Home Blog Page 14

येडशीमध्ये हजरत जमादार बाबा रहे ऊरूसास उद्यापासून सुरुवात

येडशी (ता. धाराशिव) येथे हजरत जमादार बाबा रहे यांच्या ऊरूसाचा तीन दिवसीय भव्य सोहळा उद्या 11 ऑगस्टपासून सुरू होत आहे. 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवासाठी जिल्ह्यासह परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमानुसार, 11 ऑगस्ट रोजी संदल मिरवणूक, 12 ऑगस्ट रोजी ऊर्स शरीफ, तर 13 ऑगस्ट रोजी जियारत व महाप्रसाद होणार आहे. विशेष आकर्षण म्हणून 12 ऑगस्ट रोजी कव्वालीची मैफल रंगणार असून, पुण्यातील प्रख्यात कव्वाल परविन काचवाली आणि हैदर नाझाँ यांच्या जुगलबंदीचा मुकाबला भक्तांना मंत्रमुग्ध करणार आहे.

दर्गाह परिसरात भक्तीचा दरबार सजविण्यात येणार असून, सर्वांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ऊरूस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री सिद्धिविनायक परिवारातील दोन्ही कारखान्याचा रोलर पूजन सोहळा उत्साहात

शेतकरी हितासाठी 200 रुपयांचा अंतिम हप्ता देण्याची घोषणा

धाराशिव – तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी येथील श्री सिद्धिविनायक ॲग्रीटेक युनिट क्र. 1 आणि खामसवाडी येथील श्री सिद्धिविनायक ग्रीनटेक युनिट क्र. 2 या दोन्ही गुळ कारखान्यांच्या 2025-26 गळीत हंगामाचा प्रारंभ रविवारी (दि. 10) पारंपरिक रोलर पूजनाने झाला. संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते सहकुटुंब धार्मिक विधीपूर्वक पूजन करण्यात आले.

या प्रसंगी कारखाना परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, ग्रामस्थ तसेच श्री सिद्धिविनायक परिवारातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील चार-पाच वर्षांपासून ऊस गाळप व्यवसायात सातत्य राखत असलेल्या या दोन्ही युनिट्सबद्दल शेतकऱ्यांचा विश्वास दृढ झाला आहे. मागील हंगामात सुमारे 2.25 लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले होते. यंदा तीन लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, प्रतिदिन तीन हजार मेट्रिक टनांपेक्षा जास्त गाळप करण्याचे नियोजन असल्याची माहिती दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला प्राधान्य देत जलद पेमेंट पद्धत राबवली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. ऊस खरेदी झाल्यानंतर अवघ्या 15 ते 45 दिवसांत रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. तसेच, हंगाम 2024-25 मधील उर्वरित ऊस बिलाचा 200 रुपयांचा अंतिम हप्ता बैलपोळ्याच्या सणानिमित्त देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

या कार्यक्रमाला श्री. दिनेश कुलकर्णी, श्री. गणेश कामटे, श्री. बालाजी कोरे, श्री. राजकुमार जाधव, श्री. अरविंद गोरे, श्री. देविदास कुलकर्णी, श्री. गजानन पाटील, श्री. मंगेश कुलकर्णी, श्री. विकास उबाळे, श्री. अभय शिंदे, श्री. बालाजी जमाले, श्री. संजीव शिलवंत, श्री. मकरंद ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रतीक देवळे यांनी केले.

येडशी उड्डाणपुलाजवळ तरुणाला बेदम मारहाण, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धाराशिव, 10 ऑगस्ट 2025: धाराशिव तालुक्यातील येडशी गावाजवळ उड्डाणपुलावर 21 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास एका 23 वर्षीय तरुणाला पाच जणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घटनेचा तपशील:
फिर्यादी अविनाश हरीदास मोराळे (वय 23, रा. वडजी, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 21 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ते येडशी गावाजवळील उड्डाणपुलाजवळ असताना आरोपी विक्की चव्हाण, स्वप्नील पौळ, यश माने (सर्व रा. तेरखेडा, ता. वाशी), सूरज अवधूत (रा. अवधूत वाडी, ता. वाशी) आणि पांडू जाधवर (रा. रत्नापूर, ता. वाशी) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी अविनाश यांना शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि लोखंडी रॉडने त्यांना गंभीर जखमी केले. इतकेच नव्हे, तर आरोपींनी अविनाश यांना जिवे मारण्याची धमकीही दिली.

