Home Blog Page 16

दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण प्रकरण उघडकीस : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची यशस्वी कारवाई, तीन आरोपींना अटक

धाराशिव, – पुण्यातून अपहरण करण्यात आलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीची सुटका करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन अपहरणकर्त्यांना अटक केली आहे. ही कारवाई मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना (प्रभारी पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, पो.ह. विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, पो.ना. बबन जाधवर व चालक पो.ह. महेबुब अरब यांच्या पथकाने ही कारवाई केली.

घटनाक्रम असा की, पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दिवसांपूर्वी एका दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याची माहिती पो.उ.नि. निलेश मोकाशी यांनी धाराशिव गुन्हे शाखेला दिली होती. त्यानंतर तपासदरम्यान तुळजापूर येथील सुनिल सिताराम भोसले व त्याच्या साथीदारांवर संशय आल्याने पोलिसांनी ताबडतोब कारवाई सुरू केली.

तपासात समोर आले की, सुनिल भोसले (वय ५१, रा. तुळजापूर), शंकर उजण्या पवार (वय ४०, रा. हासेगाव, ता. लातूर) आणि शालुबाई प्रकाश काळे (वय ३५, रा. तुळजापूर) या तिघांनी पुण्यातून कोमल धनसिंग काळे (वय २ वर्षे) हिला अपहरण करून लातूर जिल्ह्यातील हासेगाव येथे ठेवले होते.

पथकाने या तिघांना ताब्यात घेत अपह्रुत मुलीची सुखरूप सुटका केली. यानंतर सर्व आरोपी व मुलीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पुणे येथील पो.उ.नि. निलेश मोकाशी व मपोअं डुकरे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही धाडसी व वेगवान कारवाई करत चिमुकलीला तिच्या कुटुंबाकडे सुखरूप परतवणाऱ्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दुर्गप्रेमी, मराठी भाषा प्रेमी उद्धव ठाकरे

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नाही, तर संपूर्ण देशाच्या राजकीय-सांस्कृतिक चेतनेचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी उभारलेले गड-किल्ले या मातीतल्या अभिमानाचे प्रतीक आहेत. आज तंत्रज्ञानाच्या युगात ड्रोनसारख्या साधनांद्वारे हे दुर्गदुर्गेश्वर पाहता येतात, मात्र दोन दशकांपूर्वी एका छायाचित्रकाराने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेली ही दुर्गचित्रे आजही जनतेच्या मनात घर करून आहेत.तो छायाचित्रकार होता – उद्धव ठाकरे.

१९९०च्या दशकात “माझा गड माझा अभिमान” या छायाचित्रमालिकेद्वारे उद्धव ठाकरे यांनी शिवरायांचे किल्ले, त्यांची शौर्यगाथा, वास्तूशास्त्र, आणि निसर्गसौंदर्य एकत्रित करून जनतेपुढे सादर केलं. मला उद्धव ठाकरे हे नाव प्रथम याच संग्रहामुळे परिचित झालं. छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची आर्तता आणि प्रेरणा जनमानसापर्यंत पोहोचवणाऱ्या या कार्यासाठी त्यांचे कौतुक व्हायलाच हवे.

महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस
शुभेच्छुक – शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) धाराशिव

अर्थात, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे आधीच राजकीय व सामाजिक क्षेत्रात परिचित होते. पण २०१९ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याने त्यांची एक वेगळी, निर्णायक ओळख निर्माण झाली.


🏛️ राजकीय लाटेतील वेगळा प्रवाह

२०१४ नंतर देशात “भाजप म्हणजे सत्ता” आणि “सत्ता म्हणजे भाजप” हे समीकरण दृढ होत चालले होते. विविध राज्यांतील नेते भाजपात सामील होऊ लागले. विरोधकांची अवस्था कमकुवत होत चालली होती. त्याच काळात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीची कल्पना मांडून सत्ता स्थापनेचा एक वेगळा मार्ग निवडला – आणि मुख्यमंत्री झाले.

