पायाभोवती आणि जोत्यामध्ये मोठमोठ्या दगडांचा भराव; निविदेतील तांत्रिक निकषांच्या पालनावर प्रश्नचिन्ह
धाराशिव : जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या या रुग्णालयाच्या इमारतीच्या पायाभोवती आणि जोत्यामध्ये भरावासाठी मोठमोठ्या दगडांचा वापर करण्यात आल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, निविदेमध्ये भरावासाठी वापरण्यात येणारे साहित्य, त्याची गुणवत्ता आणि कार्यपद्धती यासंदर्भात स्पष्ट तांत्रिक निकष निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्ष बांधकामात या निकषांचे कितपत पालन केले जात आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
धाराशिव येथील ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय व कर्मचारी निवासस्थानांच्या बांधकामासाठी ३६१.५० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामाची स्वीकृत निविदा रक्कम २७६.२६ कोटी रुपये असून, कामाचा कालावधी ३० महिने निश्चित करण्यात आला आहे.
उत्खननातून निघालेल्या मोठ्या दगडांचा पुनर्भरावासाठी वापर करायचा असल्यास ते १५० मिलिमीटर अर्थात १५ सेंटीमीटरपेक्षा मोठे नसावेत. तसेच दगडांमधील पोकळ्या योग्य दर्जाच्या बारीक मुरमाने किंवा मातीने भरणे आवश्यक आहे.
प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणी मात्र पायाभोवती आणि जोत्यामध्ये मोठ्या आकाराचे ओबडधोबड दगड दिसून येत असून, त्यांच्यामध्ये पोकळ्याही दिसत आहेत. त्यामुळे भरावासाठी निर्धारित केलेल्या निकषांचे पालन झाले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रत्येक थराची गुणवत्ता चाचणी बंधनकारक
निविदेतील अटीनुसार इमारतीच्या पायाभोवती भराव करताना प्रत्येक थराची जाडी १५ सेंटीमीटरपेक्षा, तर जोत्यामध्ये भराव करताना २० सेंटीमीटरपेक्षा अधिक नसावी. प्रत्येक थरावर आवश्यक प्रमाणात पाणी मारून यंत्राद्वारे दबाई करणे बंधनकारक आहे. मुरूम भरावासाठी किमान आठ टन वजनाच्या दाबयंत्राचा वापर करून किमान पाच फेऱ्या मारण्याची तरतूद आहे. प्रत्येक थराची किमान ९५ टक्के सघनता सुनिश्चित केल्यानंतरच पुढील थर टाकणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मोठमोठ्या दगडांचा वापर करून निर्धारित जाडीचे थर कसे तयार करण्यात आले आणि अपेक्षित सघनता कशी प्राप्त करण्यात आली, याची तपासणी होणे आवश्यक आहे.
भरावासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा प्रकार आणि स्रोत यांना प्रयोगशाळेतील चाचणी अहवालांच्या आधारे त्रयस्थ गुणवत्ता तपासणी तज्ज्ञ आणि सल्लागारांची काम सुरू करण्यापूर्वी लेखी मान्यता घेणेही बंधनकारक आहे. नामंजूर साहित्य कंत्राटदाराने स्वखर्चाने हटविण्याची तरतूद निविदेत आहे. तसेच सर्व गुणवत्ता चाचण्यांचा खर्च कंत्राटदारानेच करायचा आहे.
गुणवत्तेची खातरजमा केली कोणी?
भराव योग्य पद्धतीने केला नसल्यास भविष्यात फरशी खचणे, भिंतींना तडे जाणे, अंतर्गत जलवाहिन्यांचे नुकसान होणे यांसारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे भरावाचे काम झाकले जाण्यापूर्वी त्याची गुणवत्ता तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या भरावाच्या साहित्याला लेखी मान्यता देण्यात आली आहे का? प्रत्येक थराची सघनता चाचणी करण्यात आली आहे का? संबंधित अभियंत्यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली आहे का? त्रयस्थ गुणवत्ता तपासणी संस्थेचे अहवाल काय सांगतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे बांधकाम विभागाने देणे आवश्यक आहे.
लाखो नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या बांधकामात गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड परवडणारी नाही. इमारतीच्या पायाभोवती आणि जोत्यामधील भरावाच्या गुणवत्तेवरच प्रश्न उपस्थित होत असतील, तर उर्वरित बांधकामाच्या गुणवत्तेची खात्री नागरिकांना कशी मिळणार? त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बांधकामाची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करून गुणवत्ता चाचण्यांचे अहवाल सार्वजनिक करणे गरजेचे आहे.
दोन दिवस प्रयत्न करूनही कार्यकारी अभियंत्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही
जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या बांधकामाच्या गुणवत्तेसंदर्भात विभागाची अधिकृत बाजू जाणून घेण्यासाठी कार्यकारी अभियंता सागर मस्के यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची भेट झाली नाही. भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता ते कामानिमित्त बाहेर असल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशीही ते कार्यालयात आले नसल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
- जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामात गुणवत्तेला तिलांजली?
- ‘तुतारी और कमल एकीच है’; याची नांदी धाराशिवमधून! नगरपालिका निवडणूक ते डिलिमिटेशन (सीमांकन) विधेयकाचे राजकारण!
- उपनगराध्यक्षपदासाठी ३ डिसेंबरला निवडणूक; ‘कमल और तुतारी एकीच है’ की भाजपचाच होणार उपनगराध्यक्ष?
- धाराशिव शहरात पुन्हा चोरट्यांचा वावर? पोलिसांची गस्त वाढवण्याची नागरिकांची मागणी
- धाराशिव पोलिस दलात ‘फोन पे’वरून लाखोंची हप्तेवसुली?