पोलीस कारवाई:
या घटनेनंतर अविनाश मोराळे यांनी 9 ऑगस्ट 2025 रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (भादंवि) कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3), 189(2), 191(2), 191(3) आणि 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये मारहाण, जिवे मारण्याची धमकी, गैरकायद्याची मंडळी जमवणे आणि इतर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. नागरिकांना अशा घटनांबाबत सतर्क राहण्याचे आणि काही संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या प्रकरणात पुढील तपासात काय उघडकीस येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धाराशिव जिल्ह्यात खुनाच्या दोन धक्कादायक घटना; ढोकी आणि उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

धाराशिव, दि. १० ऑगस्ट २०२५: धाराशिव जिल्ह्यात खुनाच्या दोन गंभीर घटनांनी खळबळ उडाली आहे. एक घटना ढोकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत, तर दुसरी उमरगा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

ढोकीत वडिलांचा खून: ढोकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत, पळसप येथे दि. ३१ जुलै २०२५ रोजी रात्री १०:४५ वाजता वैभव चंद्रकांत लाकाळ याने आपल्या वडिलांवर, चंद्रकांत मदन लाकाळ (वय ६५) यांच्यावर खोऱ्याच्या दांड्याने हल्ला करून त्यांचा खून केला. रामपाल महाराज यांची भक्ती न करण्याबाबत बोलण्याच्या किरकोळ कारणावरून हा हल्ला झाला. गंभीर जखमी झालेल्या चंद्रकांत यांचा मृत्यू झाला. मृताच्या मुलाने, प्रमोद चंद्रकांत लाकाळ (वय २९) यांनी दि. ९ ऑगस्ट २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलिसांनी भा.दं.वि. १०३(३) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरग्यात तरुणाची हत्या: उमरगा पोलिस ठाण्याच्या हद्दीत, दि. २४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७:०० ते दि. २५ जुलै २०२५ रोजी सकाळी ७:३० या कालावधीत, बायपास रोडलगत अंकुश शिंदे यांच्या शेताजवळ अभिषेक कालिदास शिंदे (वय २३, रा. मुन्शी प्लॉट, उमरगा) याचा खून झाला. आरोपी सरोज चिकुंद्रे, रेणु पवार आणि नीता जाधव (सर्व रा. उमरगा) यांनी संगनमताने हा खून केल्याचा आरोप आहे. अभिषेकचे वडील कालिदास संभाजी शिंदे (वय ५४) यांच्या फिर्यादीवरून उमरगा पोलिसांनी दि. ९ ऑगस्ट २०२५ रोजी भा.दं.वि. १०३(३) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांचा तपास सुरू: या दोन्ही घटनांमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू केला असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या खुनांच्या मागील नेमके कारण आणि परिस्थिती यांचा शोध घेण्यासाठी पोलिस सखोल तपास करत आहेत.

जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणांना प्राधान्य देत कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

धाराशिव शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र 52 वर भीषण अपघात एकाचा मृत्यू

धाराशिव (१० ऑगस्ट २०२५) : धाराशिव तालुक्यातील सारोळा बु येथील सिद्धार्थ भालचंद्र कठारे (वय अंदाजे २७) यांचा धाराशिव शहरालगत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर, सिद्धाई मंगल कार्यालयासमोर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. हा महामार्ग अत्यंत वर्दळीचा असून, सतत वाहतुकीचा मोठा दबाव असतो.