या निर्णयाची किंमत मात्र मोठी होती.

भाजपला ही घडामोड सहज पचली नाही. सत्तेपासून दूर राहिलेल्या शक्ती, माध्यमं आणि केंद्रीय यंत्रणा – हे सगळं उद्धव ठाकरेंच्या सरकारविरोधात उभं राहिलं. आणि नंतर आलेलं कोविड संकट ही आणखी एक मोठी परीक्षा ठरली.


🦠 कोविड काळातील नेतृत्व: संवादातून धैर्य

महाराष्ट्र हे देशातील आर्थिक आणि औद्योगिक केंद्र. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ, देशभरातून कामासाठी येणारे कामगार – या सगळ्यांमुळे राज्यात कोविडचा प्रसार अधिक झपाट्याने झाला. मात्र या कठीण काळात उद्धव ठाकरे यांनी घेतलेला संयमित आणि संवादात्मक दृष्टिकोन उल्लेखनीय ठरला.

  • गरिबांसाठी ‘शिवभोजन थाळी’ ही योजना सुरू करून कोणी उपाशी झोपू दिलं नाही.
  • फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी थेट संवाद साधला, धीर दिला.
  • स्थलांतरित मजुरांच्या व्यवस्थापनात राज्य प्रशासन पुढे होतं.
  • त्यांच्या भाषेतील साधेपणा आणि आपलेपणा सामान्य माणसाला भिडत होता.

महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस
शुभेच्छुक – शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) धाराशिव

🛡️ राजकीय घात: बंडखोरी आणि न्यायालयीन लढा

कोविड काळात उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. ते प्रत्यक्ष भेटीगाठी करू शकत नव्हते. अशा स्थितीतच पक्षातील काही नेत्यांनी बंडखोरी केली. ही बंडखोरी स्वेच्छेने होती की करवून घेतली गेली – हे प्रश्न आजही जनतेच्या मनात आहेत.

या काळात राजकारणाचा स्तर खालावला. आजारी असलेल्या नेत्याविरुद्ध कारवाया करणं – हे रणभूमीचे नव्हे, तर लोकशाहीचे नियमही भंग करणारे होते.

तरीही उद्धव ठाकरे डगमगले नाहीत. त्यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात आपल्या पक्षासाठी लढा दिला. लोकसभा निवडणुकीत प्रचार करून पक्षाच्या जागा वाढवल्या. त्यांच्या उपस्थितीचा प्रभाव मित्रपक्षांच्या मतांवरही दिसून आला.


🗳️ निवडणुका, शंका आणि नव्या लढ्याची सुरुवात

पुढील विधानसभा निवडणुकीत महायुतीची सत्ता आली, मात्र त्याच्या निकालात अचानक वाढलेली मतदानाची आकडेवारी प्रश्न निर्माण करणारी ठरली. विजयानंतरही महायुतीच्या नेत्यांमध्ये जोमाने उत्सव झाला नाही. हे वास्तव काही सांगून जातं.

आता राज्यात नवा मुद्दा चर्चेत आहे – त्रिभाषा सूत्र आणि हिंदी सक्ती. मराठीवर लादला जाणारा दबाव पाहता उद्धव ठाकरे पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. याच मराठीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले – जुने मतभेद बाजूला ठेवत.


🪔 मराठीसाठी एकत्र आलेले ठाकरे – नवी दिशा

प्रबोधनकार ठाकरे यांचे वारस आणि शिवरायांचे दुर्गप्रेमी पुत्र, हे दोघं मराठीच्या रक्षणासाठी एकत्र आलेत हे मोलाचं आहे. या एका मुद्द्यावरूनच महाराष्ट्रात पुन्हा एक  नवचैतन्य निर्माण होऊ शकतं.

