Home Blog Page 15

पार्वती मल्टीस्टेट घोटाळा : ठेवीदारांच्या पैशासाठी संघर्ष सुरूच राहणार – अनिल जगताप


धाराशिव : पार्वती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या विविध शाखांमार्फत उच्च व्याजाचे आमिष दाखवून झालेल्या आर्थिक फसवणुकीविरोधात ठेवीदारांनी लढ्याचा निर्धार केला आहे. शनिवारी लोहारा आणि उमरगा तालुक्यातील ठेवीदारांची बैठक आष्टामोड येथे पार पडली. यावेळी ठेवीदारांनी आपली व्यथा सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांच्या समोर मांडली.

सोसायटीच्या लोहारा, सास्तूर, तुरोरी, उमरगा, येणेगूर, सालेगाव शाखांमधून १२ टक्के व्याजाचे आमिष दाखवून शेकडो ठेवीदारांची फसवणूक झाली. काहींनी पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या आर्थिक गुन्हे शाखा, धाराशिवकडे तपास सुरू आहे.

या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने उमरगा सत्र न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात १६२ ठेवीदारांची सुमारे ५ कोटी ७३ लाख रुपयांची रक्कम परत न दिल्याची नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात ठेवीदारांची संख्या ३५० पेक्षा जास्त असून, एकूण फसवणूक १० कोटींहून अधिक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

बैठकीनंतर अनिल जगताप यांनी ठेवीदारांना आश्वासन दिले की, “रुपयाल ना रुपया मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील.” ते पुढे म्हणाले, “कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल केली जाईल. सरकारी वकीलासोबत ठेवीदारांकडून स्वतंत्र वकील नेमून बाजू भक्कमपणे मांडली जाईल. सहकार विभाग, रिझर्व्ह बँक व जिल्हा प्रशासनाकडेही मालमत्ता जप्ती व परतफेडीसाठी पाठपुरावा केला जाईल.”

या घोटाळ्यात काही संचालकांना अटक झाली असली, तरी काहीजण अटकपूर्व जामीन मिळवून मोकळे फिरत आहेत. याबाबत नाराजी व्यक्त करत जगताप यांनी अटकपूर्व जामीन अर्ज रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.

बैठकीत ठेवीदारांनी एकमताने ठरवले की, न्याय मिळण्यास विलंब झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी अनिल जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

पार्वती मल्टीस्टेटमध्ये ठेव असलेल्या ९० टक्के ठेवीदारांचा शेतकऱ्यांमध्ये समावेश असून, त्यांच्या कष्टाच्या पैशांची झालेली फसवणूक लक्षात घेता परिसरात संताप व्यक्त होत आहे. आगामी काळात या प्रकरणात संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.


पालकमंत्री बदलण्याचं पत्र दिल्याचं सपशेल खोटं तर मित्रा सीईओंच्या दौऱ्याबाबत गुप्तता का?

