनात तीव्र संताप निर्माण झाला आहे. या प्रकरणावर आतापर्यंत पाच भाग प्रकाशित झालेले असतानाही अद्याप कुठल्याही जबाबदार अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची तसदी घेतलेली नाही, ही बाब अधिकच धक्कादायक ठरत आहे. विशेष म्हणजे चौकशी करा किंवा कारवाई करा असे कुठलेच लेखी आदेश तलाठ्यांना देण्यात आले नसल्याने आदेश देण्याची जबाबदारी असणारे अधिकारी कोण? त्यांनी आदेश का दिले नाहीत? त्यांचे कंत्राटदारासोबत लागेबांधे आहेत का? हा निःपक्ष चौकशीचा भाग असून चौकशीच होत नसल्याने शासनाच्या उत्पन्नाचा भाग असणारे स्वामित्वधन बुडाले आहे.

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, संबंधित ठेकेदाराला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ८,००० ब्रास मुरुम उत्खननाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्ष पाहणीअंती हे स्पष्ट दिसत आहे की, ८,००० ब्रासच्या मर्यादेपेक्षा खूप अधिक मुरुम उत्खनन केले गेले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असतानाही प्रशासनाने डोळेझाक का केली? हा प्रश्न उपस्थित होतो. तसेच संबंधित गुत्तेदारांना देण्यात आलेली मुरूम उत्खननाची परवानगी सुद्धा संपली आहे तरीपण अजून कोणतीही दुसरी पूर्वकल्पना किंवा परवानगी न घेता उत्खनन सुरूच आहे यावरही अधिकाऱ्यांना संपर्क केला असता अधिकाऱ्याकडून कोणतेही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही असे सांगण्यात येत आहे.
अजून एक गंभीर बाब म्हणजे, परवानगी मिळवण्यासाठी अहवाल सादर करण्यात आले होते, ते प्रत्यक्षात २-३ वर्षांपूर्वीचे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच अहवालावर आधारित परवानग्या दिल्या गेल्या आहेत, हे लक्षात घेता नियमांची उघडपणे पायमल्ली करण्यात आल्याचे स्पष्ट होते.
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, परवानगी असलेल्या क्षेत्राच्या बाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणात मुरुम उत्खनन करण्यात आले आहे. कोणतीही पूर्वकल्पना, नोटीस किंवा परवानगी न घेता केलेले हे उत्खनन म्हणजे थेट कायद्याचा आणि पर्यावरण नियमांचा अपमान आहे. या प्रकरणावर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे.
या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी जेव्हा माध्यम प्रतिनिधीने जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी केली, तेव्हा त्यांच्याकडून सांगण्यात आले की, त्यांनी पंचनामा करण्यासाठी तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठ्यांना सूचना दिल्या आहेत. मात्र जेव्हा तहसीलदार व काक्रंबा तलाठी यांच्याशी संपर्क साधण्यात आला, तेव्हा त्यांनी असे कोणतेही आदेश आमच्याकडे आलेले नाहीत, असे सांगून हात झटकले. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते — माहिती लपवून गुत्तेदारांना पाठीशी घालण्याचा प्रकार घडतो आहे.
हा संपूर्ण प्रकार जिल्हा प्रशासनाच्या नजरेआड झाला असण्याची शक्यता कमीच आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अवैध उत्खननासमोर प्रशासनाचे मौन संशयास्पद ठरत आहे. ठेकेदारांच्या मदतीला काही अधिकारी पुढे आले आहेत का? त्यांना आर्थिक फायदा झाला आहे का? हे प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत.
या संपूर्ण प्रकारामुळे तुळजापूर व परिसरातील जनतेमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. या घोटाळ्याची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. मुरुम घोटाळ्याच्या या प्रकाराला मुरुमायण म्हटले जात असून आता त्यात कारवाई कधी होईल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबईकडे नेत असलेला ८.२७ किलो गांजा येडशी येथे जप्त

धाराशिव – मुंबईकडे विक्रीसाठी नेत असलेला गांजाचा साठा स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांनी सापळा रचून जप्त केला. येडशी येथे ट्रॅव्हल पॉईंटजवळ एका इसमाला अटक करून ८.२७ किलो वजनाचा, १ लाख ६५ हजार ४०० रुपयांचा गांजा हस्तगत करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार व पथक १२ जून रोजी रात्री १२.०५ च्या सुमारास गस्त घालत असताना, हॉटेल समाधान समोर संशयास्पदरीत्या थांबलेला एक इसम काळ्या बॅगसह आढळून आला. पथकाने त्याला थांबवून बॅगबाबत विचारणा केली असता, त्याने त्यामध्ये गांजा असल्याचे कबूल केले.