सिद्धार्थ हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) धाराशिव तालुका अध्यक्ष भालचंद्र कठारे यांचे पुत्र होते. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे १० वाजता दुचाकी (क्र. एमएच २५ ईएक्स ६७६९) वरून जात असताना ट्रक चालकाने दिलेल्या जोरदार धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित ट्रक चालक ट्रक घेऊन घटनास्थळावरून फरार झाला.

अपघातग्रस्त ठिकाणी अनेक दिवसांपासून सर्व्हिस रोडचे अर्धवट काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चढउतार व खड्डे निर्माण झाले आहेत. वाहनचालक हे टाळण्याच्या प्रयत्नात वाहनांवरील नियंत्रण गमावतात, तर सतत वाहने एकाच दिशेने वळवल्याने खड्ड्यांची स्थिती अधिकच गंभीर झाली आहे.

या दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी रस्त्यावरील धोकादायक परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून, अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकावर कठोर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.

नाशिकच्या इगतपुरीत बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेट उद्ध्वस्त; सीबीआयकडून 5 आरोपींना अटक

नाशिक, दि. 10 ऑगस्ट 2025: केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील रेनफॉरेस्ट रिसॉर्ट परिसरात चालवल्या जाणाऱ्या एका बेकायदेशीर कॉल सेंटरच्या रॅकेटवर मोठी कारवाई करत हे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. या सायबर फसवणुकीच्या प्रकरणात सीबीआयने 5 आरोपींना अटक केली असून, 44 लॅपटॉप, 71 मोबाईल फोन, 1.20 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड, 500 ग्रॅम सोने आणि 1 कोटी रुपये किमतीच्या 7 आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. या कारवाईने आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीच्या जाळ्याचा पर्दाफाश झाला आहे.

सायबर फसवणुकीचा कट उघड
सीबीआयने 8 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईतील 6 व्यक्ती आणि काही अज्ञात व्यक्ती तसेच बँक अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रथम माहिती अहवालानुसार, या रॅकेटमधील आरोपींनी परस्पर संगनमताने आणि काही अज्ञात व्यक्तींच्या साथीने बेकायदेशीर कॉल सेंटरच्या माध्यमातून सायबर फसवणुकीचा कट रचला. आरोपी स्वतःला अमेझॉन सपोर्ट सर्व्हिसेसचे प्रतिनिधी असल्याचे भासवून अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांतील नागरिकांशी फसव्या कॉल्सद्वारे संपर्क साधत होते. त्यानंतर गिफ्ट कार्ड्स आणि क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते.

कॉल सेंटरची रचना आणि कार्यपद्धती
इगतपुरीतील रेनफॉरेस्ट रिसॉर्ट परिसरात भाड्याच्या जागेत चालवल्या जाणाऱ्या या कॉल सेंटरमध्ये सुमारे 60 कर्मचारी कार्यरत होते. या कर्मचाऱ्यांना डायलर्स, व्हेरिफायर्स आणि क्लोजर्स अशा पदांवर नेमण्यात आले होते. हे कर्मचारी परदेशी नागरिकांना फसव्या कॉल्स करून त्यांच्याकडून बेकायदेशीरपणे पैसे गोळा करत होते. सीबीआयच्या छाप्यादरम्यान या ठिकाणी 62 कर्मचारी प्रत्यक्ष फसवणुकीच्या कामात गुंतलेले आढळले.

जप्ती आणि पुरावे
सीबीआयच्या कारवाईत 44 लॅपटॉप, 71 मोबाईल फोन आणि इतर महत्त्वाचे डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले. याशिवाय, 1.20 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड, 500 ग्रॅम सोने आणि 1 कोटी रुपये किमतीच्या 7 आलिशान गाड्या ताब्यात घेण्यात आल्या. तपासात अंदाजे 5000 USDT क्रिप्टोकरन्सी (अंदाजे 5 लाख रुपये) आणि 2000 कॅनेडियन डॉलरचे गिफ्ट व्हाउचर्स (अंदाजे 1.26 लाख रुपये) यांचे व्यवहार आढळून आले. हे सर्व पुरावे या रॅकेटच्या व्यापक स्वरूपाची साक्ष देतात.

आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीवर हल्ला
या बेकायदेशीर कॉल सेंटरमुळे परदेशी नागरिकांना लक्ष्य करून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली जात होती. सीबीआयच्या या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीच्या जाळ्याला मोठा हादरा बसला आहे. तपास यंत्रणांनी या प्रकरणातील 5 मुख्य आरोपींना अटक केली असून, इतर संशयित आणि बँक अधिकाऱ्यांचा शोध घेण्यासाठी तपास पुढे सुरू आहे.

पुढील तपास आणि अपेक्षा
सीबीआयच्या या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारीविरुद्धच्या लढ्याला बळ मिळाले आहे. तपास यंत्रणा आता या रॅकेटशी संबंधित इतर संशयितांचा शोध घेत आहे. यासोबतच, बँक अधिकाऱ्यांचा या प्रकरणातील सहभाग आणि क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांचा तपशील उघड करण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात येत आहे. ही कारवाई सायबर फसवणुकीविरुद्धच्या लढाईत एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

स्वातंत्र्यदिनी मांस विक्रीबंदीवर जितेंद्र आव्हाडांचा संताप; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान

कल्याण – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या स्वातंत्र्यदिनी मटण, कोंबडी व मोठ्या जनावरांच्या कत्तलखाने २४ तास बंद ठेवण्याच्या आदेशावर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय मनमानी असल्याचा आरोप करत उपमुख्यमंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिले.

आव्हाड म्हणाले,
“श्रावण महिना आहे म्हणून मांसाहार बंद करण्याचा आदेश जारी करणं ही जनतेच्या हक्कांवर गदा आहे. शासनाने असा कोणताही आदेश दिलेला नाही. मग केडीएमसीला हा निर्णय घेण्याचा अधिकार कुठून आला? हा तमाशा बंद केला पाहिजे. उपमहापौर, महापौर नाहीत, लोकप्रतिनिधी नाहीत, मग आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट सांगावं — हा निर्णय शासनाचा आहे का, की स्वतःचा?”

उपमुख्यमंत्री शिंदेंना आव्हान
आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट बोट दाखवत म्हटलं,
“आपण ठाण्याचे पालकमंत्री आहात. जर तुमची भूमिका नॉनव्हेज विरोधी असेल, तर ती स्पष्ट करा. मग सरळ जाहीर करा की कल्याण-डोंबिवलीत 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि दिवाळीला मांसाहार विक्री होणार नाही. माझं आव्हान आहे — हिम्मत असेल तर हा निर्णय अधिकृत करा.”

जातीय भेदभाव आणि धार्मिक दबावाचा आरोप
आव्हाड यांनी याला धार्मिक दबाव आणि जातीय भेदभावाचा प्रकार ठरवत म्हटलं की, “हे संघटनांचे टेस्टिंग आहे. आज एका शहरात बंदी आणली, लोकांनी विरोध केला तर थांबतील, नाहीतर पुढच्या वर्षी सगळीकडे बंदी येईल. हा सरळसरळ सनातनी मनुवाद आहे, जो बहुजन समाजाच्या हक्कांवर गदा आणतो.”

प्रशासनावर टीका, वैयक्तिक इशारा
आव्हाड यांनी ठणकावून सांगितले,
“मी 15 ऑगस्टला स्वतः एखाद्या घरात जाऊन मांसाहार करणार आहे. हिम्मत असेल तर मला तिथे येऊन अटक करून दाखवा.”
तसेच, त्यांनी आधी मिरा रोडप्रकरणी जशी उघडपणे भूमिका घेतली, तशीच आता घेण्याचा इशारा दिला.