धाराशिव (आकाश नरोटे)- १५ लाख वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि आ. राणाजगजितसिंह पाटील एकत्र एका व्यासपीठावर आले कार्यक्रम शांततेत पार देखील पडला मात्र पालकमंत्री बदला असे पत्र आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती त्याबद्दल थेट प्रश्न शेवटी पत्रकारांनी विचारलाच आणि त्यावर आ. पाटील यांनीच स्पष्ट केले की हे सपशेल खोटं आहे. मात्र पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या भाषणातील काही मुद्दे खटकण्यासारखे होते ते असे म्हणाले की मी धाराशिव मध्ये आलो की वृक्षारोपण केलेल्या ठिकाणाला आवर्जून भेट देणार, इथे भेट देऊन पुढे जाणार हे वाक्य साधे वाटत असले तरी मी पालकमंत्रिपद सोडणार नाही याबाबत त्यांनी ठाम भूमिका यातून मांडली असल्याचे स्पष्ट होते.
तत्पूर्वी गत शनिवारी मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांचा दौरा झाला त्यांना राज्यमंत्री दर्जा आहे, ते मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार असताना त्यांचा दौरा माध्यमांना कळू न देणे ही साधी गोष्ट नाही मात्र तुळजापूर मध्ये झालेल्या त्या बैठकीत ते अर्धा ते पाऊण तास होते त्यानंतर त्यांनी बैठक सोडली ती का सोडली याचे उत्तर बैठकीत बसलेल्या व्यक्तींनी आणि प्रशासनाने द्यायला हवे. तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या निमित्ताने ही बैठक होती त्यात तुळजाभवानी संस्थान च्या अंतर्गत सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याबाबत चर्चा झाली आराखड्यातून ते काम व्हावे यावर काही तरी बिनसल्याचे बोलले जात आहे. त्याच्या एक दोन दिवसांनंतर एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा  तुळजापूर दौरा झाला या दौऱ्याबाबत देखील गुप्तता पाळण्यात आली. पत्र दिल्याचं सपशेल खोटं असलं असे आ. राणाजगजितसिंह पाटील सांगत असले तरी गेल्या आठवड्याभरात झालेल्या घडामोडी सारं काही आलबेल असल्याचे दर्शवत नाहीत. जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटींच्या कामांना दिलेली स्थगिती अजूनही उठवण्यात आलेली नाही, राजकीय कुरघोड्या देखील थांबलेल्या नाहीत. पालकमंत्री बदला या पत्राबाबत चर्चा थांबली असली तरी तुळजापूर विकास आराखडा आणि त्या संदर्भात होत असलेल्या घडामोडी आणि शिवसेनेकडे असलेले पालकमंत्रिपद याचं थेट कनेक्शन असल्याने कुरघोड्या आणि राजकारण सुरूच राहील यात भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते कितपत लक्ष देतात यावरच सारे काही अवलंबून आहे.

परंडा नगरपरिषदेने ‘हरित धाराशिव अभियान’ यशस्वीपणे पार पाडले

वृक्ष लागवड मोहिमेत शहरातील १२ शाळांतील १,७६५ विद्यार्थी, १६३ शिक्षक व १६० महिलांचा सहभाग

पर

परंडा, १९ जुलै – महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “हरित धाराशिव अभियान” अंतर्गत परंडा नगरपरिषदेने ५१ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण केले. शहरातील विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये आणि नागरिकांच्या सहभागातून ही मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली.

या अभियानांतर्गत शुक्रवारी सकाळी सात वाजता जामगाव रोडवरील हजरत खाजा बद्रोद्दिन दर्गा परिसरात घनवन पद्धतीने वृक्ष लागवड सुरू झाली. मोहिमेत शहरातील १२ शाळांमधील १,७६५ विद्यार्थी, १६३ शिक्षक, तसेच १६० महिला बचत गट सदस्यांनी सहभाग नोंदवला.

या प्रसंगी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर, जिल्हा परिषद सभापती दत्ता साळुंके, तहसीलदार निलेश काकडे, गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत, नगरसेवक वाजिद दखनी, सर्फराज कुरेशी, रत्नकांत शिंदे, जावेद पठाण, संजय घाडगे यांच्यासह अनेक मान्यवर आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा नगरपरिषद, शैक्षणिक संस्था, महिला बचत गट, विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आणि नागरिकांनी एकत्रित येऊन ही भव्य वृक्ष लागवड मोहीम राबवली.

वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या हस्ते मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. अभियानाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिलेल्या सर्व सहभागींचे मुख्याधिकारी वडेपल्ली यांनी आभार मानले.

हरित धाराशिव अभियानात २९४ ठिकाणांपैकी २६२ ठिकाणांचे झाले माती परीक्षण, १० पैकी ६ नगरपालिकांचा माती परीक्षणाला ‘खो’

धाराशिव – जिल्हा प्रशासनाच्या ‘हरित धाराशिव’ या महत्वाकांक्षी अभियानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच, नगरपरिषद क्षेत्रांतील उदासीनतेमुळे संपूर्ण मोहिमेच्या यशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील २९४ प्रस्तावित वृक्षारोपण स्थळांपैकी केवळ २६२ ठिकाणांचेच माती परीक्षण पूर्ण झाले असून, उर्वरित ३२ ठिकाणांचे परीक्षण प्रलंबित आहे. विशेष म्हणजे यात धाराशिव, कळंब, मुरुम आणि वाशी या महत्त्वाच्या शहर वगळता इतरांनी माती परीक्षण केले नसल्याची माहिती आहे. शहरी भागांमध्ये शुद्ध प्राणवायूची गरज अधिक असूनही त्यांनीच या मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे.

या वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत, वन विभाग, सामाजिक वनीकरण, वन्यजीव विभाग, तहसील कार्यालय तुळजापूर आणि सीना-कोळेगाव धरण परिसरातील एकूण २९४ ठिकाणी घनदाट वृक्षारोपण केले जाणार आहे. १९ जुलै रोजी एकाच दिवशी हे वृक्षारोपण पार पडणार असून, त्यासाठीची पूर्वतयारी म्हणून माती परीक्षण अत्यंत महत्त्वाचे होते. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दोन महिन्यांपूर्वीच या अभियानासाठी विशेष पाठपुरावा सुरू केला होता. तसेच ३ ते ९ जुलैदरम्यान जिल्हा माती परीक्षण प्रयोगशाळेला सर्व ठिकाणांची माती तपासण्याचे निर्देशही देण्यात आले होते.

मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करत काही नगरपालिका क्षेत्रांनी माती परीक्षणास सहकार्यच केले नाही. परिणामी, वृक्ष लागवडीपूर्वीची एक अत्यावश्यक शास्त्रीय प्रक्रिया पूर्ण न झाल्याने त्यावरून संबंधित यंत्रणांची मानसिकता स्पष्ट होते. विशेषतः जिथे प्रदूषण अधिक आहे, अशा शहरी भागांतच माती परीक्षण केले गेले नाही, हे अधिक चिंताजनक आहे. ग्रामीण भागातील अनेक ग्रामपंचायतींनी मात्र योग्य प्रतिसाद देत ही प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे.

माती परीक्षणामध्ये सामू, क्षारता, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सेंद्रिय कार्बन या घटकांची चाचणी करण्यात आली. चाचणी झालेल्या २६२ ठिकाणी अहवाल सकारात्मक आल्याने वृक्ष लागवडीस पोषक वातावरण असल्याचे स्पष्ट झाले. मात्र उर्वरित ठिकाणांबाबत निश्चित निष्कर्ष नसल्यामुळे वृक्ष लागवडीचा यशस्वीपणा अनिश्‍चिततेत आहे.

दरम्यान, वृक्ष लागवडीनंतर त्यांचे संगोपन होणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचाही यावर ठाम भर असून, या विषयात कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही, असे प्रशासनाचे धोरण आहे. परंतु ज्या यंत्रणांनी माती परीक्षणासारख्या प्राथमिक टप्प्यालाच गांभीर्याने घेतले नाही, त्या संगोपनाचे कार्य किती मनापासून करतील, याबाबत शंका उपस्थित होत आहेत.

या विषयावर जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तथापि, संपूर्ण जिल्ह्याचा सहभाग आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून वृक्ष लागवड होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सुत्रांनी सांगितले. ‘हरित धाराशिव’ उपक्रमाची विश्वासार्हता आणि परिणामकारकता जपण्यासाठी या त्रुटी तातडीने दूर करणे काळाची गरज ठरत आहे.

तुळजापूरातील ब्रह्मदेव मूर्ती दुभंगल्याप्रकरणी संताप: हिंदुत्वनिष्ठ संघटनांची एकमुखी मागणी – दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा!

धाराशिव – श्रीक्षेत्र तुळजापूर येथे मंदिर विकास आराखड्याच्या नावाखाली प्राचीन ब्रह्मदेव मूर्तीच्या दुभंगण्याच्या घटनेने धार्मिक वातावरण ढवळून निघाले असून, समस्त हिंदुत्वनिष्ठ व धार्मिक संघटनांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक  सुनील घनवट यांच्या नेतृत्वाखाली आयोजित पत्रकार परिषदेत शासन व प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर सडकून टीका करण्यात आली.

