26 November 2026, Thursdayदैनिक जनमत | निर्भीड पत्रकारिता
दैनिक जनमत
जाहिरातीसाठी जागा • 728 × 90
जिल्हा बातम्याई-पेपरधाराशिवसोलापूरसातारासांगलीपुणेकोल्हापूर
धाराशिव

वृक्षतोडीप्रकरणी युवासेना आक्रमक; प्राचार्यांनी दिले सहा फूट उंचीची १०० झाडे लावण्याचे हमीपत्र

युवासेना जिल्हा समन्वयक ॲड. संजय भोरे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर महाविद्यालय प्रशासनाची लेखी हमी

धाराशिव : पर्यावरण संवर्धनाचे धडे देणाऱ्या शहरातील नामांकित रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या आवारात पंचवीस वर्षांपूर्वी लावलेल्या झाडांची तोड करण्यात आल्याप्रकरणी आज युवासेना जिल्हा समन्वयक ॲड.संजय भोरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला.त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य अंबादास मंजुळकर यांची भेट घेत वृक्षतोडीचा मुद्दा उपस्थित केला.यानंतर युवासेनेचे मागणीनंतर प्राचार्यांनी १०० झाडे लावण्याचे लेखी हमीपत्र दिले.

रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या आवारात सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी तत्कालीन विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांची तोड करण्यात आली होती.काही कामानिमित्त महाविद्यालयात आलेल्या माजी विद्यार्थ्यांना ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तीव्र खंत व्यक्त केली होती. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी स्वतः लावलेल्या आणि खांद्यावर घागरी घेऊन पाणी देऊन वाढविलेल्या झाडांची तोड झाल्याचे पाहून महाविद्यालयाने झाडांसोबतच माजी विद्यार्थ्यांच्या भावनांचीही कत्तल केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. 

या प्रकरणाची दखल घेत युवासेना जिल्हा समन्वयक ॲड. संजय भोरे यांनी आज आक्रमक भूमिका घेतली.त्यांनी महाविद्यालयात जाऊन प्राचार्य अंबादास मंजुळकर यांची भेट घेतली. पर्यावरण संवर्धनाचे धडे देणाऱ्या महाविद्यालयाच्या आवारातच झालेल्या वृक्षतोडीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.यानंतर प्राचार्यांनी सहा फूट उंचीची १०० झाडे लावण्याचे लेखी हमीपत्र दिले.

ॲड. संजय भोरे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर महाविद्यालय प्रशासनाने सहा फूट उंचीची शंभर झाडे लावण्याची लेखी हमी दिली आहे.मात्र,केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही,तर नव्याने लावलेल्या झाडांचे संगोपन करून ती मोठी करण्याची जबाबदारीही महाविद्यालय प्रशासनाला पार पाडावी लागणार आहे. आता या हमीपत्राची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी आणि कशा पद्धतीने होते, याकडे लक्ष लागले आहे.