त्यानंतर ग्रामीण पोलिसांच्या मदतीने पंचनामा करून ८.२७ किलो गांजा जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव वसंत भालचंद्र शिंदे (रा. वाखरवाडी, ता. जि. धाराशिव) असे असून, तो हा गांजा ढोकी येथून मुंबईकडे विक्रीसाठी नेत असल्याची माहिती पुढील तपासात उघड झाली आहे.

सदर गुन्ह्याची नोंद धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र. नं. १२५/२५ कलम ८ (क), २०(ब)(२)(ब) एनडीपीएस कायद्यानुसार करण्यात आली आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, पोनि मारुती शेळके, सपोनि सुदर्शन कासार, उपनिरीक्षक उद्धव हाके, हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, पोना राजकुमार वाघमारे, पोका सुधीर भांतलवंडे, चपोअ रत्नदीप डोंगरे, रामलिंग बनाळे आणि डॉग स्कॉडचे सुजित वडणे व संतोष शाहीर यांनी संयुक्तपणे पार पाडली.

पहिली शादी हुइ नहीं तब तक तिसरी शादी मुबारक, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातून येणाऱ्या पाण्याची अवस्था, काल्पनिक पात्रांची चर्चा…

धाराशिव जिल्ह्यातल्या एका खेडेगावात सध्या सुरू असलेल्या राजकारावरून दोन मित्र गप्पा मारत आहेत. गावांचं देखील शहरीकरण झालं असल्याने चावडी, पार, अशी जुनी ठिकाणं आता राहिली नाहीत तिथं सध्या कोणीच बसत नाही. बाभळीच्या झाडाखाली एक टपरी असून तिथं गुटखा मिळत असला तरी रावसाहेब आणि आबासाहेब हे दोन दोस्त पान खात खात चर्चा करत आहेत. खेडेगाव म्हणाल्यावर मोठं नाव घ्यायला जड जातं त्यामुळे गावातल्या लोकांनी त्याचे संक्षिप्त नाव दिले असून  रावश्या आणि आबाश्या अशी त्यांची नावं आहेत.

रावश्या  – काय रं आबाश्या असा एक टक बघत कशाचा विचार करायलास

आबाश्या – (कोणी तरी आपल्याला बोलतंय पण त्याला उत्तर द्यायचं म्हणून स्वर काढत) हम्म्म

रावश्या – अरे मी तुला बोलतोय ( आबाश्या च्या पाठीवर थाप मारत)

आबाश्या – दचकून, काही नाही जरा वंगाळ स्वप्न पडलं

रावश्या –  कसलं स्वप्न?

आबाश्या – लगा आपण आणखी पेरणी केली नाही अन् मला स्वप्न पडलं की सोयाबीनचा भाव पडला, शेतात केलेला खर्च बी निगाला नाय

रावश्या – आरं आत्ताच त्याचा इचार कशाला करायचा, इमा हाय, इमा आणणारं स्पेशालिस्ट आमदार आपल्या जिल्ह्यात हायत

आबाश्या – इम्याचं कशाला घेऊन बसला एक रुपयात इमा उतरवीत होते ते बंद केलंय आन आपत्ती आल्यावर मिळणाऱ्या मदतीच्या घटकासह काही तरी बदल केलेत त्यामुळं इमा भरून बी मिळल की नाही याची ग्यारंटी नाय

रावश्या – पुढचं पुढं बघू ताण नगस घेऊ

आबाश्या – इम्याच कवच राहिलं नाही पाऊस जरा बरा हाय पण पुढं पावसानं वढ दिली तर पाणी नाय

रावश्या – आरं ते आपल्या हातात नाय

आबाश्या – खरं हाय पण, ते पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी आपल्या जिल्ह्यात येणार होतं, आपल्या तळ्यात ते पाणी येणार होतं ते आलं असतं तर पिकाला अडचण आली नसती