आज मराठी भाषेसाठी, अस्मितेसाठी लढणाऱ्या प्रत्येक पत्रकार, साहित्यिक, शिक्षक, नागरिकांनी या लढ्यात सहभागी व्हायला हवं. कारण:

“छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभाराची भाषा टिकवण्यासाठी लढणारा प्रत्येकजण योद्धा असतो.”


🎉 उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

शिवरायांच्या प्रेरणेने गड-किल्ल्यांतून प्रवास करणारा छायाचित्रकार, जनतेशी थेट संवाद करणारा मुख्यमंत्री, संकटात संयम राखणारा नेता आणि आजही मराठीसाठी रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता – उद्धव ठाकरे हे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वेगळी ओळख आहे.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा…
त्यांच्या नेतृत्वाला, धैर्याला आणि मराठी प्रेमाला दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.


धाराशिव बसस्थानकातील लाचप्रकरणी विभागीय स्थापत्य अभियंता रंगेहाथ अटक

धाराशिव – शहरातील बसस्थानक जागा ताब्यात देण्यासाठी आणि कँटीनच्या शटरविषयी तडजोड करून लाच स्वीकारणाऱ्या विभागीय स्थापत्य अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (लाप्रवि) पथकाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई सोमवार, २२ जुलै रोजी करण्यात आली.

तक्रारदार गुत्तेदार असून, त्यांना धाराशिव बसस्थानकात वाहनतळ जागा वाटप करण्यात आली होती. सदर जागेचा ताबा देण्यासाठी आणि बाजूच्या कँटीनच्या पार्किंगकडील शटरबाबत लाच मागणी केल्याचा आरोप विभागीय स्थापत्य अभियंता शशिकांत अरुण उबाळे (वय ४९, रा. अंत्रोळीनगर, होडगी रोड, सोलापूर) यांच्यावर आहे.

या प्रकरणात तक्रारदाराने दिनांक १८ जुलै २०२५ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पडताळणी केली असता, आरोपीने पंचांसमक्ष डी.सी. साहेबांसाठी ५ हजार रुपये आणि स्वतःसाठी ४ हजार रुपये अशी एकूण ९ हजार रुपयांची लाचेची मागणी करून स्वीकारण्यास सहमती दर्शवली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या युनिटने २२ जुलै रोजी सापळा रचून धाराशिव बसस्थानकाच्या आवारात आरोपी शशिकांत उबाळे यांना तक्रारदाराकडून पंचांसमक्ष ९ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून लाच रक्कमेसह मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.

या कारवाईनंतर आरोपीच्या सोलापूर येथील घराची झडती घेण्यासाठी लाप्रवि पथक तात्काळ रवाना झाले असून, झडतीची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांना अटक करून पुढील तपास केला जाणार आहे.

या प्रकरणी आरोपीचा मोबाईलही ताब्यात घेण्यात आला असून त्याचे डिजिटल विश्लेषण करून अधिक माहिती घेतली जाणार आहे. आरोपीवर कारवाई करण्याचे अधिकार मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयातील मा. महाव्यवस्थापक (बांधकाम) यांच्याकडे आहेत.

सदर सापळा कारवाई पोलीस निरीक्षक विजय वगरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. यामध्ये पोलीस अंमलदार नरवटे, तावसकर, हजारे, काझी यांचा समावेश होता. संपूर्ण कारवाईला पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे (लाप्रवि, संभाजीनगर परिक्षेत्र), अपर पोलीस अधीक्षक सुरेश नाईकनवरे आणि पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे यांचे मार्गदर्शन लाभले.

घरफोडी प्रकरणात सराईत चोर गजाआड; दोन तोळे आठ ग्रॅम सोने जप्त

धाराशिव शहरातील घरफोडी प्रकरणातील सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करत त्याच्याकडून दोन तोळे आठ ग्रॅम वजनाचे, 2 लाख 52 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. ही कामगिरी अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

पोलिस ठाणे धाराशिव शहर येथे दाखल असलेल्या गुन्हा क्र. 346/2025 भा.न्या.सं. कलम 331(4), 305 अन्वये घरफोडी प्रकरणात तपास सुरु होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, आणि इतर कर्मचारी यांचे पथक आरोपीचा शोध घेत होते. आयकर युनिटचे सपोनि सुधीर कराळे, पोउपनि चंद्रकांत सावंत, आणि पोह. मनोज जगताप यांच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास पुढे नेण्यात आला.

