धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना : बँकेतून 19 लाखांची रक्कम, शेळ्या व घरफोडीत सोनं-रोख लंपास

0
154

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उमरगा, शिराढोण व नळदुर्ग या तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये चोरी व घरफोडीचे गुन्हे नोंदवले गेले असून लाखोंचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे.

उमरगा – ग्रामीण बॅकेवर डाका
दि. 26 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 01.00 ते 04.15 वाजेच्या सुमारास उमरगा तालुक्यातील नाईचाकुर येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखेवर अज्ञात तिघा चोरट्यांनी धाड टाकली. बॅकेच्या चॅनेल गेटची कुलुपे तोडून आत प्रवेश करत त्यांनी तिजोरी गैस कटरने कापली व तब्बल ₹19,31,349 किंमतीचा रोख माल चोरून नेला. शाखाधिकारी अशिष नागनाथ बनसोडे (वय 30, रा. चिवरी, ता. तुळजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 331(1), 305(अ)(इ), 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शिराढोण – शेळ्या चोरीचा प्रकार उघड
कळंब तालुक्यातील ताडगाव येथील उत्रेश्वर रामा जाधवर (वय 32) यांचे घरासमोरून 22 ऑगस्टच्या रात्री 22.00 वाजता ते 23 ऑगस्टच्या पहाटे 05.30 वाजेच्या दरम्यान त्यांच्या तीन शेळ्या अंदाजे ₹30,000 किंमतीच्या चोरून नेण्यात आल्या. फिर्यादीनंतर शिराढोण पोलीसांनी तपास सुरू केला व संशयित आरोपींपैकी शिवराम सुभाष मुंडे याच्याकडून शेळ्या ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कबुली दिली की, पिंटु माणिक काळे (रा. शिराढोण पारधी पिंडी), दत्ता सिताराम काळे व स्वतः शिवराम मुंडे (दोघे रा. गोविंदपूर, ता. कळंब) यांनी मिळून ही चोरी केली. या प्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 303(2) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

नळदुर्ग – घरफोडीत सोनं व रोख लंपास
तुळजापूर तालुक्यातील खानापूर गावातील शैलाबाई चंद्रकांत लुगडे (वय 66) यांच्या उघड्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून स्टीलच्या डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख मिळून ₹69,000 किंमतीचा माल चोरून नेला. ही घटना 22 ऑगस्टच्या रात्री 21.00 ते 23 ऑगस्टच्या पहाटे 03.00 वाजेदरम्यान घडली. फिर्यादीनंतर नळदुर्ग पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 305 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या सर्व घटनांमुळे धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीसांनी चोरट्यांचा शोध अधिक गतीने सुरू केला आहे. तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत मोठ्या प्रमाणावर मालमत्तेविरुद्ध गुन्हे नोंदवल्याने जिल्हा पोलीस यंत्रणेची कसोटी लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here