रावश्या – ती दि सोडून त्याचा इचार करू नग

आबाश्या – का नाय करायचा आपल्या हक्काचा इशय हाय

रावश्या – व्हय हक्काचा हाय पण येऊस्तर काय खरं नाय

आबाश्या – कसं खरं नाय काल दादानी प्रेस घेतली त्यात प्रयत्न चालू हायत, ईश्वास असून सकारात्मकतेने घ्या असं म्हणालेत

रावश्या – आरं त्याचा जी आर निघाला, 7 टी एम सी पाण्याच्या बाबतीत काम सुरू आहे, १६ टी एम सी साठी प्रयत्न सुरू हायत त्यांचं

आबाश्या – (दाढी खाजवत) 39 टी एम सी चा काय विषय होता

रावश्या – लगा मला पण नाही समजला

आबाश्या – इलेक्शन च्या अगुदर दोनदा पाणी येईल म्हणून सांगितलं व्हतं, ते तर नाहीच आलं पण ही 16 टी एम सी अन् 39 टी एम सी चा विषय समोर आल्यानं कायच घोळ कळना गेलाय

रावश्या – लय ताण नको घेऊ जरा पेपरवाल्यसनी, यूटुब वाल्यासनी इशय समजू दी मग, इरोधातल्या दोन दादासनी इशय समजू दी कुणी तरी सांगलच की

आबाश्या – कुणी सांगणार नाहीत जे ते त्याच्या राड्यात हायती, पण इतका वेळ इचार करून एक वळ आठवली

रावश्या – कसली वळ?

आबाश्या – पहिलं पाणी आलं नाही, दुसरं कागदावर हाय त्याचं बी काय खरं नाय, तवर तिसरा इशय आणलाय

रावश्या – ही कसली वळ?

आबाश्या – वेगळी वळ हाय, हिंदीत हाय

रावश्या – मग सांग की लगा लवकर

आबाश्या – पहिली शादी हुइ नहीं तब तक तिसरी शादी मुबारक

रावश्या – आर मला कायच समजलं नाय

आबाश्या – कर अभ्यास याच्यावर…

कळंब तालुक्यातील पिंपळगाव (को)येथे किराणा दुकानावर वीज पडून अंदाजे पाच लाखाचे नुकसान.

वाशी( राहुल शेळके): कळंब तालुक्यातील पिंपळगाव (को)येथे दि.8 जून रोजी सायंकाळी आठ वाजता अचानक मुसळधार पाऊस चालू झाला. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट सुरू होता. पिंपळगाव (को) येथील कल्याण अंबादास चौधरी यांचे मेन रोडवर कुंदन किराणा स्टोअर्स छोटेसे दुकान आहे. पाऊस सुरू झाला म्हणून चौधरी यांनी दुकानाला कुलूप लावून आपल्या घरी गेले. तोच सायंकाळी 8:32 मिनिटांनी विजांचा कडकडाट झाला. एक वीज किराणा दुकानाला धडकून दरवाज्यातून आत गेली. त्यामुळे तेथे मोठा आगीचा लोळ निर्माण झाला. किराणा दुकानात विक्रीसाठी ठेवलेले सर्व साहित्य तसेच चौधरी यांच्या मुलाचे गेल्या सहा महिन्यापूर्वी लग्न झाल्यामुळे त्यांच्या लग्नात आलेले सर्व संसार उपयोगी साहित्य, कपाट ,दिवाण ,गादी, भांडे सर्व या आगीत भस्म झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.ही घटना झाल्याबरोबर गावचे सरपंच ज्ञानेश्वर सुंदर तांबडे आणि आजूबाजूच्या गावकऱ्यांनी तेथे जाऊन आग वीजवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो प्रयत्न फसला. या झालेल्या घटनेमुळे चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून प्रशासनाने त्यांना लवकरात लवकर पंचनामा करून मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

धाराशिव : कुख्यात घरफोड्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या; १५ गुन्हे उघड, ३.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव, दि. ८ जून २०२५ : धाराशिव जिल्ह्यातील घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यात स्थानिक गुन्हे शाखेने मोठे यश मिळवले आहे. कुख्यात आरोपी कृष्णा ऊर्फ पिंटू खडेल शिंदे (रा. मुरुड) याला अटक करून त्याच्याकडून साडेआठ तोळे (८४ ग्रॅम) सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण ३ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत जिल्ह्यातील १५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलीस अधीक्षक रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. पथकात सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन खटके, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर कराळे (अंगुलीमुद्रा शाखा), पोलीस हवालदार विनोद जानराव, पोलीस हवालदार प्रदीप वाघमारे, पोलीस हवालदार नितीन जाधव, पोलीस हवालदार मनोज जगताप (अंगुलीमुद्रा शाखा), पोलीस नाईक बबन जाधव, पोलीस नाईक योगेश कोळी, चालक पोलीस हवालदार महेबुब अरब, चालक पोलीस हवालदार प्रकाश बोईनवाड आणि चालक पोलीस हवालदार विनायक दहीहंडे यांचा समावेश होता.