गुप्त माहितीच्या आधारे परसु लक्ष्मण चव्हाण, रा. जुना बसडेपो पाठीमागे, पारधी पिढी, धाराशिव याला शिवाजी चौकात अटक करण्यात आली. प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या घरफोडी प्रकरणात त्याचा चुलता दत्ता बाबु चव्हाण सहभागी असल्याचेही त्याने सांगितले. त्याच्याकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून तेच मुद्देमाल असल्याची कबुली आरोपीने दिली. दागिने विकण्यासाठी तो बाहेर पडल्याचेही त्याने सांगितले.

गुन्ह्याचा तपास आणि मुद्देमाल परत मिळाल्याने फिर्यादी आजीमोद्दीन उमराव शेख यांनी मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे आभार मानले आहेत. या प्रकरणामुळे ‘पोलीस काही करत नाहीत’ हा गैरसमज दूर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ही संपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली. या पथकात सपोनि अमोल मोरे, सचिन खटके, आयकर युनिटचे सुधीर कराळे, पोउपनि चंद्रकांत सावंत, पोह. विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, पोना बबन जाधवर, पोह. मनोज जगताप, चालक महेबुब अरब, पोअं. प्रकाश बोईनवाड, विनायक दहीहंडे यांचा समावेश होता.

जिल्हाधिकारी कार्यालयातील शौचालयाचे बांधकाम अवैध ठरणार! नगर रचना विभागाचा अभिप्राय नाही!!

धाराशिव – जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रवेशद्वारावर असलेले शौचालयाचे बांधकाम अवैध असल्याबाबत याबाबत दैनिक जनमत ने यापूर्वी बातमी प्रसिद्ध केली आहे. 2015 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने भूमी अभिलेख विभागाकडून रस्त्याच्या सीमा निश्चित केलेल्या आहेत या सीमा ओलांडून हे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम अतिक्रमणात सुरू आहे. याबाबत उपविभागीय अभियंता पी. डी. मोरे यांना माहिती नाही. बांधकाम नियमानुसार होत असल्याचे त्यांनी यापूर्वी सांगितले आहे. मात्र हे बांधकाम करताना आणखी एक महत्वाचा नियम असल्याचे बोलले जाते तो म्हणजे नगर रचना विभागाचा अभिप्राय. शासकीय विभागांना बांधकाम करताना नगर रचना विभागाचा अभिप्राय घेणे आवश्यक आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने असा कुठलाच अभिप्राय नसल्याचे किंवा त्याबाबत कुठलाही पत्रव्यवहार झाला नसल्याचे प्रताप पवार यांनी दैनिक जनमतशी बोलताना सांगितले. तब्बल 60 लाख खर्चून हे बांधकाम होत असताना नियम धाब्यावर बसवले जात आहेत किमान याची निःपक्ष चौकशी होणे क्रमप्राप्त असताना प्रशासन बघ्याची भूमिका घेत असेल तर हा निधीचा अपव्यय आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातच अतिक्रमण आणि नियम डावलून बांधकाम सुरू असेल तर पारदर्शकतेची अपेक्षा कोणाकडून ठेवायची हा प्रश्न आता विचारला जात आहे.

पार्वती मल्टीस्टेट घोटाळा : ठेवीदारांच्या पैशासाठी संघर्ष सुरूच राहणार – अनिल जगताप


धाराशिव : पार्वती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या विविध शाखांमार्फत उच्च व्याजाचे आमिष दाखवून झालेल्या आर्थिक फसवणुकीविरोधात ठेवीदारांनी लढ्याचा निर्धार केला आहे. शनिवारी लोहारा आणि उमरगा तालुक्यातील ठेवीदारांची बैठक आष्टामोड येथे पार पडली. यावेळी ठेवीदारांनी आपली व्यथा सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांच्या समोर मांडली.