केडीएमसीचा आदेश
केडीएमसीने गुरुवार रात्री 12 वाजल्यापासून शुक्रवार रात्री 12 वाजेपर्यंत 24 तासांसाठी मटण, कोंबडी व कत्तलखाने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील धाराशिव जिल्हा दौऱ्यावर

रखडलेल्या  २१ टी. एम. सी. च्या कामाची करणार पाहणी

धाराशिव – जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री मा.ना. डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील सोमवारी, ११ ऑगस्ट २०२५ रोजी सोलापूर व धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत.

दौऱ्याची सुरुवात सकाळी १० वाजता सोलापूर विमानतळावर आगमनाने होईल. त्यानंतर मंत्री विखे-पाटील सकाळी १०.३० वाजता उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी पंपगृहाची पाहणी करतील. हे पंपगृह कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना क्र. २ अंतर्गत टप्पा क्र. २ मध्ये आहे.

सकाळी १०.५० वाजता पडसाळी येथून ते तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथे प्रयाण करतील व ११.३० वाजता सिंदफळ पंपगृहाची पाहणी करतील. हे पंपगृहही कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना क्र. २ अंतर्गत टप्पा क्र. ५ मध्ये येते.

दुपारी १२.२० वाजता ते शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन करतील. त्यानंतर दुपारी १.४० वाजता करजखेडा, धाराशिव येथे प्रयाण होऊन दुपारी २ वाजता निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या विशेष दुरुस्ती कामाच्या शुभारंभास उपस्थित राहतील.

दौऱ्याची सांगता सायं. ५ वाजता सोलापूर विमानतळावर होईल.

पार्टी विथ डिफरन्स ते पार्टी विथ क्रिमिनल? जनतेच्या भावनांचा करेक्ट कार्यक्रम !

तुळजापुरातला सत्कार समारंभ भाजपची राजकीय अपरिहार्यता !!

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे तुळजापूर चे नाव जगभर आहे मात्र गेल्या फेब्रुवारीपासून ते बदनाम झाले ते ड्रग्स प्रकरणामुळे. फेब्रुवारी महिन्यात ड्रग्स च्या संदर्भातला पहिला गुन्हा दाखल झाला आणि त्याच्या मागोमाग त्यातील राजकीय कनेक्शन बाहेर आले मात्र हे राजकीय कनेक्शन अर्धवटच राहिले कारण सत्ताधारी भाजपच्या संबंधित विशेषतः आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या व्यक्तींचा त्यात असलेला समावेश. जिल्ह्यातील पोलिस सक्षम आहेत मात्र त्यांच्यावर दबाव कसा आहे याचे प्रत्यक्ष दर्शन घडले ते 1862 कोटींचा निधी आणल्याबद्दल आयोजित केलेल्या सत्कार समारंभात. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला मात्र त्यांनी या कार्यक्रमात ज्याची पाठ थोपटली ती व्यक्ती एम डी ड्रग्स प्रकरणात आरोपी आहे. जामिनावर ही व्यक्ती बाहेर असली तरी ड्रग्स चे सेवन केल्याचे त्यांच्याच बंधूंनी एका पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यामुळे त्याला क्लीन चिट मिळाली किंवा न्यायालयाने निर्दोष सोडलेले नसताना राजकीय कार्यक्रमात त्याची पाठ थोपटणे आणि तेही पोलिसांच्या समोर हा पोलिस तपासात दबाव आणण्याचा प्रकार नाही का? याबाबत विचारलेल्या प्रश्नाला महसूलमंत्री उत्तर देऊ शकले नाहीत मात्र त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आ. राणाजगजितसिंह पाटील यांनीच दिले आणि पोलिसांचे ॲफेडेविट उद्या देतो असे सांगितले दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत घेतली तीही थेट जिल्हाधिकारी कार्यालयात त्यात एक कागद मिळाला  तो पोलिसांचा जबाब होता मात्र त्यात पोलिसांनी विनोद गंगणे आरोपी नाही असे त्यात कुठेही म्हणले नव्हते त्यामुळे ड्रग्स प्रकरणात पोलिसांवर असलेला दबाव स्पष्ट होतो. भारतीय जनता पार्टी स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणून घेते मात्र ती आता पार्टी विथ क्रिमिनल झाली असून आरोपींना राजकीय मंचावर घेणं भाजपची राजकीय अपरिहार्यता झाली आहे. विधानसभेच्या अधिवेशनात या ड्रग्स प्रकरणाची चर्चा होण्या आधीच सरकारने बाजू मांडण्या आधीच पोलिसांचे उत्तर व्हायरल झाले होते त्यावरून पोलिसांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव दिसून आला होता. पुन्हा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यक्रमात आरोपींचा केवळ वावर नव्हता तर त्याचे नियोजनच त्यांनी केले असल्याने कालपर्यंत विरोध करणाऱ्या तुळजाईरवासीयांनी देखील हा कार्यक्रम निमूटपणे पाहिला आणि सहन केला. न्यायप्रविष्ट प्रकरणातील आरोपी ते ही गंभीर गुन्ह्यातील आरोपी राजकीय कार्यक्रमात निर्दोषता सिद्ध होण्याच्या आधीच सहभागी होत असतील तर न्यायाची, पारदर्शकेतची अपेक्षा कोणाकडून करायची?