पेट्रोलिंगदरम्यान गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर वाठवडा शिवारातील एका हॉटेलजवळ आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपीने पळण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी शिताफीने त्याला पकडले. चौकशीत आरोपीने त्याच्या दोन साथीदारांसह धाराशिव शहर, ढोकी, वाशी, परंडा, लोहारा, आनंदनगर आणि धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील एका वर्षात अनेक घरफोड्या केल्याची कबुली दिली. चोरलेले सोन्याचे दागिने आणि पैसे याची वाटणी करून त्याने स्वतःच्या वाट्याचे दागिने मुरुड येथील घरी ठेवल्याचे सांगितले, ज्याचा उपयोग प्लॉट खरेदी आणि घर बांधण्यासाठी करणार होता. पोलिसांनी त्याच्या घरातून साडेआठ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले.

जप्त मुद्देमाल आणि आरोपीला पुढील कारवाईसाठी आनंदनगर पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आले आहे. या यशस्वी कारवाईमुळे जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

तामलवाडी एम.आय.डी.सी.,३० लाख एकरीच्या अमिषाला शेतकरी बधले नाहीत नाही, जमीन न देण्याच्या निर्णयावर ठाम

जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक नजरअंदाज अधिकृत की अनधिकृत?

धाराशिव – तुळजापूर तालुक्यात तामलवाडी येथे प्रस्तावित एम. आय. डी. सी. ला शेतकरी जमीन न देण्याच्या निर्णयावर ठाम असून आम्हाला कोणत्याही बैठकीला बोलवू नका असे स्पष्ट निवेदन देत त्यांनी प्रशासनाला त्यांची भूमिका खदखद कळवली, मात्र यात एक झाले तामलवाडीच्या शेतकऱ्यांना एम आय डी सी जमिनीसाठी २५ ते ३० लाख मिळणार असे सांगण्यात आले होते ते खोटे ठरले आहे. २५ ते ३० लाख रुपये एकरी मिळणार असे प्रशासनाने लेखी कळवले नसल्याने हा आकडा कोणी आणला? का आणला? त्यात कोणाचा फायदा? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जिल्हा प्रशासनाने कुठेही एकरी ३० लाख मिळणार असल्याचा प्राथमिक नजर अंदाज असल्याचे अधिकृत रित्या सांगितले नसताना तुळजापूरच्या लोकप्रतिनिधींनी माध्यमांना सांगितलेली माहिती खरी आहे की खोटी याबाबत साशंकता आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, वारंवार (आम्हाला आधी सूचनेतील अधिनियमच्या कलम ३२ (२) च्या व्यक्तिगत नोटीसला दिनांक २०/८/२०२४ रोजी लेखी व दिनांक २३/१/२०२५ रोजी व दिनांक २२/५/२०२५ रोजी मा. उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी धाराशिव यांना समक्ष लेखी व तोंडी कळवले आहे.) तामलवाडी येथील नियोजित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी जमीन संपादित करण्यासाठी शासकीय व निमशासकीय बैठकीस बोलले जाते.

परंतु आम्ही सर्व शेतकरी सरकारी कोणत्याही मोबदल्याचा विचार न करता आमच्या जमिनी वडिलोपार्जित व आम्ही सर्व भूमिहीन होणार असल्यामुळे आम्हाला मोबदल्याची कोणतेही अपेक्षा नाही. त्यामुळे आमच्या जमिनी कोणत्याही परिस्थितीमध्ये औद्योगिक महामंडळासाठी भूसंपादित होऊ देणार नाहीत. त्यामुळे आमच्या खालील सही करणार सर्व शेतकरी यांची कोणत्याही प्रकारचे सहमती नसल्यामुळे येथून पुढील कोणत्याही बैठकीसाठी बोलवण्यात येऊ नये. निवेदनावर निवेदनावर नागेश भाकरे, सचिन शिंदे, राधा भोसले, दत्ता घोटकर, दत्तात्रय जाधव, बाबासाहेब जगताप, उषा जगताप, समाधान घोटकर महादेव घोटकर, मोईन बेगडे, शिवाजी रणसुरे सुरेश जाधव ,शारदाबाई जाधव, लक्ष्मीबाई मर्ढेकर तुकाराम सगर यांच्या सह्या आहेत.