सोसायटीच्या लोहारा, सास्तूर, तुरोरी, उमरगा, येणेगूर, सालेगाव शाखांमधून १२ टक्के व्याजाचे आमिष दाखवून शेकडो ठेवीदारांची फसवणूक झाली. काहींनी पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या आर्थिक गुन्हे शाखा, धाराशिवकडे तपास सुरू आहे.

या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने उमरगा सत्र न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात १६२ ठेवीदारांची सुमारे ५ कोटी ७३ लाख रुपयांची रक्कम परत न दिल्याची नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात ठेवीदारांची संख्या ३५० पेक्षा जास्त असून, एकूण फसवणूक १० कोटींहून अधिक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

बैठकीनंतर अनिल जगताप यांनी ठेवीदारांना आश्वासन दिले की, “रुपयाल ना रुपया मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील.” ते पुढे म्हणाले, “कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल केली जाईल. सरकारी वकीलासोबत ठेवीदारांकडून स्वतंत्र वकील नेमून बाजू भक्कमपणे मांडली जाईल. सहकार विभाग, रिझर्व्ह बँक व जिल्हा प्रशासनाकडेही मालमत्ता जप्ती व परतफेडीसाठी पाठपुरावा केला जाईल.”

या घोटाळ्यात काही संचालकांना अटक झाली असली, तरी काहीजण अटकपूर्व जामीन मिळवून मोकळे फिरत आहेत. याबाबत नाराजी व्यक्त करत जगताप यांनी अटकपूर्व जामीन अर्ज रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.

बैठकीत ठेवीदारांनी एकमताने ठरवले की, न्याय मिळण्यास विलंब झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी अनिल जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

पार्वती मल्टीस्टेटमध्ये ठेव असलेल्या ९० टक्के ठेवीदारांचा शेतकऱ्यांमध्ये समावेश असून, त्यांच्या कष्टाच्या पैशांची झालेली फसवणूक लक्षात घेता परिसरात संताप व्यक्त होत आहे. आगामी काळात या प्रकरणात संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.


पालकमंत्री बदलण्याचं पत्र दिल्याचं सपशेल खोटं तर मित्रा सीईओंच्या दौऱ्याबाबत गुप्तता का?

धाराशिव (आकाश नरोटे)- १५ लाख वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि आ. राणाजगजितसिंह पाटील एकत्र एका व्यासपीठावर आले कार्यक्रम शांततेत पार देखील पडला मात्र पालकमंत्री बदला असे पत्र आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती त्याबद्दल थेट प्रश्न शेवटी पत्रकारांनी विचारलाच आणि त्यावर आ. पाटील यांनीच स्पष्ट केले की हे सपशेल खोटं आहे. मात्र पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या भाषणातील काही मुद्दे खटकण्यासारखे होते ते असे म्हणाले की मी धाराशिव मध्ये आलो की वृक्षारोपण केलेल्या ठिकाणाला आवर्जून भेट देणार, इथे भेट देऊन पुढे जाणार हे वाक्य साधे वाटत असले तरी मी पालकमंत्रिपद सोडणार नाही याबाबत त्यांनी ठाम भूमिका यातून मांडली असल्याचे स्पष्ट होते.
तत्पूर्वी गत शनिवारी मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांचा दौरा झाला त्यांना राज्यमंत्री दर्जा आहे, ते मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार असताना त्यांचा दौरा माध्यमांना कळू न देणे ही साधी गोष्ट नाही मात्र तुळजापूर मध्ये झालेल्या त्या बैठकीत ते अर्धा ते पाऊण तास होते त्यानंतर त्यांनी बैठक सोडली ती का सोडली याचे उत्तर बैठकीत बसलेल्या व्यक्तींनी आणि प्रशासनाने द्यायला हवे. तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या निमित्ताने ही बैठक होती त्यात तुळजाभवानी संस्थान च्या अंतर्गत सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याबाबत चर्चा झाली आराखड्यातून ते काम व्हावे यावर काही तरी बिनसल्याचे बोलले जात आहे. त्याच्या एक दोन दिवसांनंतर एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा  तुळजापूर दौरा झाला या दौऱ्याबाबत देखील गुप्तता पाळण्यात आली. पत्र दिल्याचं सपशेल खोटं असलं असे आ. राणाजगजितसिंह पाटील सांगत असले तरी गेल्या आठवड्याभरात झालेल्या घडामोडी सारं काही आलबेल असल्याचे दर्शवत नाहीत. जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटींच्या कामांना दिलेली स्थगिती अजूनही उठवण्यात आलेली नाही, राजकीय कुरघोड्या देखील थांबलेल्या नाहीत. पालकमंत्री बदला या पत्राबाबत चर्चा थांबली असली तरी तुळजापूर विकास आराखडा आणि त्या संदर्भात होत असलेल्या घडामोडी आणि शिवसेनेकडे असलेले पालकमंत्रिपद याचं थेट कनेक्शन असल्याने कुरघोड्या आणि राजकारण सुरूच राहील यात भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते कितपत लक्ष देतात यावरच सारे काही अवलंबून आहे.