प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात सध्या विकास आराखड्याचे काम सुरू आहे. मात्र या कामाच्या दरम्यान पुरातन उपदेवता असलेल्या श्री ब्रह्मदेव मूर्तीची निर्बंध न पाळता केलेली हालचाल आणि त्यामुळे ती मूर्ती दुभंगल्याचा प्रकार घडला आहे. मंदिर परिसरातील १३ उपदेवतांच्या मुर्त्या हलवण्यात आल्या आहेत.या निष्काळजीपणाच्या घटनेमुळे हिंदू धर्मीयांच्या धार्मिक भावना प्रखरपणे दुखावल्या आहेत. गेली अडीच महिने तक्रारी करूनही कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने विविध संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या पत्रकार परिषदेत महंत मावजीनाथ महाराज, इच्छागिरी महाराज, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे परमेश्वर कदम, माजी अध्यक्ष किशोर गंगणे, अधिवक्ता शिरीष कुलकर्णी,  परिक्षीत साळुंखे यांसह अनेक प्रतिष्ठित उपस्थित होते.

सुनील घनवट यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे:

  • ब्रह्मदेव मूर्ती आधीपासूनच दुभंगलेली होती हा दावा चुकीचा आहे; ती मूर्ती पूर्वी अखंड होती, याचे लेखी-छायाचित्रीय पुरावे आहेत.
  • मूर्ती हलवताना विधी न करता चुकीची पद्धत वापरली गेली. स्थानदेवतांच्या कुलाचाराआधी मूर्तींचा कुलाचार अपेक्षित होता.
  • मूर्ती दुभंगल्याची माहिती दडपण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे.
  • जिल्हाधिकारी मंदिर संस्थानचे अध्यक्ष असूनही त्यांनी निष्क्रियता दाखवली आहे.
  • मूर्तीची नोंद नसल्याचे तहसीलदारांचे विधान दिशाभूल करणारे आहे; त्यांना तिथे राहण्याचा अधिकार आहे का, असा सवाल उपस्थित केला.
  • विकास आराखड्यात कुलाचारासाठी जागा राखलेली नाही, स्थानिकांच्या सूचना दुर्लक्षित केल्या.

संत महंत व पुजाऱ्यांची प्रतिक्रिया:

महंत मावजीनाथ महाराज यांनी ब्रह्मदेव मूर्तीच्या बाहेर नेण्याच्या कृतीचा निषेध केला. अमरराजे कदम यांनी प्रशासनाने ब्रह्मदेव मूर्तीची नोंद न ठेवल्याची कबुली दिल्याचे सांगत, हे मूळ परंपरेवर आघात असल्याचे नमूद केले. किशोर गंगणे यांनी विकासकामांबाबत आक्षेप असूनही त्यांच्या सुनावण्या घेण्यात न आल्याचा आरोप केला.

मागण्या:

  • दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
  • जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी स्थानिक पुजारी मंडळ, धार्मिक संघटना व ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक तातडीने बोलवावी.
  • मंदिर विकास आराखड्यात पारदर्शकता ठेवावी; लेखी दस्तऐवज जनतेपुढे यावा.
  • धर्मशास्त्रज्ञ, धर्माचार्य व शंकराचार्य पिठांचे मार्गदर्शन घ्यावे.
  • पारंपरिक वंशपरंपरागत धार्मिक कृतींसाठी स्वतंत्र जागा राखून ती आराखड्यात स्पष्ट करावी.
  • मूळ मंदिर रचना कायम ठेवून कोणताही ऐतिहासिक, धार्मिक किंवा वास्तुविश्वास भंग होणार नाही, याची शासनाने हमी द्यावी.

या सर्व पार्श्वभूमीवर मंदिर महासंघ, श्री तुळजापूर संरक्षण कृती समिती, समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना व स्थानिक ग्रामस्थांतर्फे शासनाला अल्टीमेटम देण्यात आले असून, यापुढेही दुर्लक्ष झाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

दखलपात्र गुन्हा न दाखल केल्याने  माय-लेकराची टोकाची कृती; पोलिस ठाण्यातच घेतले विष

धाराशिव (प्रतिनिधी) – वडिलांना झालेल्या मारहाणीप्रकरणी दखलपात्र गुन्हा नोंदवण्याऐवजी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने संतप्त झालेल्या माय-लेकराने थेट  पोलिस ठाण्यातच विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. व्यंकटेश पडिले (वय २२) व त्यांची आई संगीता सतीश पडिले या दोघांना उपचारासाठी धाराशिव वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून संगीता पडिले यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