आरडीसींच्या दालनाचे बांधकाम अवैध, अनधिकृत वातानुकूलित यंत्रणा बसवल्याची तक्रार

धाराशिव, दि. 05 ऑगस्ट 2025: धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) यांच्या दालनात अवैध बांधकाम आणि अनधिकृत वातानुकूलित यंत्रणा बसवल्याचा गंभीर आरोप करणारा तक्रार अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. केशेगाव (ता. व जि. धाराशिव) येथील रहिवासी श्री. लहू रामा खंडागळे यांनी हा अर्ज दाखल करून याप्रकरणी सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

अर्जानुसार, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात खिडकीच्या आत एक भिंत बांधून बांधकाम मानांकन नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. हे बांधकाम केव्हा, कोणाच्या परवानगीने आणि वैध आहे की अवैध, याची तपासणी करण्याची मागणी अर्जदाराने केली आहे. तसेच, दालनात परवानगीशिवाय वातानुकूलित यंत्रणा बसवल्याचा दावा करत, याची परवानगी वरिष्ठांकडून घेतली आहे की नाही, याचीही चौकशी व्हावी, असे अर्जात नमूद आहे.

श्री. खंडागळे यांनी पुढे मागणी केली आहे की, जर हे बांधकाम अवैध ठरले, तर बांधकामाचा खर्च संबंधित अधिकाऱ्यांच्या वेतनातून वसूल करावा. तसेच, अवैध बांधकाम पाडून आणि अनधिकृत वातानुकूलित यंत्रणा तात्काळ काढून टाकण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय हे प्रशासनाचे केंद्रीय कार्यालय असून, येथील बांधकामे कायदेशीर आणि नियमानुसार असणे अपेक्षित आहे. या तक्रारीने कार्यालयातील पारदर्शकता आणि नियमांचे पालन यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धाराशिव-सोलापूर रेल्वे प्रकल्पासाठी अवैध मुरुम उत्खनन; लहू खंडागळे यांची पुराव्यानिशी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

धाराशिव, दि. ३ जून २०२५: धाराशिव जिल्ह्यातील वरूडा साठवण तलाव, उपळा (मा.) येथे सोलापूर-धाराशिव रेल्वे मार्गाच्या कामासाठी ISC Projects – GPT JV, पुणे या कंत्राटदार कंपनीकडून गौण खनिज (मुरुम) उत्खननादरम्यान परवानगीच्या अटी व शर्तींचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप लहू रामा खंडागळे (केशेगाव, ता. व जि. धाराशिव) यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडे तक्रार अर्ज सादर करून कंत्राटदार आणि संबंधित कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग क्र. ०१, धाराशिव यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

तक्रारीतील प्रमुख मुद्दे:

लहू खंडागळे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव (गौण खनिज शाखा) यांनी ISC Projects – GPT JV, पुणे यांना वरूडा साठवण तलावातील मुरुम उत्खननासाठी काही अटी व शर्तींसह परवाना दिला आहे. मात्र, कंत्राटदाराकडून या अटींचे सर्रास उल्लंघन होत आहे. यामुळे स्थानिक पर्यावरण, रस्ते आणि शेतीला धोका निर्माण झाला आहे. तक्रारीतील प्रमुख आक्षेप खालीलप्रमाणे आहेत:

  1. सीमांकनाबाहेर खोदकाम: तलावातील खोदकाम हे ठरलेल्या सीमांकनातच व्हायला हवे. परंतु, कंत्राटदाराकडून सीमांकनाबाहेर सर्रास खोदकाम होत आहे, ज्यामुळे पर्यावरणीय नुकसान होण्याची शक्यता आहे. यावर दंडात्मक कारवाईची मागणी खंडागळे यांनी केली आहे.
  2. असमान खोदकाम:  तलावाचे खोलीकरण समान पद्धतीने करणे बंधनकारक आहे, जेणेकरून एकाच ठिकाणी खोल खड्डे होणार नाहीत. मात्र, कंत्राटदार एकाच ठिकाणी खोल खड्डे खणत असल्याने तलावाच्या संरचनेला धोका निर्माण झाला आहे.
  3. रस्त्यांचे नुकसान आणि दुरुस्तीचा अभाव: कंत्राटदाराने वाहतुकीमुळे खराब झालेले रस्ते आणि तलावाची डागडुजी करणे आवश्यक आहे. तथापि, कंत्राटदाराकडून याकडे दुर्लक्ष होत असून, तांत्रिक अधिकाऱ्यांची उपस्थितीही नसल्याचा आरोप आहे.
  4. रात्रीच्या वेळी खोदकाम: खोदकाम केवळ सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंतच करता येते. परंतु, कंत्राटदार २४ तास, विशेषत: रात्रीच्या वेळीही खोदकाम करत आहे. यासोबत खंडागळे यांनी छायाचित्रे (Lat-Long सह) पुराव्याच्या स्वरूपात जोडली आहेत.
  5. वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि रस्त्यांची दुरवस्था:  शासनाच्या वाहतूक नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. परंतु, कंत्राटदाराच्या वाहनांमुळे धाराशिव-वरूडा रस्ता चिखलमय झाला असून, दररोज अपघात होत आहेत. तसेच, रस्त्यापासून अत्यंत जवळ (१ फूटपेक्षा कमी अंतरावर) खोदकाम होत असल्याने रस्त्याच्या संरचनेला धोका आहे. यामुळे शेतीसाठी रस्त्यांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.

कार्यकारी अभियंत्यांवरही आरोप:
खंडागळे यांनी कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग क्र. ०१, धाराशिव यांच्यावर कंत्राटदाराला सहाय्य करण्याचा आरोप केला आहे. त्यांनी या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.

इतर तलावांबाबतही चौकशीची मागणी:
तक्रारीत असेही नमूद आहे की, धाराशिव जिल्ह्यातील इतर पाझर/साठवण/सिंचन तलावांमध्येही अशाच प्रकारे अटी व शर्तींचे उल्लंघन होत आहे. यामुळे सर्व तलावांमधील उत्खननाची सखोल चौकशी व्हावी, अशी विनंती खंडागळे यांनी केली आहे.

पुराव्यांचा समावेश:
खंडागळे यांनी तक्रारीसोबत Angle Cam चे छायाचित्र (Lat-Long सह) जोडले असून, यामुळे त्यांच्या आरोपांना बळ मिळाले आहे. या छायाचित्रांमधून रात्रीच्या वेळी होणारे खोदकाम आणि रस्त्यांची दुरवस्था दिसून येते.

प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई:
या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडे कंत्राटदार ISC Projects – GPT JV, पुणे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच, तहसीलदार, धाराशिव, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, जिल्हा जलसंधारण अधिकारी, आणि उपमुख्य अभियंता (बांधकाम), मध्य रेल्वे, सोलापूर यांना माहितीसाठी प्रत पाठवण्यात आली आहे.
सोलापूर-धाराशिव रेल्वे मार्ग हा महत्वाकांक्षी प्रकल्प असला, तरी त्यासाठी होणारे मुरुमाचे अवैध उत्खनन स्थानिक शेतकरी आणि नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यांची दुरवस्था, पर्यावरणीय नुकसान आणि तलावांच्या संरचनेचा धोका यामुळे स्थानिकांमध्ये असंतोष वाढत आहे. खंडागळे यांच्या तक्रारीमुळे प्रशासन या प्रकरणाची किती गंभीरपणे दखल घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


सोलापूर-धाराशिव रेल्वे मार्ग हा महत्वाकांक्षी प्रकल्प असला, तरी त्यासाठी होणारे मुरुमाचे अवैध उत्खनन स्थानिक शेतकरी आणि नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यांची दुरवस्था, पर्यावरणीय नुकसान आणि तलावांच्या संरचनेचा धोका यामुळे स्थानिकांमध्ये असंतोष वाढत आहे. खंडागळे यांच्या तक्रारीमुळे प्रशासन या प्रकरणाची किती गंभीरपणे दखल घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


लहू खंडागळे यांच्या तक्रारीने धाराशिव जिल्ह्यातील गौण खनिज उत्खननाच्या अनियमिततेवर प्रकाश टाकला आहे. प्रशासनाने याची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी अपेक्षा स्थानिक व्यक्त करत आहेत. यामुळे रेल्वे प्रकल्पाच्या प्रगतीसोबतच पर्यावरण आणि स्थानिकांच्या हितांचे संरक्षण होईल, अशी आशा आहे.