परंडा नगरपरिषदेने ‘हरित धाराशिव अभियान’ यशस्वीपणे पार पाडले

वृक्ष लागवड मोहिमेत शहरातील १२ शाळांतील १,७६५ विद्यार्थी, १६३ शिक्षक व १६० महिलांचा सहभाग

पर

परंडा, १९ जुलै – महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “हरित धाराशिव अभियान” अंतर्गत परंडा नगरपरिषदेने ५१ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण केले. शहरातील विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये आणि नागरिकांच्या सहभागातून ही मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली.

या अभियानांतर्गत शुक्रवारी सकाळी सात वाजता जामगाव रोडवरील हजरत खाजा बद्रोद्दिन दर्गा परिसरात घनवन पद्धतीने वृक्ष लागवड सुरू झाली. मोहिमेत शहरातील १२ शाळांमधील १,७६५ विद्यार्थी, १६३ शिक्षक, तसेच १६० महिला बचत गट सदस्यांनी सहभाग नोंदवला.

या प्रसंगी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर, जिल्हा परिषद सभापती दत्ता साळुंके, तहसीलदार निलेश काकडे, गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत, नगरसेवक वाजिद दखनी, सर्फराज कुरेशी, रत्नकांत शिंदे, जावेद पठाण, संजय घाडगे यांच्यासह अनेक मान्यवर आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा नगरपरिषद, शैक्षणिक संस्था, महिला बचत गट, विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आणि नागरिकांनी एकत्रित येऊन ही भव्य वृक्ष लागवड मोहीम राबवली.

वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या हस्ते मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. अभियानाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिलेल्या सर्व सहभागींचे मुख्याधिकारी वडेपल्ली यांनी आभार मानले.

हरित धाराशिव अभियानात २९४ ठिकाणांपैकी २६२ ठिकाणांचे झाले माती परीक्षण, १० पैकी ६ नगरपालिकांचा माती परीक्षणाला ‘खो’

धाराशिव – जिल्हा प्रशासनाच्या ‘हरित धाराशिव’ या महत्वाकांक्षी अभियानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच, नगरपरिषद क्षेत्रांतील उदासीनतेमुळे संपूर्ण मोहिमेच्या यशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील २९४ प्रस्तावित वृक्षारोपण स्थळांपैकी केवळ २६२ ठिकाणांचेच माती परीक्षण पूर्ण झाले असून, उर्वरित ३२ ठिकाणांचे परीक्षण प्रलंबित आहे. विशेष म्हणजे यात धाराशिव, कळंब, मुरुम आणि वाशी या महत्त्वाच्या शहर वगळता इतरांनी माती परीक्षण केले नसल्याची माहिती आहे. शहरी भागांमध्ये शुद्ध प्राणवायूची गरज अधिक असूनही त्यांनीच या मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे.

या वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत, वन विभाग, सामाजिक वनीकरण, वन्यजीव विभाग, तहसील कार्यालय तुळजापूर आणि सीना-कोळेगाव धरण परिसरातील एकूण २९४ ठिकाणी घनदाट वृक्षारोपण केले जाणार आहे. १९ जुलै रोजी एकाच दिवशी हे वृक्षारोपण पार पडणार असून, त्यासाठीची पूर्वतयारी म्हणून माती परीक्षण अत्यंत महत्त्वाचे होते. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दोन महिन्यांपूर्वीच या अभियानासाठी विशेष पाठपुरावा सुरू केला होता. तसेच ३ ते ९ जुलैदरम्यान जिल्हा माती परीक्षण प्रयोगशाळेला सर्व ठिकाणांची माती तपासण्याचे निर्देशही देण्यात आले होते.

मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करत काही नगरपालिका क्षेत्रांनी माती परीक्षणास सहकार्यच केले नाही. परिणामी, वृक्ष लागवडीपूर्वीची एक अत्यावश्यक शास्त्रीय प्रक्रिया पूर्ण न झाल्याने त्यावरून संबंधित यंत्रणांची मानसिकता स्पष्ट होते. विशेषतः जिथे प्रदूषण अधिक आहे, अशा शहरी भागांतच माती परीक्षण केले गेले नाही, हे अधिक चिंताजनक आहे. ग्रामीण भागातील अनेक ग्रामपंचायतींनी मात्र योग्य प्रतिसाद देत ही प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे.

माती परीक्षणामध्ये सामू, क्षारता, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सेंद्रिय कार्बन या घटकांची चाचणी करण्यात आली. चाचणी झालेल्या २६२ ठिकाणी अहवाल सकारात्मक आल्याने वृक्ष लागवडीस पोषक वातावरण असल्याचे स्पष्ट झाले. मात्र उर्वरित ठिकाणांबाबत निश्चित निष्कर्ष नसल्यामुळे वृक्ष लागवडीचा यशस्वीपणा अनिश्‍चिततेत आहे.

दरम्यान, वृक्ष लागवडीनंतर त्यांचे संगोपन होणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचाही यावर ठाम भर असून, या विषयात कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही, असे प्रशासनाचे धोरण आहे. परंतु ज्या यंत्रणांनी माती परीक्षणासारख्या प्राथमिक टप्प्यालाच गांभीर्याने घेतले नाही, त्या संगोपनाचे कार्य किती मनापासून करतील, याबाबत शंका उपस्थित होत आहेत.

या विषयावर जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तथापि, संपूर्ण जिल्ह्याचा सहभाग आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून वृक्ष लागवड होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सुत्रांनी सांगितले. ‘हरित धाराशिव’ उपक्रमाची विश्वासार्हता आणि परिणामकारकता जपण्यासाठी या त्रुटी तातडीने दूर करणे काळाची गरज ठरत आहे.

तुळजापूरातील ब्रह्मदेव मूर्ती दुभंगल्याप्रकरणी संताप: हिंदुत्वनिष्ठ संघटनांची एकमुखी मागणी – दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा!

धाराशिव – श्रीक्षेत्र तुळजापूर येथे मंदिर विकास आराखड्याच्या नावाखाली प्राचीन ब्रह्मदेव मूर्तीच्या दुभंगण्याच्या घटनेने धार्मिक वातावरण ढवळून निघाले असून, समस्त हिंदुत्वनिष्ठ व धार्मिक संघटनांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक  सुनील घनवट यांच्या नेतृत्वाखाली आयोजित पत्रकार परिषदेत शासन व प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर सडकून टीका करण्यात आली.