ड्रग्स प्रकरण साधेसुधे नसून त्यात अनेक तरुण त्यांचे कुटुंब, सामाजिक स्वास्थ्य याचा संबंध आहे. तुळजापूरला आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ बनवण्याची ग्वाही देणारे नेते अमित शहा आणि त्याच पवित्र मातीत गुन्हेगारांना राजाश्रय मिळत असेल तर केवळ तुळजापूर नव्हे तर संबंध जिल्हा सामाजिक स्वास्थ्य बिघडवून बसेल.

तसेच तुळजापूर ड्रग्स प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) आमदार कैलास पाटील यांनी फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत राज्य सरकार, मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे.

पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये महायुती सरकारवर पोकळ आश्वासने देऊन सत्तेत आल्याचा आरोप करत, “शेतकरी आणि बेरोजगार तरुणांना देशोधडीला लावण्याचा जणू आराखडाच तयार होता” असे म्हटले आहे. त्यांनी तुळजापूरातील ड्रग्स प्रकरणाचा उल्लेख करत, “आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत ड्रग्स कोणी आणले, गुन्हेगारी कोणी वाढवली, हे सांगण्याची गरज नाही. मात्र, हे सरकार अशा प्रवृत्तींना बळ देत आहे,” असा आरोप केला.

महसूल मंत्री बावनकुळे यांचा ड्रग्स प्रकरणातील प्रमुख आरोपीकडून सत्कार स्वीकारणे आणि त्याच्या पाठीवर थाप देणे हा प्रकार जनतेसमोर संशय निर्माण करणारा असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच, अर्थसंकल्पीय अधिवेशनात ड्रग्स माफियांविरोधातील कार्यवाहीबाबत विचारलेल्या लक्षवेधीच्या उत्तराचे व्हॉट्सअॅप ग्रुपवर लीक झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

“सभागृहात कारवाईचे आश्वासन देणारे मंत्री प्रत्यक्षात ड्रग्सच्या पाळेमुळे रुजवणाऱ्यांना प्रोत्साहन देत आहेत, हेच का पारदर्शी, गतिमान सुशासन?” असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. तसेच, “पाशवी बहुमताच्या जोरावर आम्ही ठरवू ते धोरण हे महाराष्ट्रात चालणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

बायोफ्युएल : भारतातील ऊर्जा क्रांतीचा नवा मार्ग

(Biofuel: The New Path of Energy Revolution in India)


जगातील वाढते प्रदूषण (Pollution), हवामान बदल (Climate Change) आणि खनिज इंधनाचा (Fossil Fuel) संपणारा साठा यामुळे Renewable Energy स्रोतांची गरज वाढली आहे. अशा वेळी Biofuel हा पर्यावरणपूरक आणि नूतनीकरणक्षम (Renewable) इंधनाचा पर्याय म्हणून वेगाने लोकप्रिय होत आहे.
दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी साजरा होणारा International Biofuel Day हा या संकल्पनेच्या प्रचारासाठी महत्त्वाचा दिवस आहे.


