सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांमधून माल लुटणाऱ्या दोन सराईत आरोपींना धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करत मोठी कामगिरी केली आहे. या कारवाईत तब्बल ८ लाख २८ हजार ६५९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी ट्रक चालक रामजी शोभनाथ यादव हे सोलापूर–धुळे महामार्गावरून कंटेनरमधून नवीन टायर वाहतूक करत असताना तेरखेडा परिसरातील लक्ष्मी पारधी पिढी जवळ त्यांच्या कंटेनरमधील टायरची चोरी करण्यात आली होती. या घटनेमुळे महामार्गावरील मालवाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव, श्री. विनोद इज्जपवार यांनी पथकाला तपासाच्या सूचना दिल्या.
त्या अनुषंगाने दि. २१ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना गुप्त माहिती मिळाली की अनिल मच्छींद्र पवार (रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) याने त्याच्या साथीदारांसह हायवेवरील कंटेनरमधून नवीन टायरची चोरी केली असून, ते टायर तसेच चोरीच्या मोटारसायकली लक्ष्मी पारधी पिढीच्या पाठीमागील जंगल परिसरात लपवून ठेवण्यात आल्या आहेत. तसेच आरोपी तेरखेडा गावात येणार असून त्याच्याकडील मोटारसायकलही चोरीची असल्याची माहिती मिळाली.
पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवली असता संशयित इसम पथकास पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या इसमालाही अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी आपली नावे अनिल मच्छींद्र पवार (वय ३४, रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) आणि नाना तानाजी शिंदे (वय २७, रा. भिकारसारोळा, ता. जि. धाराशिव) अशी सांगितली.
प्राथमिक चौकशीत आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी इतर दोन साथीदारांसह मिळून हायवेवरून जाणाऱ्या कंटेनरमधून नवीन टायरची चोरी केल्याची तसेच पानगाव परिसरात चोरी केल्याची कबुली दिली. याशिवाय वाशी, बेंबळी, येरमाळा आणि भादा पोलीस ठाणे हद्दीतून मोटारसायकली चोरून त्या लक्ष्मी पारधी पिढीच्या पाठीमागील जंगल परिसरात लपवून ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
त्यावरून पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन झडती घेतली असता २९ नवीन टायर, ४ चोरीच्या मोटारसायकली, गुन्ह्यातील रोख रक्कम तसेच गुन्हा करताना वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण ८,२८,६५९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक श्री. सचिन खटक, पोलीस हवालदार नितीन जाधवर, बबन जाधवर, चापो. महबुब अरब आणि रोहित दंडनाईक यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे महामार्गावरील चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