प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात सध्या विकास आराखड्याचे काम सुरू आहे. मात्र या कामाच्या दरम्यान पुरातन उपदेवता असलेल्या श्री ब्रह्मदेव मूर्तीची निर्बंध न पाळता केलेली हालचाल आणि त्यामुळे ती मूर्ती दुभंगल्याचा प्रकार घडला आहे. मंदिर परिसरातील १३ उपदेवतांच्या मुर्त्या हलवण्यात आल्या आहेत.या निष्काळजीपणाच्या घटनेमुळे हिंदू धर्मीयांच्या धार्मिक भावना प्रखरपणे दुखावल्या आहेत. गेली अडीच महिने तक्रारी करूनही कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने विविध संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या पत्रकार परिषदेत महंत मावजीनाथ महाराज, इच्छागिरी महाराज, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे परमेश्वर कदम, माजी अध्यक्ष किशोर गंगणे, अधिवक्ता शिरीष कुलकर्णी,  परिक्षीत साळुंखे यांसह अनेक प्रतिष्ठित उपस्थित होते.

सुनील घनवट यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे:

  • ब्रह्मदेव मूर्ती आधीपासूनच दुभंगलेली होती हा दावा चुकीचा आहे; ती मूर्ती पूर्वी अखंड होती, याचे लेखी-छायाचित्रीय पुरावे आहेत.
  • मूर्ती हलवताना विधी न करता चुकीची पद्धत वापरली गेली. स्थानदेवतांच्या कुलाचाराआधी मूर्तींचा कुलाचार अपेक्षित होता.
  • मूर्ती दुभंगल्याची माहिती दडपण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे.
  • जिल्हाधिकारी मंदिर संस्थानचे अध्यक्ष असूनही त्यांनी निष्क्रियता दाखवली आहे.
  • मूर्तीची नोंद नसल्याचे तहसीलदारांचे विधान दिशाभूल करणारे आहे; त्यांना तिथे राहण्याचा अधिकार आहे का, असा सवाल उपस्थित केला.
  • विकास आराखड्यात कुलाचारासाठी जागा राखलेली नाही, स्थानिकांच्या सूचना दुर्लक्षित केल्या.

संत महंत व पुजाऱ्यांची प्रतिक्रिया:

महंत मावजीनाथ महाराज यांनी ब्रह्मदेव मूर्तीच्या बाहेर नेण्याच्या कृतीचा निषेध केला. अमरराजे कदम यांनी प्रशासनाने ब्रह्मदेव मूर्तीची नोंद न ठेवल्याची कबुली दिल्याचे सांगत, हे मूळ परंपरेवर आघात असल्याचे नमूद केले. किशोर गंगणे यांनी विकासकामांबाबत आक्षेप असूनही त्यांच्या सुनावण्या घेण्यात न आल्याचा आरोप केला.

मागण्या:

  • दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
  • जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी स्थानिक पुजारी मंडळ, धार्मिक संघटना व ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक तातडीने बोलवावी.
  • मंदिर विकास आराखड्यात पारदर्शकता ठेवावी; लेखी दस्तऐवज जनतेपुढे यावा.
  • धर्मशास्त्रज्ञ, धर्माचार्य व शंकराचार्य पिठांचे मार्गदर्शन घ्यावे.
  • पारंपरिक वंशपरंपरागत धार्मिक कृतींसाठी स्वतंत्र जागा राखून ती आराखड्यात स्पष्ट करावी.
  • मूळ मंदिर रचना कायम ठेवून कोणताही ऐतिहासिक, धार्मिक किंवा वास्तुविश्वास भंग होणार नाही, याची शासनाने हमी द्यावी.

या सर्व पार्श्वभूमीवर मंदिर महासंघ, श्री तुळजापूर संरक्षण कृती समिती, समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना व स्थानिक ग्रामस्थांतर्फे शासनाला अल्टीमेटम देण्यात आले असून, यापुढेही दुर्लक्ष झाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.