नरसिंह सतीश पडिले यांनी काही दिवसांपूर्वी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करताना, पैशाच्या कारणावरून त्यांच्या वडिलांवर एका व्यक्तीने मारहाण केल्याचा आरोप केला होता. मात्र, पोलिसांनी या प्रकरणात दखलपात्र गुन्हा दाखल न करता फक्त अदखलपात्र कलमान्वये गुन्हा नोंदवला. वारंवार विनंती करूनही पोलिसांनी दखलपात्र गुन्हा घेतला नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

या न्याय न मिळाल्याच्या निषेधार्थ व्यंकटेश व त्यांची आई संगीता यांनी आनंद नगर पोलिस ठाण्यातच विषारी पदार्थ प्राशन केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे  पोलिस ठाण्यात खळबळ उडाली. दोघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.


आषाढी एकादशीचा भक्तिभावाने उत्सव; गाढवे दांपत्याच्या हस्ते विठ्ठल रखुमाईची महापूजा

प्रतिनिधी, भूम

शहरातील कसबा विभागातील धाकटी वेस येथील तालमीतील विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीचा पवित्र सोहळा भक्तिमय वातावरणात अत्यंत उत्साहाने पार पडला. विठ्ठल भक्तांच्या निष्ठेचा आणि वारकरी परंपरेचा वारसा जपत, मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या निमित्ताने सकाळी कसबा विभागातून आकर्षक दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. टाळ-मृदुंगाच्या गजरात, “जय जय राम कृष्ण हरी” च्या नामस्मरणात, वारकरी पोशाखातील महिला भाविकांनी फुगडी आणि पारंपरिक पाऊड खेळत मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाल्याचे चित्र या वेळी दिसून आले.

दिंडी समाप्तीनंतर मंदिरात पारंपरिक पद्धतीने भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. टाळ, मृदुंग आणि अभंगांनी आसमंत दुमदुमून गेला. कार्यक्रमाच्या高潮वर, माजी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे आणि त्यांच्या पत्नी संयोगिता गाढवे यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईची महापूजा पार पडली. भक्तिभावाने ओथंबलेल्या या पूजेनंतर महाआरती करण्यात आली.

महाआरतीनंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या संपूर्ण धार्मिक सोहळ्याला परिसरातील पुरुष व महिला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तीचा अनुभव घेतला. मंदिर परिसर भक्तिरसाने भारावलेला असून, या उत्सवामुळे वारकरी परंपरेला नवचैतन्य प्राप्त झाल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक कार्यकर्ते, महिला मंडळ, आणि मंदिर समितीचे सदस्य यांनी परिश्रम घेतले.

सिरसाव ग्रामपंचायतीतील ७.५७ लाख रुपयांचा अपहार उघड | गटविकास अधिकाऱ्यांनी सहा जणांना नोटीस बजावली

परंडा, ६ जुलै : परंडा तालुक्यातील सिरसाव ग्रामपंचायतीमध्ये १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून मंजूर पाणी फिल्टर प्रकल्पातील काम न करता तब्बल ७ लाख ५७ हजार रुपयांचा अपहार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तत्कालीन गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांच्यासह सहाजणांवर कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर यांच्या या धडक निर्णयामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

ग्रामस्थ गजानन पाटील, श्रीराम बोबडे आणि उमेश जाधव यांनी हा प्रकार उजेडात आणत पंचायत समितीकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर विस्तार अधिकारी मार्फत चौकशी करण्यात आली. चौकशीत जिल्हा परिषद शाळेसाठी ३.२५ लाख आणि महालक्ष्मी मंदिर परिसरासाठी ४.३२ लाख रुपये निधी २०२२ मध्ये उचलण्यात आल्याचे निष्पन्न झाले. मात्र आजअखेर पाणी फिल्टर पूर्णतः बसवले गेले नसल्याचेही उघड झाले.