मित्रा उपाध्यक्षांना ‘राज्यमंत्री दर्जा ‘ खोडसाळपणा की राजकारण

धाराशिव – जिल्ह्यात शासकीय बैठकांत विशेषतः जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मित्रा उपाध्यक्षांना राज्यमंत्री दर्जा असल्याबाबतच्या पाट्या झळकल्या मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार मित्रा उपाध्यक्षांना राज्यमंत्री दर्जा असल्याबाबतचे कुठलेही आदेश, शासन निर्णय किंवा परिपत्रक नसल्याचे समोर आले. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मित्रा उपाध्यक्षांना राज्यमंत्री दर्जा अशी नेम प्लेट लावण्याचा खोडसाळपणा कोणी केला की त्या मागे कुठले राजकारण आहे याचा शोध लागत नाही.

जिल्हाधिकारी कार्यालयातून याबाबत दोन शासन निर्णय असल्याचे सांगितले.

३१ जुलै २०२३ च्या शासन निर्णयात म्हटले आहे की,

महाराष्ट्र इस्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन-मित्र (Maharashtra Institution for Transformation MITRA या संस्थेच्या नियामक मंडळावरील उपाध्यक्ष यांना शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक शासाउ -१०.१०/प्र.क्र. ९६/१०/सा.उ., दिनांक १३/०३/२०१२ मधील तरतूदी विचारात घेवून खालील नमूद सोयी सुविधा अनुज्ञेय करण्यास शासन मंजूरी देण्यात येत आहे.

१. बैठक भत्ता, रु. ५००/- प्रति बैठक

२. निवासी दुरध्वनी वरील खर्च रु.३०००/- प्रतिमहा

३. कार्यालयीन कामासाठी वाहन सुधिधेवरील खर्च

अ) प्रशासकीय विभागाने वाहन सुविधा चालकासह उपलब्ध करून दिल्यास इंधन व तेला वरील खर्च प्रतिवर्ष रु. ७२,०००/-

आ) उपाध्यक्षांना स्वतःचे खाजगी वाहन चालकासह कार्यालयीन कामासाठी अनुज्ञेय असेल तर दरमहा रु. १०,०००/-

४. बैठकीनिमित्त राहण्याची सोय व किरकोळ बाबी प्रित्यर्थ करावयाचा खर्च मुंबई येथे प्रतिदिन रु. ७५०/-

५. प्रवास भत्ता व दैनिक भत्ता सचिव दर्जाचे अधिकारी यांना लागू असलेल्या दराप्रमाणे

६. दौण्यातील सुविधा शासकीय विश्रामगृह येथे निवासाची व्यवस्था, डी.वी. वाहन अनुशेष

७. शासकीय समारंभातील स्थान शासकीय समारंभाच्या वेळी मंत्र्यानंतरचे स्थान

शासन निर्णयात कुठेही राज्यमंत्री दर्जा असा उल्लेख नसल्याने शासकीय बैठकीत होणारा उल्लेख टाळून राजशिष्टाचारात सुधारणा होईल का नाही हे पाहावे लागेल.

बोर्डा पाझर तलावातील बेकायदेशीर कृत्यांवर प्रशासन कधी दाखवणार डोळसपणा?

बोर्डा (ता. कळंब, जि. धाराशिव): बोर्डा येथील पाझर तलाव क्रमांक १ मधील शासकीय संपादित क्षेत्रात बेकायदेशीर मुरमाची विक्री, विहीर खणून पाण्याचा अनधिकृत वापर, आणि निकृष्ट बांधकामामुळे तलाव फुटण्याची भीती, अशा गंभीर तक्रारी डोळ्याने दिव्यांग असलेल्या शेतकऱ्याने, बालासाहेब शामराव मासाळ यांनी प्रशासनाकडे केल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून सातत्याने तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि लघु पाटबंधारे उपविभागाकडे अर्ज करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे संतप्त झालेल्या मासाळ यांनी आता आठ दिवसांत (३ जून २०२५ पर्यंत) मोजणी आणि पंचनामा न झाल्यास ४ जून २०२५ रोजी तलावातील विहिरीत आत्महत्येचा इशारा दिला आहे. या प्रकरणाने प्रशासनाच्या बेपर्वाईवर आणि डोळ्याने दिव्यांग शेतकऱ्याच्या न्याय मागणीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