इतिहास (History of International Biofuel Day)

  • 10 ऑगस्ट 1893 रोजी Rudolf Diesel यांनी पहिल्यांदा Peanut Oil वर चालणारे डिझेल इंजिन यशस्वीपणे चालवले.
  • या प्रयोगाने दाखवून दिले की वनस्पती तेलासारखे Biofuel हे पेट्रोल-डिझेलला पर्याय ठरू शकते.
  • या घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.

बायोफ्युएल म्हणजे काय? (What is Biofuel?)

Biofuel म्हणजे जैविक स्रोतांपासून (वनस्पती, प्राणी, सेंद्रिय कचरा) तयार होणारे नूतनीकरणक्षम इंधन.
हे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी यांना पर्यावरणपूरक पर्याय आहे.


प्रकार (Types of Biofuel)

  1. Bioethanol – ऊस, मका, गहू यापासून तयार; पेट्रोलमध्ये मिसळले जाते.
  2. Biodiesel – वनस्पती तेल, वापरलेले खाद्यतेल, प्राणी चरबीपासून; डिझेल इंजिनमध्ये वापरता येते.
  3. Biogas – शेण, अन्नकचरा, सेंद्रिय कचऱ्यापासून; स्वयंपाक, वीज, वाहनांसाठी.
  4. Advanced Biofuel – शैवाल, औद्योगिक सांडपाणी, कृषी अवशेष यापासून; उच्च कार्यक्षमतेचे.

बायोफ्युएलचे फायदे (Benefits of Biofuel)

  • Environment Friendly – कार्बन उत्सर्जन कमी.
  • Renewable Source – सतत पुनर्निर्मित होणारे इंधन.
  • Economic Savings – इंधन आयात कमी करून परकीय चलन बचत.
  • Rural Employment – शेती, प्रक्रिया, वाहतूक क्षेत्रात रोजगार.
  • Waste Management – सेंद्रिय कचऱ्याचा ऊर्जा उत्पादनासाठी वापर.

भारतामधील बायोफ्युएल धोरणे (Biofuel Policy in India)

  • National Biofuel Policy 2018 – 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 20% Ethanol Blending.
  • Ethanol Blending Program (EBP) – ऊस, मका, धान्य यापासून इथेनॉल उत्पादन.
  • SATAT Scheme – देशभर CBG (Compressed Biogas) प्लांट्स उभारणी.
  • Energy Independence 2047 Vision – PM मोदींची ऊर्जा स्वावलंबन योजना.

बायोफ्युएल क्रांती का घडवू शकते? (Why Biofuel Can Trigger an Energy Revolution)

  1. Energy Independence – खनिज तेल आयात कमी होईल.
  2. Farmers’ Income Boost – पिकांना नवीन बाजार.
  3. Cleaner Environment – प्रदूषण कमी.
  4. Waste to Energy – कचऱ्याचा इंधनासाठी वापर.
  5. Industrial Growth – नवीन प्रकल्प व रोजगार.

आव्हाने (Challenges)

  • उत्पादन खर्च जास्त.
  • आधुनिक तंत्रज्ञान व Infrastructure कमी.
  • अन्न व इंधन पिकांमध्ये स्पर्धा.
  • धोरणांची सातत्यपूर्ण अंमलबजावणी आवश्यक.

योग्य गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि शाश्वत पद्धतींसह Biofuel in India एक हरित-ऊर्जा क्रांती घडवू शकते. यामुळे Renewable Energy Sector मजबूत होईल, ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल आणि भारत ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने पुढे जाईल.