पाणी फिल्टरचे काम अपूर्ण असतानाही संबंधित अभियंत्याने चुकीचे मोजमाप करून बिल पास केल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय, ग्रामपंचायतीने ठेकेदाराला ताबा पत्र देवून शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

ग्रामसेवक, सरपंच, अभियंता, ठेकेदार आणि तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी संगनमत करून ही रक्कम उचलल्याचा ठपका ठेवण्यात आला असून खालील सहाजणांना अपहाराची रक्कम ७ दिवसात भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत :

  • संतोष नागटिळक (तत्कालीन गटविकास अधिकारी) – ₹1,44,071
  • पी.एम. जाधव (तत्कालीन ग्रामसेवक) – ₹1,44,071
  • यशवंत हजगुडे (अभियंता) – ₹1,08,398
  • संतोष लोकरे (ठेकेदार, सन फार्मा कंपनी) – ₹1,44,071
  • कुमार पांडुरंग वायकुळे (सरपंच) – ₹1,08,398
  • उल्हास देवकते (तत्कालीन ग्रामसेवक) – ₹1,08,398

गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर यांनी ४ जुलै रोजी ही नोटीस काढत संबंधितांना ७ दिवसांत रक्कम भरण्याचे निर्देश दिले असून न भरल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

या कारवाईमुळे परंडा तालुक्यातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सिरसाव ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे हा अपहार उघडकीस आला असून, इतर ग्रामपंचायतींमधील निधी दुरुपयोग प्रकरणांचीही चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

गंगाधर ही शक्तिमान है! पिडीत निघाला आरोपी

ऑनलाइन गेमिंगचे व्यसन; २५ लाखांच्या बनावट लुटीचा कट उघड

धाराशिव –
“गंगाधर ही शक्तिमान है!” हे वाक्य केवळ टीव्ही मालिकेतच नव्हे, तर खऱ्या आयुष्यातही लागू पडल्याचे उदाहरण समोर आले आहे. लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक नळदुर्ग शाखेचे मॅनेजर कैलास घाटे यांनी स्वतःच २५ लाख रुपयांची बनावट लूट घडवून आणल्याचे पोलिसांच्या कसोशीनं केलेल्या तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे, यामागे ऑनलाइन गेमिंगचे व्यसन आणि त्यामुळे झालेला आर्थिक डोंगर हे प्रमुख कारण ठरले.

घटना ३० जून रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास सोलापूर महामार्गावरील ईटकळ टोल नाक्याजवळ घडल्याचे सांगण्यात आले होते. कैलास घाटे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, दोन अज्ञात इसमांनी त्यांना अडवून मारहाण केली, डोळ्यात चंटणी टाकली आणि २५ लाखांची रोकड लुटली. त्यांच्या या जबाबामुळे खळबळ उडाली होती.

मात्र स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार आणि त्यांच्या पथकाने केलेल्या तांत्रिक आणि वैयक्तिक तपासातून वेगळेच चित्र समोर आले. सुरुवातीला “पिडीत” म्हणून वावरणाऱ्या घाटे यांची देहबोली, बोलण्यात आलेली विसंगती आणि त्यांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती घेतल्यानंतर पोलिसांना संशय गडद झाला.

तपासात समोर आले की, कैलास घाटे यांना ऑनलाईन गेम खेळण्याचे अतिव्यसन लागले होते. यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे गमावले होते. वाढत्या कर्जबाजारीपणातून सावरण्यासाठी त्यांनी चक्क बनावट लूट घडवून आणण्याचा कट आखला.

सखोल चौकशीदरम्यान पोलिसांनी जबाबदारीने विचारपूस केली असता त्यांनी अखेर सत्य उघड केले आणि लपवून ठेवलेले २५ लाख रुपयेही पोलीसांच्या ताब्यात दिले.

ही कारवाई यशस्वी करणारे अधिकारी व पथक:
पोलिस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली तीन स्वतंत्र पथकांनी हे गूढ उकलले. या पथकात पोलीस निरीक्षक सचिन यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सचिन खटके, जावेद काझी, अमोल मोरे, अशोक ढगारे, विजय घुगे, फरहान पठाण यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांचा समावेश होता.


एकीकडे बँक मॅनेजर पदावर काम करणारा अधिकारी, तर दुसरीकडे ऑनलाइन जुगाराच्या विळख्यात सापडलेला व्यसनी – ही दुहेरी भूमिका कैलास घाटे यांनी साकारली आणि “पिडीतच आरोपी” असल्याचा दुर्मिळ प्रकार समोर आला. पोलीस यंत्रणेच्या सखोल तपासामुळे हा बनाव उघड झाला, अन्यथा हा प्रकार अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून गेला असता.

