कामांना स्थगिती मिळाली, यात विरोधकांना ‘आसुरी आनंद’ – भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल काकडे

0
133

रस्ते विकासासाठी मंजूर १४० कोटींच्या निधीवरून धाराशिव राजकारण तापले

धाराशिव :
धाराशिव शहरातील रस्त्यांच्या विकासासाठी मंजूर झालेल्या १४० कोटी रुपयांच्या कामांना तात्पुरती स्थगिती मिळाल्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल  काकडे यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले की, “शहराच्या विकासाच्या कामांना स्थगिती मिळाल्यानंतर काही मंडळींनी जणू आसुरी आनंद व्यक्त केला आहे. शहराच्या प्रगतीपेक्षा राजकारण त्यांना अधिक प्रिय वाटते,” असे काकडे म्हणाले.

महायुती सरकारच्या काळात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून  तुळजापूर, नळदुर्ग आणि कळंब या भागांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला धाराशिव साठी  तब्बल १४० कोटी रुपयांचा रस्ते विकास निधी मंजूर झाला होता. काही दिवसांपूर्वी या कामाचा कार्यारंभ आदेश निर्गमित झाल्याची घोषणा राणादादांनी पत्रकार परिषदेत केली होती. शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे त्रस्त नागरिकांमध्ये या निर्णयामुळे आशेचा किरण निर्माण झाला होता.

मात्र, त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या कामावर SIT चौकशीची मागणी केली आणि लगेचच कामांना स्थगिती मिळाल्याची बातमी समोर आली. या निर्णयानंतर शहरातील विरोधी गटांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत बातम्या शेअर केल्या, यावर युवा मोर्चाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

काकडे म्हणाले, “धाराशिवच्या विकासासाठी मंजूर झालेल्या निधीवर काही जण राजकारण करत आहेत. शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी हे लोक विकासाला अडथळा ठरत आहेत. पण आमदार राणादादा सर्व अडचणींवर मात करून हे काम निश्चित पूर्ण करतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here