धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलन तीव्र: सकल मराठा समाजाची लवकरच जिल्हा बंदची हाक, मुंबईला जाणारा दूध-भाजीपाला बंद करण्याचा इशारा

0
126

धाराशिव, दि. २ सप्टेंबर २०२५ (दैनिक जनमत प्रतिनिधी): मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण पाचव्या दिवशीही सुरू असून, त्यांच्या मागण्या तातडीने मंजूर न झाल्यास धाराशिव जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. यात जिल्हा बंदची हाक, आंदोलनकाळात कोणत्याही राजकीय पक्षाच्या सभांना परवानगी न देणे, मुंबईला जाणारे दूध आणि भाजीपाला बंद करण्याचा इशारा तसेच भगव्या गमजाच्या मुद्द्यावरून सरकार आणि पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सकल मराठा समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून हे मुद्दे मांडले असून, दैनिक जनमतशी बोलताना समाजाच्या एका प्रतिनिधीने या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली.

सकल मराठा समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेऊन मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीने सादर केलेल्या ५८ लाख कुणबी नोंदीनुसार ओबीसी आरक्षण तातडीने लागू करावे. हैदराबाद, सातारा आणि मुंबई गॅझेटमधील नोंदींच्या आधारे कुणबी-मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. तसेच, मुंबईतील आंदोलनादरम्यान धाराशिव जिल्ह्यात कोणत्याही राजकीय पक्षाने कार्यक्रम घेऊ नये, अन्यथा समाज त्याला विरोध करेल. निवेदनात आझाद मैदानाकडे जाणारे रस्ते मोकळे करावे, आंदोलकांना अन्न-पाण्याची व्यवस्था करावी आणि स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. उपोषण सोडवले नाही तर जिल्ह्यात कठोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

दैनिक जनमतशी बोलताना सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधीने सांगितले की, “मनोज दादांचे उपोषण पाचव्या दिवशी आहे आणि कालपासून त्यांनी पाणीही सोडले आहे. सरकारने मागण्या तातडीने मंजूर कराव्यात. आझाद मैदानाकडे जाणाऱ्या गाड्यांना अडवू नये. आम्ही नियमांचे पालन करत आहोत, पण सरकार किंवा त्यांचे लोक गाड्या आडवून कोंडी करत आहेत.” त्यांनी भगव्या गमजाच्या मुद्द्यावरून तीव्र शब्दांत टीका केली. “महाराष्ट्रात भगवा गमजा घालायचा नाही तर काय घालायचे? यूपी-बिहारसारखा नवीन प्रकार आणायचा का? हा आमचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. आम्हाला सांगितले आहे की, भगवा गमजा घातलेल्यांना उचलले जाईल. पण काही ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आणि पोलिस सिव्हिल ड्रेसमध्ये भगवा गमजा घालून आंदोलनात मिसळून दिशाभूल करत आहेत. हे फडणवीस सरकार आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी चालवलेले बदनामीचे षडयंत्र आहे.”

प्रतिनिधीने पुढे सांगितले की, मागण्या मंजूर न झाल्यास धाराशिव जिल्ह्यात शैक्षणिक संस्था बंद करण्यात येतील आणि जिल्हा बंदची हाक देण्यात येईल. “आम्ही प्रशासनाला याबाबत निवेदन दिले आहे. येणाऱ्या दोन दिवसांत मुंबईला जाणारे दूध आणि भाजीपाला बंद करण्याचा प्रयत्न करू. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटत नाही, तोपर्यंत जिल्ह्यात एकाही राजकीय पक्षाचा कार्यक्रम होऊ देणार नाही. तो उधळून लावू.” तसेच, मुंबईतील आंदोलकांवर होणाऱ्या अन्यायावरून काही माध्यमांना दोष देत त्यांनी मनोज दादांच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले.

या आंदोलनामुळे धाराशिव जिल्ह्यात  वातावरण तापले असून, सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे. सकल मराठा समाजाने स्पष्ट केले आहे की, मनोज जरांगे यांच्या तब्येतीला काही झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन उभारले जाईल आणि त्याला सरकार जबाबदार असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here