तक्रारीचे स्वरूप आणि गंभीर आरोप

बालासाहेब मासाळ, बोर्डा येथील रहिवासी, यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, शासनाने पाझर तलाव क्रमांक १ साठी संपादित केलेल्या क्षेत्रात बेकायदेशीर कृत्ये सुरू आहेत. त्यांनी खालील गंभीर मुद्दे उपस्थित केले:

  1. मुरमाची बेकायदेशीर विक्री: संपादित क्षेत्रातील मुरूम बेकायदेशीरपणे विकला गेला आहे.
  2. अनधिकृत विहीर आणि पाण्याचा वापर: तलावाच्या जमीनीत विहीर खणून पाण्याचा गैरवापर केला जात आहे.
  3. निकृष्ट बांधकाम: तलावाच्या भरावातील काळी माती काढून मुरूम भरला गेला असून, रोलिंग न केल्याने काम निकृष्ट आहे. यामुळे पाण्याची गळती होत असून तलाव फुटण्याची शक्यता आहे.
  4. पाण्याचा प्रवाह रोखला: आठ फूट उंचीचा ताल मारून पाण्याचा प्रवाह रोखला गेला आहे, ज्यामुळे संपादित जमीन शेतीसाठी वापरली जात आहे.

प्रशासनाची उदासीनता

मासाळ यांनी यापूर्वी ८ ऑक्टोबर २०२४, ११ फेब्रुवारी २०२५, १७ फेब्रुवारी २०२५, ७ मार्च २०२५, २६ मार्च २०२५ आणि ५ मे २०२५ रोजी तहसील कार्यालय, लघु पाटबंधारे उपविभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रारी केल्या. शासनाने पंचनामाही केला, परंतु बोर्डा येथील उपसरपंच प्रणव विजेंद्र चव्हाण यांनी तो खोटा असल्याचा आरोप केला. मासाळ यांनी यासंदर्भात पुन्हा मोजणी आणि पंचनाम्याची मागणी केली आहे, परंतु प्रशासनाकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा त्यांचा दावा आहे.

आत्महत्येचा इशारा

प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे हताश झालेल्या मासाळ यांनी गंभीर पाऊल उचलण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी आपल्या अर्जात स्पष्ट म्हटले आहे की, जर ३ जून २०२५ पर्यंत संपादित क्षेत्राची मोजणी आणि पंचनामा झाला नाही, तर ते ४ जून २०२५ रोजी तलावातील विहिरीत आत्महत्या करतील. याची संपूर्ण जबाबदारी शासन आणि प्रशासनावर राहील, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, आपली तक्रार खोटी ठरल्यास कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दिव्यांग शेतकऱ्याचा लढा

बालासाहेब मासाळ हे डोळ्याने दिव्यांग असूनही गावाच्या आणि तलावाच्या हितासाठी लढत आहेत. त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे, पंचनाम्याची प्रत आणि यापूर्वीच्या अर्जांच्या प्रती प्रशासनाला सादर केल्या आहेत. तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रशासनाला जाग कधी येणार?

बोर्डा पाझर तलाव हा गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी आणि शेतीसाठी महत्त्वाचा आहे. परंतु, बेकायदेशीर कृत्यांमुळे तलावाच्या संरचनेला धोका निर्माण झाला आहे. मासाळ यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे म्हणजे गावाच्या भविष्याशी खेळणे आहे. प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

मागण्या

  • संपादित क्षेत्राची तातडीने मोजणी आणि पंचनामा करावा.
  • बेकायदेशीर मुरूम विक्री, विहीर खणणे आणि निकृष्ट बांधकामाची चौकशी करावी.
  • तलावाच्या गळतीमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याची तपासणी करून दुरुस्ती करावी.
  • प्रशासनाने मासाळ यांच्या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा.

बालासाहेब मासाळ यांचा लढा हा केवळ वैयक्तिक नाही, तर संपूर्ण गावाच्या हिताचा आहे. डोळ्याने दिव्यांग असूनही त्यांनी प्रशासनाला जागे करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. आता प्रशासनाने डोळसपणा दाखवत या प्रकरणात त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा, तलाव फुटण्याची शक्यता आणि मासाळ यांनी दिलेला आत्महत्येचा इशारा यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात. प्रशासन कधी जागे होणार, हा प्रश्न गावकऱ्यांसह मासाळ यांनाही सतावत आहे.