धाराशिव जिल्ह्यात समाजकल्याण विभागातील लाचमागणी प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या यशस्वी कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील पीडितास देण्यात येणाऱ्या अर्थसाह्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी समाजकल्याण कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणातील तक्रारदार हे ४७ वर्षीय पुरुष असून, त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील अर्थसाह्याचा दुसरा हप्ता बँक खात्यात जमा करून देण्यासाठी समाजकल्याण निरीक्षक कपिल थोरात यांनी २० हजार रुपये, तर सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातील कनिष्ठ लिपिक रमेश मालू वाघमारे यांनी पाच हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता.
या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४, ७ आणि ११ डिसेंबर २०२५ रोजी पडताळणी केली. या दरम्यान समाजकल्याण निरीक्षक कपिल थोरात यांनी पंचांसमक्ष लाच मागितल्याचे निष्पन्न झाले नाही. मात्र, कनिष्ठ लिपिक रमेश वाघमारे यांनी ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील अर्थसाह्याचा दुसरा हप्ता मंजूर करून देण्यासाठी पंचांसमक्ष पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.
तक्रारीची सत्यता निष्पन्न झाल्यानंतर ११ आणि १२ डिसेंबर २०२५ रोजी पंचांसमक्ष सापळा कारवाई राबविण्यात आली. मात्र, आरोपीस संशय आल्याने त्याने तक्रारदाराकडून पैसे स्वीकारण्यास नकार दिला आणि भेट घेणे टाळले. त्यानंतर आज आरोपी रमेश मालू वाघमारे यास ताब्यात घेण्यात आले. ही संपूर्ण कारवाई समाजकल्याण कार्यालय, धाराशिव येथे पार पडली.
आरोपीच्या अंगझडतीदरम्यान अंदाजे ४० हजार रुपये किमतीची होंडा अॅक्टिवा दुचाकी, सुमारे १० हजार रुपये किमतीचा वनप्लस कंपनीचा मोबाईल हँडसेट तसेच दोन पेन मिळून आले. मोबाईल हँडसेटची तपासणी सुरू असून, आवश्यकतेनुसार तो जप्त करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. आरोपीच्या घरझडतीची प्रक्रिया देखील सुरू आहे.
या कारवाईचे फिर्यादी सरकारतर्फे पोलीस निरीक्षक बाळासाहेब मनोहर नरवटे असून, सापळा अधिकारी म्हणून त्यांनी ही कारवाई पार पाडली. या संपूर्ण प्रकरणावर पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे यांचे पर्यवेक्षण होते. सापळा पथकात पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्यासह विजय वगरे, पोलीस हवालदार आशिष पाटील, पोलीस अंमलदार विशाल डोके, जाकेर काझी आणि शशिकांत हजारें यांचा समावेश होता. या कारवाईस पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे तसेच अपर पोलीस अधीक्षक शशिकांत शिंगारे यांचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाच मागितल्यास तात्काळ तक्रार करावी. भ्रष्टाचारासंबंधी तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १०६४ तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
