जिल्हाधिकारी हे केवळ पद नसून ती एक जबाबदारी आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचा देवीच्या गाण्यावर ठेका धरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला अन् गोंधळ उडाला त्याला कारण होते जिल्हाभरात शेतीचे, शेतकऱ्यांचे, पशुपालकांचे झालेले नुकसान. एकीकडे माय बाप शेतकरी संकटात असताना जिल्हाधिकारी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन ठेका धरतात ही चिड आणणारी गोष्ट आहे. राज्यभरातून या घटनेवर टिका टिपण्णी झाली पडसाद उमटले. अमोल जाधव या शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले तिथे पोलिसांनी केलेली बाचाबाची महाराष्ट्राने पाहिली. त्याच्या काही वेळानंतर जिल्हाधिकाऱ्यांचा दिलगिरी व्यक्त केलेला संदेश निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकला. दिलगिरी व्यक्त करताना पुन्हा जो दिलदारपणा हवा होता तो मात्र दिसला नाही कुठल्याही अधिकृत लेटरपॅड किंवा साधी सही नसलेला मजकूर अधिकृत मानावा की अनधिकृत हा प्रश्न त्यातून निर्माण होतो. पण हे झाले कशामुळे याचे मूळ कुठे आहे हा प्रश्न अजून अनुत्तरित होता त्याचे मूळ आहे प्रसिद्धित. तुळजाभवानी नवरात्र महोत्सवाचे आणि जिल्हाधिकाऱ्यांचे कव्हरेज करण्यासाठी एक पी आर ओ टीम नेमल्याची चर्चा आहे त्या पी आर ओ टीम ने जिल्हाधिकाऱ्यांची प्रसिद्धी करण्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला होता मात्र प्रकरण अंगलट आले. पत्रकारितेचा अनुभव नसताना राजकीय लोकांच्या टोळीत राहिलेल्यांना प्रसिद्धीचे काम दिले गेले की अशी बोंब होते हे जगातील सर्वात अवघड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना कोण समजावून सांगणार? विशेष म्हणजे त्याच पी आर ओ टीम ने तो व्हिडिओ हटवून टाकला आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात इतर माध्यमे चालवत असलेली पोस्ट टाकली.
जिल्हाधिकारी आणि प्रशासन पूर,नुकसान या आपत्तीमध्ये काम करत आहे का तर याचे उत्तर हो आहे. मात्र प्रसिद्धीच्या नादात अप्रत्यक्षपणे झालेला हा प्रकार त्यातून प्रशासनाची झालेली बदनामी, चांगल्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यावर ही वेळ कशामुळे आली याचे चिंतन कोण करणार?
जिल्हाधिकारी त्यांचे करत असलेले काम याबाबत पुन्हा सोशल मीडियातून बाजू लावून धरण्याचा प्रयत्न होत आहे ते किती चांगले काम करत आहेत याबद्दलच्या पोस्ट फिरवल्या जात आहेत. एक लोकसेवक म्हणून त्यांची जबाबदारी ते योग्यरित्या पार पाडत आहेत आपत्ती आणि उत्सव यातील समतोल राखताना अशी गडबड होऊ शकते हे मान्य मात्र तुळजाभवानी देवी आणि तुळजापूरच्या सकारात्मक बातम्या धाराशिव जिल्ह्यातील माध्यमे नेहमीच प्रसिद्ध करतात मात्र असे असताना तुळजाभवानीच्या निधीतून किंवा जिल्हा प्रशासनाच्या निधीतून पेड जनसंपर्क करावा लागतो हे खेदजनक नाही का? जिल्ह्यातील नागरिक जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन घेऊन येतात मात्र त्यांची निवेदने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारावी असा वेगळा पायंडा पाडला गेला हे लोकशाहीला धरून आहे का? जिल्हाधिकारी हे पद राजकीय नसून प्रशासनातील सेवेचे पद आहे. केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून ते जिल्ह्यात आलेले आहेत त्यांच्याकडून सेवा मिळावी हीच प्रामाणिक अपेक्षा आहे. जिल्हाधिकाऱ्यांसोबत कोणाचे वैयक्तिक वैर नाही किंवा आकस देखील नाही मात्र जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर एकमेकांच्या हातात हात घालून चालणे अपेक्षित आहे.
हा धार्मिक कार्यक्रम नाही
ज्या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी ठेका धरला तो कार्यक्रम पूर्वापार चालत आलेला नसून तुळजाभवानी देवीच्या नित्य कार्यक्रमाचा आणि या कार्यक्रमाचा कुठलाही संबंध नाही. मात्र या प्रकरणी सत्ताधारी राजकीय पक्षाकडून सोशल मीडियावर कँपेनिंग सुरू असून जिल्हाधिकाऱ्यांना नव्हे तर त्या पीआरओला जो सत्ताधारी पक्षाचे काम पाहतो त्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
शेतीचे पंचनामे, शेतकऱ्यांना मदत आवश्यकता
या प्रकरणात थेट प्रशासनाचे प्रमुख असल्याने गेल्या दोन दिवसात प्रशासनाची काम करण्याची गती कमी झाली असून शेतकऱ्यांना जलद मदत मिळण्यासाठी सरकारने, मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालणे आवश्यक असून शेतकऱ्यांना फटका बसणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
प्रसिद्धीच्या टेंडरची आता तरी माहित्या द्या
तुळजाभवानी च्या नवरात्र महोत्सवाची प्रसिद्धी करण्यासाठी एक टेंडर काढल्याची चर्चा आहे मात्र पत्रकारांना याबाबत अधिकृत माहिती प्रशासनाने अद्याप दिली नसून किमान आता तरी ही माहिती द्यायला हवी खर्च होणारा पैसा कसा खर्च होतो आहे, तरदतूद कुठून केली आहे याची माहिती सर्वसामान्यांना मिळायला हवी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आकाश नरोटे
कार्यकारी संपादक
दैनिक जनमत
