बोगस एक्झिट पोल प्रकरणात कायद्याचे उल्लंघन, एस.डी.एम.चे आदेश; तरीही गुन्हा दाखल नाही

0
262

धाराशिव :
नगरपालिका निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे उघड उल्लंघन होऊनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या बनावट एक्झिट पोलच्या प्रकरणात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांनी ९ डिसेंबर रोजी जारी केलेल्या आदेशात लोकप्रतिनिधित्व कायद्याचे स्पष्ट उल्लंघन झाल्याचे नमूद करून तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते.

देशमुख यांनी या प्रकरणातील पुढील कार्यवाहीसाठी उपमुख्याधिकारी विश्वंभर सोनखेडकर यांना प्राधिकृत केले असून “गुन्हा दाखल करण्यास कोणताही विलंब होणार नाही, याची गांभीर्यपूर्वक दक्षता घ्यावी” असा विशेष उल्लेख आदेशपत्रात करण्यात आला आहे.

तथापि, आदेश जारी होऊनही पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, ही बाब लक्षवेधी ठरत आहे. सोशल मीडियावर एका बनावट टीव्ही चॅनलचा आधार घेत नगरपालिकेतील एका उमेदवाराला विजयी ठरविणारा कथित एक्झिट पोल प्रदर्शित करण्यात आला होता. मतदानापूर्वी अशा प्रकारचा साहित्य प्रसारित करणे हे लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 च्या कलम 126(1)(ख) तसेच निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे गंभीर उल्लंघन मानले जाते.

कायद्याचे उल्लंघन स्पष्ट असताना आणि एस.डी.एम.चे निर्देशही जारी झाल्यानंतरही गुन्हा का नोंदवला गेला नाही, याबाबत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणातील विलंब नेमका कोणासाठी आणि कशासाठी, याबाबत स्थानिक पातळीवर चर्चांना ऊत आला आहे.

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार अशा प्रकारच्या उल्लंघनांवर तात्काळ गुन्हा नोंदवणे बंधनकारक असताना, धाराशिवमधील प्रशासकीय यंत्रणा मात्र अद्याप शांत असल्याचे चित्र कायम आहे.

राकेश सूर्यवंशी यांची तक्रार

या प्रकरणी  राकेश सूर्यवंशी यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे स्वतंत्र तक्रार दाखल केली होती. सोशल मीडियावर बनावट एक्झिट पोल प्रसारित करून मतदारांची दिशाभूल केली जात असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत स्पष्ट नमूद केले आहे. मतदानापूर्वी अशाप्रकारे उमेदवारांच्या विजय-पराजयाचे चित्र उभे करणे हे निवडणूक आयोगाच्या नियमांचे गंभीर उल्लंघन असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. सूर्यवंशी यांच्या या औपचारिक तक्रारीनंतरच निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांनी संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जारी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here