निकृष्ट बियाणे, खते व कीटकनाशकांवरील तक्रारींवर तात्काळ कारवाईसाठी सरकारकडून तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना

शेतकऱ्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

पुणे – राज्य सरकारने शेतकऱ्यांना वेळेवर आणि दर्जेदार बियाणे, खते व कीटकनाशके उपलब्ध व्हावीत तसेच त्यांच्याशी संबंधित तक्रारींवर तात्काळ कारवाई व्हावी, यासाठी तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील महत्त्वपूर्ण आदेश नुकताच कृषी आयुक्तालय, पुणे यांनी निर्गमित केला आहे.

शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात दर्जेदार निविष्ठांची (input) भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मात्र अलीकडील काळात निकृष्ट दर्जाचे बियाणे, भेसळयुक्त खते व अप्रमाणित कीटकनाशके मिळाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्याने, शासनाने या तक्रारींच्या प्रभावी हाताळणीसाठी समित्यांचे पुनर्गठन केले आहे.

समितीचे नवीन स्वरूप पुढीलप्रमाणे:

  • अध्यक्ष – संबंधित उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी
  • सदस्य – संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी
  • सदस्य – कृषी विद्यापीठ/कृषी संशोधन केंद्र/कृषी विज्ञान केंद्र प्रतिनिधी
  • सदस्य – महाबीज (MAHABEEJ) प्रतिनिधी
  • सदस्य-सचिव – कृषी अधिकारी (गुण नियंत्रण), तालुका कृषी अधिकारी कार्यालय

समितीची कार्यपद्धती:

  • निविष्ठा विषयक तक्रार प्राप्त झाल्यावर ८ दिवसांच्या आत तपासणी करणे बंधनकारक आहे.
  • तक्रार संबंधित कंपनी व विक्रेत्यांना तपासणीस उपस्थित राहण्याचे आदेश दिले जातील.
  • तक्रारकर्त्या शेतकऱ्याची साक्ष घेणे बंधनकारक आणि निविष्ठा खरेदीच्या पावत्या तपासणे आवश्यक राहील.
  • विहित नमुन्यात पंचनामा करून त्याची प्रत शेतकरी व कंपनी प्रतिनिधीस देणे बंधनकारक आहे.
  • बियाण्याचा नमुना घेऊन तो अधिसूचित प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवावा.
  • यापूर्वीच्या जुन्या समितीकडे असलेल्या तक्रारी नव्या समितीकडे वर्ग केल्या जातील.

कायद्याच्या अधीन राहून कार्यवाही:

या कार्यवाहीसाठी पुढील कायदे व आदेशांचा आधार घेतला जाईल:

  • बियाणे अधिनियम 1966, बियाणे नियम 1968, बियाणे नियंत्रण आदेश 1983
  • खत (नियंत्रण) आदेश 1985
  • कीटकनाशके अधिनियम 1968, कीटकनाशके नियम 1971, कीटकनाशके आदेश 1986

कृषी आयुक्तालयाने या सर्व प्रक्रिया पारदर्शक व शेतकरी हिताच्या दृष्टीने पार पाडण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना व विहित प्रपत्र लवकरच निर्गमित करण्याचे संकेत दिले आहेत.

शेतकऱ्यांसाठी दिलासा

ही समिती व त्यामार्फत होणारी कारवाई ही शेतकऱ्यांच्या हितासाठी एक मोठे पाऊल मानले जात असून, निकृष्ट निविष्ठांमुळे होणारे नुकसान रोखण्यास तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यास यामुळे मदत होणार आहे.



शेतकऱ्यांनी अशा तक्रारींसाठी त्यांच्या तालुक्यातील कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि पावत्यांसह तक्रार सादर करावी.
शेतकऱ्यांनी बियाणे, खते व कीटकनाशके अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करून पावत्या सुरक्षित ठेवाव्यात.



शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी शासनाची ही पावले स्वागतार्ह असून, भविष्यात निकृष्ट व भेसळयुक्त निविष्ठांवर कारवाईसाठी यंत्रणा सक्षम होणार आहे. मात्र, समित्यांचे काम प्रभावी व वेळेत पार पाडले जावे, यासाठी प्रशासकीय पातळीवर देखरेख आणि उत्तरदायित्व ठरवणे गरजेचे आहे.